29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, अमोल कोल्हे कडाडले

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, अमोल कोल्हे कडाडले

टीम लय भारी

मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. दरम्यान, पंढरपूर मंगळवेढ्यात राजकारण चागलेच तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते दररोज एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे” अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.

“महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतेय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केले.

भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केले. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वासही कोल्हेंनी व्यक्त केला.

पंढरपूरात भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे थेट लढत

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आले. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेली. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी