33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी; प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन उद्धव ठाकरे देवगिरी बंगल्याकडे...

महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी; प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन उद्धव ठाकरे देवगिरी बंगल्याकडे रवाना

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे याच्यात युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचे घटकपक्ष कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपासून शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्या दिशेने शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा देखील सुरू आहेत. आज देखील प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे याच्यात युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचे घटकपक्ष कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याकडे रवाना झाल्याचे वृत्त टीव्ही-9 डिजीटलने दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित हा चौथा घटक पक्ष सहभागी होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणात सुरू आहे.

आज ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. या चर्चेमध्ये मुंबई महापालिका निवडणुका, जागा वाटप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याकडे रवाना झाले असून या बैठकीला सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार असल्याचे टीव्ही 9 च्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. महाविकास आघाडी बळकट होण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर आनंदच आहे, असे टोपे म्हणाले. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र चर्चा करतील उद्धव ठाकरे महाविकास आघाडी घट्ट करतील असे देखील राजेश टोपे म्हणाले.

तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी देखील प्रसिद्धीपत्रकाव्दारे म्हटले आहे की, शिवसेना- वंचित युती बाबत आम्ही होकार कळविला आहे. आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की,  वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी