32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयहोय, आम्ही 'उजवेच' आहोत... (आमदार ॲड्. आशीष शेलार यांचा विशेष लेख)

होय, आम्ही ‘उजवेच’ आहोत… (आमदार ॲड्. आशीष शेलार यांचा विशेष लेख)

'लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये भाजपचे आमदार ॲड्. आशीष शेलार यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्याला या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचे स्मरण जर आपण केले, तर त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, भारताची सेवा म्हणजे खितपत पडलेल्या लाखो लोकांची सेवा… म्हणजेच दारिद्र्य, अज्ञान, रोगराई आणि संधीच्या असमानतेचा शेवट…

देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर आव्हान होते ते, दारिद्र्य, अज्ञान व रोगराईचे… त्यानंतर २०१४ ला जेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी मा. नरेंद्र मोदी विराजमान झाले, त्यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘घर घर शौचालय’ची घोषणा केली. स्वतंत्र भारतात जन्मलेले मोदी हे पहिले पंतप्रधान झाले आणि लाल किल्ल्यावरून भाषण करताना जेव्हा त्यांनी ही घोषणा केली, त्यावेळी त्यांच्यावर टीका करणारे कमी नव्हते. पण, त्याची तमा न बाळगता पंतप्रधानांनी ही घोषणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी गरिबीतून आलो आहे. गरिबी काय असते याची मला कल्पना आहे. त्यामुळे गरिबाला सन्मान मिळावा म्हणून मी काम करणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा गेल्या ७५ वर्षांचा विचार जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा या दोन पंतप्रधानांच्या भाषणांचा कालावधी आपण सजगपणे मोजला, तोलला किंवा त्यांची मांडणी केली, तर आपण कुठून कुठपर्यंत आलो आणि इथपर्यंत येताना काय बाकी राहिले याची कल्पना आपल्याला येते. या देशात ७५ वर्षांत काहीच घडले नाही, असे मला अजिबात म्हणायचे नाही. बरेच काही घडले; पण जे घडले किंवा जे घडवले गेले, त्याचा केंद्रबिंदू सामान्य गरीब माणूस होता का, त्याच्या जगण्यात किती बिंदूंनी फरक पडला याचे मूल्यमापन आपण करणे गरजेचे आहे.

आज देशाची लोकसंख्या १२८ कोटी आहे. त्याच्या २९ टक्के म्हणजेच ३७ कोटी इतकी लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखालील आहे. आपल्या देशात अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजाही पूर्ण न होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपल्या देशात ‘गरिबी हटाव’च्या घोषणा खूप झाल्या; पण गरिबी अमर झाली आणि घोषणा तर अजरामर झाल्या, असे चित्र आहे. एकीकडे वाढत जाणारी लोकसंख्या; दुसरीकडे संधींचे असमान वाटप, एकीकडे रोजगाराच्या घटणाऱ्या संधी; तर दुसरीकडे काही मोजक्या धनिकांकडे वाढत जाणारा संपत्तीचा संचय यामुळे गरीब आणि श्रीमंत यातील दरीही वाढतच गेली. अशा वेळी या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, ज्या श्रीमंत वर्गातील लोकांना गॅसची सबसिडी मिळते, त्यांनी ती गरिबांसाठी सरकारला परत करावी. त्याला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांची संख्या काही कोटींमध्ये होती.
आपण शिक्षणाने साक्षरतेचे प्रमाण वाढविले; पण या देशातील जनतेच्या अज्ञानाचा अंध:कार पूर्णपणे दूर झाला, असे म्हणता येणार नाही. आजही आपला देश पूर्णपणे साक्षर नाही. आपल्या देशाचे साक्षरतेचे प्रमाण हे ७८ टक्के आहे. म्हणजे आपल्या देशातील २२ टक्के म्हणजे २८ कोटी लोक निरक्षर आहेत.

कोरोना काळात आपण रोगराईला कसे तोंड देऊ शकलो, आपल्याकाडे किती आरोग्य यंत्रणा होती, किती असायला हवी याचाही स्पष्ट अंदाज आपल्याला आलेला आहे. त्यामुळे देश स्वतंत्र होत असताना जी आव्हाने देशासमोर होती, ती संपलेली नाहीत. ज्यावेळी या देशातील राजकारणाने कूस बदलली आणि डाव्या दिशेकडून उजवीकडे राजकीय सूर्य वळला. त्यानंतर रातोरात हे बदल होणार नव्हते याची पूर्ण कल्पना असलेले एक सक्षम नेतृत्व देशाला लाभले ते म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होय.
Ashish Shelar Special article for Lay Bhari Diwali issue
ज्यावेळी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होता, त्याच वेळी या देशातील जनतेने राजकारणाची कूस बदलली. त्यामुळे स्वाभाविकपणे आता देशाची बांधणी आणि प्रगतीचा एक वेगळा आलेख मांडवा लागणार होता. काही कठोर भूमिका घ्याव्या लागणार होत्या. पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या भाषणातच ती दिशा स्पष्ट केली. त्यांनी आपण देशाचे प्रधानसेवक असल्याचे जाहीर केले. त्यासोबत हा देश कुठल्या सरकारांनी निर्माण केलेला नाही; तर हा देश गरीब कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या घामातून उभा राहिला हे अधोरेखित करून याच वर्गाच्या उन्नतीची नवी मांडणी करण्यास सुरुवात केली.

स्वातंत्र्याचा आणि ७५ वर्षांचा इतिहास व बदलत जाणारा देशाचा भूगोल ज्ञात असलेली, अभ्यास व चिंतन, मनन करून एक वैचारिक बैठक पक्की असलेल्या नेतृत्वाची या देशाला गरज होती. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पूर्ण झाली. मग त्यासाठी विविध योजनांचा दौर सुरू झाला. पण, त्याआधी या देशातील शासकीय यंत्रणेला लागलेली मोठी कीड म्हणजे भ्रष्टाचार.. या भ्रष्टाचाराने हा देश पोखरून काढला होता. त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी नव्या सररकाने पहिली कंबर कसली. आज आठ वर्षांत या देशात काय घडले हे मी इथे नव्याने सांगायची गरज नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार, श्रमिकाला त्याच्या हक्काचे अनुदान, मदत, निधी थेट त्याच्या खात्यावर मिळू लागला. त्यामध्ये होणारी गळती, चोरी थांबली; त्यामुळे गरिबासमोर आश्वासक चित्र निर्माण करण्यात या सरकारचे मोठे योगदान आहे.

आज डावी, उजवी अशी बाजू तपासून बघण्याची वेळ नाही. काय डावे आणि कोण उजवे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा अराजकीय व्यासपीठावर डाव्या, उजव्या बाजूंची तपासणी करून टीका-टिपण्णी करण्याची ही वेळ नाही. तर जनतेच्या मनात काय होते आणि काय आहे, हे तपासून घेण्याची आजची वेळ आहे. रोज नवी आव्हाने उभी ठाकत आहेत. जुनी आव्हाने नव्या रूपात पुन्हा आपल्याला आव्हान देत आहेत; पण म्हणून निराश होऊन चालणार नाही. याच काळात खंबीरपणे उभे राहण्याची गरज होती. एकीकडे देशातील अंतर्गत आव्हाने; तर दुसरीकडे अन्य राष्ट्रांसमोर आपण देशाची काय पत निर्माण केली, आपल्या देशाचे अन्य देशांशी असलेले संबंध कसे निर्माण केले अशा सगळ्याच पातळ्यांवर अनेक लढाया लढून देशातील जनतेला आश्वासक दिशेने पुढे नेण्याचा हा काळ आहे. खरे तर देशातील जनतेने आपला कौल दिला.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
Exclusive : ‘लय भारी’च्या तडाख्यानंतर सरकारने जारी केले 355 कोटी रुपये

देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल आणि शंभरीच्या दिशेने वाटचाल करील त्यानंतर या देशातील सरकारांकडून जनतेच्या अपेक्षा या वेगळ्या होत्या. मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच राजकारणाची आणि सरकारांची दिशा बदलली आणि मतपेटीतून न बोलता, या देशातील जनतेने परिवर्तन घडवून आणले. त्यामागे अनेक कारणे आहेत; तसाच ६० वर्षांचा कालखंडसुद्धा आहे. त्यामुळे या देशातील जनतेच्या मनात काय होते ते मतपेटीतून दिसले. काही गोष्टींचा उबग यावा अशा घटना, कृतींचा हा कालखंड होता. त्यातून देशाचे नुकसान झाले. त्यासाठीच २०१४ ला जनतेने सत्तांतर घडविले.

आज डावी, उजवी अशी बाजू तपासून बघण्याची वेळ नाही. काय डावे आणि कोण उजवे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा अराजकीय व्यासपीठावर डाव्या-उजव्या बाजूंची तपासणी करून टीका-टिपण्णी करण्याची ही वेळ नाही. वेळ आज ही आहे की जनतेच्या मनात काय होते आणि काय आहे हे तपासून घेण्याची. देशात सत्तांतर झाले ते नुसते संसदेतच नाही; तर ते पंचायत ते पार्लमेंट, असे सत्तांतर झाले. देशातील जनतेने ते पुन्हा पुन्हा घडवून आणले. ज्यांना यामध्ये प्रचंड अपयश आले ते या देशातील वर्षानुवर्षांचे सत्ताधारी होते. या देशाचे आपण मालक आहोत, असा समज करून बसलेल्या मंडळींना या देशातील जनतेने आपली जागा दाखवली आणि त्यांना जागे केले. पण, त्यानंतरही त्यांनी जनतेचा हा कौल स्वीकारला नाही. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अपयशाची मालिका सुरूच राहिली; जनतेने ते स्पष्ट केले तरी मग कधी ईव्हीएम मशीनला दोष दे, कधी निवडणूक प्रकियेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण कर, असे खटाटोप काही जण करीत आहेत. त्यातून ते आपल्या पक्षांच्या अधोगतीचे मार्ग मोकळे करीतच जात आहेत, यापेक्षा त्यांना वेगळे काय म्हणावे.
आज पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याला आता गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. यातून देशातील जनतेला ते कसे आत्मनिर्भर बनवणार याचा एक आलेख त्यांनी मांडला आहे.

कारण- पुढच्या २५ वर्षांनंतर आपण जेव्हा देशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करू तोपर्यंत आपल्या हातात पुढील २५ वर्षांचा आराखडा आजच असायला हवा. आता समाधानाची बाब ही आहे की, आपल्या हातात तो आहे. त्या दृष्टीने आपण काम करण्यास सुरुवातही केली आहे. आता गावखेडयापर्यंत विकासाचे मार्ग मोकळे झाले आहेत. काश्मीरमधील ३७० कलमाचा प्रश्न मार्गी लागलाय आणि काश्मीरचाही देशाच्या अन्य प्रांतांप्रमाणे वेगाने विकास होणार आहे. अशा वेळी मग ज्यांची दुकाने बंद व्हायची वेळ आलीय, ज्यांची राजकीय दुकानदारी धोक्यात आलीय त्या काही शक्तींनी या देशात अशांतता निर्माण करण्यासाठी विविध उपद्व्याप सुरू केलेत. भ्रम पसरविण्याचे जणू मिशनच त्यांनी उघडले आहे. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. याची जाण नुकतीच दसऱ्याच्या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी करून दिली.

आम्ही उजवे आहोत… होय आम्ही उजवे आहोत.. आम्ही ‘गर्व से कहो हम हिंदू है’ नारा देणारे आहोत. आम्ही अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून आंदोलन केले आणि मंदिरही बांधायला सुरुवात झाली. ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ म्हणणारे आम्ही आहोत. होय, आम्ही उजवे आहोत. त्या दृष्टीने आमची सरकारे आली आणि बदल झाला… आम्ही यातील काहीही नाकारलेले नाही. जे केले, ते अभिमानाने केले. या देशातील जनतेला अभिमान वाटावा आणि या देशातील जनतेचा जो स्वाभिमान होता, तो आम्ही जपला आणि यापुढेही जपत राहू. या देशाचा मूळ आत्मा काय आहे, याची पूर्ण कल्पना आमच्या विचारसरणीला आहे. या देशाचा इतिहास आम्हाला ज्ञात आहे. तो इतरांनी कुणीही शिकवण्याची गरज नाही. आमच्या विचारसरणीला एक वैचारिक बैठक आहे आणि ती अत्यंत स्पष्ट आहे. त्यासोबतच या देशात जर आमची सरकारे आली, तर आम्ही काय करू शकतो याची काही अंशी झलक या देशातील जनतेने अनुभवली आहे. अजूनही जनतेचे अनेक प्रश्न सोडवणे ही आमच्यासमोरची आव्हाने आहेत आणि आम्ही ती नाकारलेलीही नाहीत.

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी ही आमची काम करण्याची पद्धत आहे. राष्ट्रभक्ती हा आमच्या कार्याचा आत्मा आहे. या देशाचे मूळ प्रश्न काय आहेत आणि ते सोडवण्यासाठी काय केले पाहिजे, याचा पुढील ५० वर्षांचा आराखडा, आलेख आणि त्यासाठी लागणारे चिंतन यांचा आमचा अभ्यास सतत सुरू आहे. किंबहुना तो पूर्ण झाला आहे, असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. आज जनतेचा कौल स्पष्ट आहे. त्यामुळे ६० वर्षांत उजवे काय करीत होते, याचा मागोवा घेणाऱ्यांना कळेलच की आम्ही काय करीत होतो? त्यामुळे या परिसंवादामध्ये भाग घेणारे अन्य विद्वान डाव्या बाजूने उजव्यांवर टीका करून आपली चिडचिड, मळमळ अथवा अपयशाची जळजळ इथे व्यक्त करतील; पण आम्ही ते करणार नाही. कारण- उतणार नाही, मातणार नाही आणि या देशसेवेचा हाती घेतलेला वसा आम्ही सोडणार नाही. हाच आमचा दृढ निश्चय आहे. निश्चय, कल्पना, संकल्प आणि त्याची सिद्धी यासाठी करावी लागणारी साधना, परिश्रम, मेहनत, त्याग, समर्पण या बाबतीतही आम्ही उजवेच आहोत.

(लेखक महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत.)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : ‘लय भारी’चा दर्जा खरोखरच लय भारी आहे : धनंजय मुंडे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी