31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयShivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

टीम लय भारी

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिलेले आव्हान शिवसेनेने (Shivsena) स्विकारले असून सरकारच्या वतीने चोख उत्तर देणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले.

फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल करुन अतिशय सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या जनतेला आज  (बुधवारी) सरकारच्या वतीने माहिती देऊ, असे अनिल परब म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती पैसा पुरवला याची सविस्तर मांडणी केली. त्याला आता शिवसेनेकडून (Shivsena) उत्तर देण्यात येईल, असे अनिल परब म्हणाले.

Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले. महाराष्ट्र सरकारने काय करायला हवे, कशी उपाययोजना करायला हवी, याबद्दल फार मोठे मार्गदर्शन महाराष्ट्राला केले. परंतु हे करत असताना, त्यांनी हा विचार करायला हवा की महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळते असे नाही. जे सरकारमध्ये बसलेले आहेत, त्यापैकी बरेच लोक अर्थशास्त्र जाणतात.

सरकार कसे चालवायचे, कसे चालते, सरकारला काय करता येते याची सर्व जाणीव सरकारला आहे. फडणवीसांनी वेगवेगळे विषय असे मांडले, की महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काही समजतेय ते आम्हालाच समजते आणि आमच्या सल्ल्याने सरकार चालले तरच सरकार चालेल आणि महाराष्ट्राची जनता कोरोनामुक्त होईल. अन्यथा महाराष्ट्र सरकार फार मोठ्या संकटात सापडेल, अशा प्रकारचे वक्तव्य केले. मी फक्त इतकेच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे.

मुख्यमंत्री अहोरात्र काम करुन तज्ज्ञांशी संवाद साधून या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहिला प्रश्न आज जी फडणवीसांनी आकडेवारी दिली, त्या आकडेवारीची पोलखोल आणि चिरफाड उद्या सोप्या भाषेत करुन देऊ. लोकांना मूर्ख समजू नका, लोकांना हे कळते, ही राजकारणाची वेळ नाही. अर्थगणित सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका, असे अनिल परब म्हणाले.

रेल्वे मंत्रालयाचा महाराष्ट्रासोबत रडीचा डाव

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेकडून कमी गाड्या सोडण्यात येत असल्याचे सांगितल्यावर मिरची झोंबलेल्या रेल्वे मंत्रालयाने रात्री अडीच वाजता महाराष्ट्रासाठी गाड्यांचे शेड्युल पाठवले आणि महाराष्ट्र सरकार गाड्यांचे नियोजन करताना सहकार्य करत नसल्याची बोंबाबोंब केली. अशाप्रकारे केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठीच रेल्वे मंत्रालय रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पियुष गोयल यांच्या आरोपांचे उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना आम्ही केंद्राकडे दररोज ८० गाड्या पाठवण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ३० गाड्या मिळाल्याचे सांगितले होते. यावर चिडून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली.

१ मे पासून २४ मे २०२० पर्यंत जवळपास ५५५ गाड्यांमधून ७ लाख ७६ हजार मजूर परराज्यातील आपापल्या गावी गेले आहेत आणि २६ मे पासून पुढे आम्ही १७२ गाड्यांची मागणी केली असताना, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अचानक रात्री अडीच वाजता गाड्यांचे शेड्युल पाठवण्यात आले. यात एका दिवसांत पश्चिम बंगालसाठी ४३ गाड्यांचे शेड्युल करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेले असल्याने तेथील सरकारने दररोज केवळ २ गाड्या सोडण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. ही विनंती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती. तरीही एका दिवसात ४३ गाड्या सोडून केंद्र सरकार असे दाखवतेय की आम्ही तर गाड्या देतोय पण महाराष्ट्र सरकारमध्ये लोकं पाठवण्याची ताकद नाही. पश्चिम बंगालमध्ये वादळ असल्याने पुढील २ दिवसांत आपण तेथे जाणा-यांची व्यवस्था करणार आहोत. तोपर्यंत तिथे जाणा-यांनी महाराष्ट्रातच थांबावे, अशी मी विनंती करतो, असे अनिल परब म्हणाले.

कोविड१९ मुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने गलिच्छ राजकारण करु नये. मजुरांना आपल्या मूळगावी पाठविण्याची सोय महाराष्ट्र शासन करीत आहे. माझी सर्व श्रमिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नये.

तसेच वेळापत्रकात गोंधळ हा रडीचा डाव एवढ्यावरच थांबलेला नाही. तर अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या शेड्युलमधील बहुतांश गाड्या या दुपारी १२ वाजेच्या होत्या. रात्री ईदची ड्युटी आटोपून घरी गेलेल्या पोलिसांना सकाळी ८ वाजता कळते की दुपारी १२ वाजता गाड्या सोडायच्या आहेत, जे शक्य नाही. म्हणून केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा डाव रेल्वे मंत्रालय करत आहे. गोरखपूरला जाणारी रेल्वे ओडीसाला गेली. आज सीएसटी, पनवेल, सोलापूर स्टेशनच्या बाहेर लोकं उभी आहेत, तरी गाड्या वेळेवर सुटत नाही. गाड्यांच्या वेळापत्रकात गोंधळ करायचा आणि सर्व दोष महाराष्ट्र सरकारच्या माथी मारायचा असा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी