27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजछगन भुजबळांच्या ओएसडीने महिलेला कार्यालयाबाहेर हाकलले, महिलेने घातला गोंधळ !

छगन भुजबळांच्या ओएसडीने महिलेला कार्यालयाबाहेर हाकलले, महिलेने घातला गोंधळ !

टीम लय भारी

मुंबई : कुणाच्या स्वप्नातही नसताना शिवसेनेच्या सोबतीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची लॉटरी लागली. अनावधानाने मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी बहुतांश मंत्रीगण कष्ट उपसत आहेत. पण मंत्र्यांच्या कार्यालयातील अनेक घमेंडखोर अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनतेला अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील ‘विशेष कार्य अधिकाऱ्यां’कडून (ओएसडी) एका महिलेला अशा कटू वागणुकीचा अनुभव आला.

आपले काम घेऊन संबधित महिला भुजबळ यांच्या एका (ओएसडी) गेली होती. परंतु या ओएसडी महाशयांनी आपल्या अधिकारपदाचा रंग दाखवला, आणि संबंधित महिलेला ‘बाहेर व्हा’ अशा भाषेत दरडावले. या महिलेने बाहेर येवून आपला संताप व्यक्त करायला सुरूवात केली. ‘महिलांशी असे बोलतात का ? हे ओएसडी फारच उद्धट आहेत. मी आता थेट साहेबांकडेच (छगन भुजबळ यांच्याकडे) तक्रार करणार आहे’. अशा शब्दांतच या महिलेने संतापाच्या ठिणग्या उडविल्या. कार्यालयाच्या दारातच या महिलेने ओएसडीच्या नावाने ‘ठणाणा’ केला. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी व सामान्य लोकही स्तब्ध झाले. संबंधित महिला आपला राग व्यक्त करीत होती, आणि कर्मचारी व उपस्थित सगळेजण तिचा रूद्रावतार फक्त पाहात होते.

कोणते अधिकारी तुम्हाला ‘बाहेर जा’ बोलले असे कुणीतरी या महिलेला विचारले. ‘ते ओएसडी बोललेत’ असे सांगत संबंधित महिला पाय आपटतच तिथून निघून गेली. या प्रकारामुळे कार्यालयात काही वेळ स्मशान शांतता पसरली. यावेळी मंत्री छगन भुजबळ आतल्या दालनात उपस्थित होते. महिलेचा हा संताप भुजबळांच्या कानापर्यंत पोचविण्याचे सौजन्य तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखविले का याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.

मंत्र्यांचे अधिकारी व पीए यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन – चार वर्षांपूर्वी ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी संभावना केली होती. ‘महाविकास आघाडी’च्या सरकारमध्येही हा अनुभव आता सामान्य जनतेला येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांकडे खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी), स्वीय सहायक (पीए) अशा पदांवर वर्णी लागावी म्हणून अनेक अधिकारी मंत्र्यांकडे हात पसरत असतात. पण पदावर आले की, या अधिकाऱ्यांना खूर्चीची नशा चढते. त्यातून उद्दामपणा, सामान्य जनतेला कस्पटासमान वागणूक देण्याची वृत्ती वाढीस लागते. भुजबळांच्या कार्यालयात घडलेला हा प्रकार एक छाटे उदाहरण आहे. बऱ्याच मंत्र्यांचे अधिकारी असेच उद्दाम वागतात, असे सूत्रांनी सांगितले. काही मोजक्या मंत्र्यांकडील अधिकारी मात्र सामान्य जनतेशी सौजन्याने वागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

धनगर समाजासाठी अजितदादांकडे १ हजार कोटींची मागणी; धनगर शिष्टमंडळाचा आग्रह, आरक्षणाबाबतही दिले आश्वासन

जनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

एकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी