28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeराजकीयCoronavirus : उद्धव ठाकरे साहेब, लॉकडाऊनचे लाड बंद करा, जनजीवन सुरळीत करा

Coronavirus : उद्धव ठाकरे साहेब, लॉकडाऊनचे लाड बंद करा, जनजीवन सुरळीत करा

आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,

सप्रेम जय महाराष्ट्र.

साहेब, ३१ मे नंतर आपल्या महाराष्ट्राचा ‘लॉकडाऊन’ संपूर्णपणे मोकळा करा. होऊन जाऊ दे काय व्हायचे ते. साहेब, आताच फेसबुक वर एक पोस्ट वाचली… ‘पूर्वीच्या युद्धात शत्रू हा तलवारी, शस्त्र, दारुगोळा, तोफा, बॉम्बने सुद्धा लवकर मरत नव्हता. पण हा कोरोना ( Coronavirus ) नुसता साबणाने सुद्धा मरतोय. शत्रू कमकुवत आहे. गरज फक्त स्वयंशिस्तीची आहे.’

‘कोरोना’ ( Coronavirus ) युद्ध सरकारी पातळीवर नव्हे तर वैयक्तिक पातळीवरचे युद्ध.

Rane Vs Pawar

‘कोरोना’ ( Coronavirus ) युद्ध हे सरकारी पातळीवर नव्हे तर, वैयक्तिक पातळीवर लढले जाणारे युद्ध आहे. साहेब, हे अंधभक्त सोडून बाकी सर्वजण तुम्हाला मनापासून साथ देतील. आणि हो हे अंधभक्त मरणार वगैरे नाहीत तर ते फक्त ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) बाबतीत तुम्ही किती अपयशी ठरलात वगैरे वगैरे पोस्ट लिहीत बसतील. साहेब, तुम्ही काळजी करू नका या ४० पैसे वाल्यांशी जशास तसे उत्तर देण्यास आम्ही आता बऱ्याच दिवसापासून तयार झालो आहोत.

विरोधकांशी कडक आणि ठणकावून बोला

काहीही झाले तरी ते तुम्हाला शेवटपर्यंत बदनामच करणार आहे. कारण तुम्ही मुख्यमंत्री होऊन त्यांच्या वर्मावरच घाव घातला आहे. पण तुम्ही खंबीर रहा. त्यांच्याशी बोलताना तुम्ही कडक भाषेतच बोला. आपले आजोबा प्रबोधनकार आणि पिताजींच्या भाषेत बोला. ह्यांना हीच भाषा समजते.

Gopichand Padalkar MLC

ठकास महाठक या न्यायाने तुम्ही बोला. उगाचच गोड बोलू नका. स्पष्ट आणि खणखणीत बोला. केंद्रावरही वेळप्रसंगी कडक टीका करा. आणि ती राष्ट्रपती राजवट की काय त्याला तर बिल्कुल घाबरू नका. केंद्र राष्ट्रपती राजवट कदापी लावू शकणार नाही. महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल साहेब. आणि जरी त्यांनी ती ओढून ताणून लावलीच तर त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्यांचा साधा सरपंच सुद्धा निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आता कोरोना कारागृह नको

साहेब, कोरोना बद्दल आता जनतेमध्ये चांगलेच प्रबोधन झाले आहे. आपली जनता सुज्ञ आहे. घराबाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे हे आता त्यांना चांगले समजायला आणि उमजायला लागेल आहे. यातून एखादा दुसरा अती शहाणा निघालाच तर त्याची फळे तो भोगेल. त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना थोडे बहोत भोगावे लागेल. परंतु या हातावर मोजता येणाऱ्या लोकांच्या मुर्खपणामुळे सगळ्यांना भोगावा लागणारा हा ‘कोरोना कारागृह’ ( Coronavirus ) आता  नको.

आमची आर्थिक गणितं कोलमडली

साहेब, आमची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती संपूर्णपणे ढासळली आहे. आम्हा मध्यमवर्गीयांची जी काही जमा होती ती कशीबशी नाइलाजास्तव, सामाजिक लाजेस्तव ३१ मे पर्यंतच वापरता येईल. कष्टकऱ्यांचे, मोलमजुरी करणाऱ्यांचे तर काही विचारूच नका.

आता ७ जून नंतर पावसाळा सुरू होईल. लोकांना कामे मिळणे मुश्किल होईल. आणि त्यात लॉकडाऊन तसाच पुढे चालू ठेवला तर जनता तुमच्यावर चिडेल. शिव्या देतील. साहेब, काल तुम्ही म्हणालात की, मला शिव्या दिल्या तरी चालतील. परंतु महाराष्ट्रासाठी त्या मी सहन सुद्धा करेन.

साहेब, प्रकरण तितके सोपे नाही. जनता प्रचंड अडचणीत आहे. प्रत्येकाच्या आपापल्या समस्या असतात. त्या समस्या त्या स्वतःच सोडवीत असतात. सरकारकडून त्यांची तशी वैयक्तिक समस्येबाबत काहीच अपेक्षा नसते. फक्त त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. तेच सरकार देणार नसेल तर ते प्रक्षोभीत होतील आणि ती परिस्थिती ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) परिस्थिती पेक्षाही भयंकर असेल. साहेब, पोटाला जेव्हा आग लागते ना तेव्हा मरणाची सुद्धा भीती वाटत नाही हो.

विरोधकांची इच्छा

साहेब, महाराष्ट्रात उद्रेक कधी होईल आणि राज्य अस्थिर कधी होईल यासाठी या अंधभक्तांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. ‘कोरोना’चे त्यांना काहीही देणेघेणे नाही. ‘कोरोना’ ( Coronavirus ) गेला उडत. तुमचे राज्य कधी ढासळेल या विवंचनेत ही मंडळी आहेत.

वर्तमानपत्रे ताबडतोब घरी जाऊ द्या

साहेब, वर्तमानपत्रे ताबडतोब घरोघरी जाऊद्यात. तसेही आपण मार्केट मध्ये जाऊन किराणा, भाज्या, फळे, औषधे व इतर वस्तू घेऊन येतच आहे. बाहेर काय चाललंय काहीच समजत नाही. केंद्र सरकार देशाची वाट लावत आहे.

या काळात त्यांनी देश विकायला काढला आहे. या अगोदर ३०% विकून झाला आहे. ‘कोरोना’ ( Coronavirus ) लॉकडाऊनच्या काळात आणखी ३० % विकण्याची प्रक्रिया चालू आहे. ही ‘कोरोनो’ खरेदी विक्रीची थोडीफार माहिती फक्त वृतपत्रातूनच मिळू शकते. ‘कोरोनो’ची ( Coronavirus ) भीती घालून लोकांना घरात बसायला सांगितले जात आहे.

लोकं घरात बसून राहिली की, आंदोलनं नाही, मोर्चा नाही, चर्चा नाही, सभा नाही, परिसंवाद नाही, एकमेकांना भेटून आचार विचार प्रदान करणे नाही. सगळं कसं ठप्प. समोर सगळं स्वच्छ दिसत असून काहीच करू शकत नाही.

देशाची फसगत

महोदय, ‘कोरोना’ ( Coronavirus ) आणीबाणीमुळे उत्पन्न झालेली तथाकथित लॉकडाऊन पद्धत ३१ मे पर्यंत उठविली गेली नाही. तर देशाची भयंकर मोठी फसगत होईल नव्हे ती होत आहे.

अविश्वसनीय मीडिया

देशातील ८० % मीडिया हा उद्योगपतींचा आहे. हे उद्योगपती त्यांच्या स्वार्थासाठी मोदींच्या हातात असल्याने यापुढे आम्हाला कधीही खरी वस्तुस्थितीदर्शक माहिती पाहताच येणार नाही. हे आता पक्के झाले आहे. लोकांचा मीडियावरील असलेला पूर्वीचा विश्वास उडाला आहे.

काहीतरी टाइमपास म्हणून लोकं आता मीडियाकडे पाहत आहेत. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांची विश्वासार्हता रसातळाला चालली आहे. हळूहळू काही मीडियावर बहिष्कार टाकण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे. येत्या २/३ वर्षात त्यांच्यावर बहिष्कार पडलेला आपल्याला दिसेल. अशा सुपारीबाजांवर बहिष्कार हा एकमेव पर्याय ठरू शकेल.

सामाजिक सौहार्द संपण्याच्या मार्गावर

साहेब, या ‘कोरोनो’मुळे ( Coronavirus ) सामाजिक सौहार्दाचे वातावरण हळूहळू भयानक आणि नष्ट होत चालले आहे. अहो, काही मोठ्या इमारतींमध्ये आजूबाजूचे कुटुंब एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. हाय नाही, बाय सुद्धा नाही. त्यांना वाटते एकमेकांशी बोलल्याने किंवा एकमेकांकडे पाहिल्याने कोरोना होतो की काय ?

या अर्धवट उच्च शिक्षितांना पाहिल्यावर असे वाटते की, यांच्या शिक्षणाचा आणि व्यावहारिक ज्ञानाचा कवडीचा तरी काही संबंध आहे का ? अशी ही कुटुंबे मानसिक रुग्ण नाहीत का ?

बाल मनावर परिणाम

साहेब, घरातील लहान मुलांवर सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतोय. मी काही मानोपसार तज्ज्ञ नाही. परंतु बालमनावर त्याचा नक्कीच परिणाम होत आहे. जर असे असेल तर आमच्या भावी पिढीच्या भवितव्याचे काय ? त्यांचे खेळणे, बागडणे सगळेच बंद झाले आहे. मुले काही दिवसांनी चिडचिडी होतील.

महोदय,  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानवर अणुबॉम्ब टाकले. त्या अणुबॉम्बच्या परिणामामुळे त्यांची पुढची पीढी ही अपंगावस्थेत निर्माण झाली. तशीच अवस्था या तथाकथित ‘लॉकडाऊन’मुळे आपल्या मुलांची मानसिक अवस्था बिघडू नये अशी प्रार्थना आपण करूयात.

घरकाम करणाऱ्या महिलांचे दुःख

घरकाम करणाऱ्या महिलांचे तर अतिशय मोठे दुःख आहे. काम बंद, पगार बंद, उपाशी पोटी त्या झोपडपट्टीत / वस्तीत राहायचे, वर दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याचा मानसिक, शारीरिक छळ सहन करायचा. या व्यतिरिक्त त्यांच्या पुढे काय आहे ?

मोठमोठ्या इमारतीत राहणाऱ्या देशभक्त कुटुंबीयांनी घरकाम करणाऱ्या महिलांना त्या इमारतीतच येण्यास बंदी घातली आहे. कारण त्यांच्या मते या महिलांमुळेच देशात कोरोना आला आहे.

प्रशासनातील अनाजीपंतापासून सावधान

साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहात यात वादच नाही. सरकारी प्रशासनाचा तुम्हाला काहीही अनुभव नसताना इतक्या छानपणे आपण प्रशासनाचा गाडा हाकत आहात. परंतु आपल्या प्रशासनात अजून बरेच अनाजी पंत आहेत. त्यांची ताबडतोब बदली करा.

ते भविष्यात तुम्हाला नक्कीच गोत्यात आणतील हे लक्षात ठेवा. सरकारी नोकर असल्यामुळे त्यांना तुमच्यासमोर नाइलाजास्तव जी हुजुरी करावीच लागेल. परंतु यांना तुम्ही वेचून काढा साहेब. सध्या ते प्रशासनात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःचा आत्मघात करून घेऊ नका.

ही मंडळी काय करीत आहे हे पाहण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवा. नजर ठेवा. त्यांची चाणक्य नीती त्यांच्यावरच वापरा.

‘कोरोना’ची एक्सपायरी डेट नाही

साहेब, ‘कोरोना’ ( Coronavirus ) हा काही एक्सपायरी डेट घेऊन आलेला नाही. त्यामुळे अजून कमीत कमी पुढील दोन वर्षे त्याच्यासोबत आपल्याला जगायचे आहे. कोणाची इच्छा असो व नसो.

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय षडयंत्र ?

साहेब, थोडासा बिनधास्तपणा आपल्याला दाखवावाच लागेल. थोडीशी काळजी आम्ही प्रत्येकजण घेणार आहोत. आपण निर्धास्त रहा. आम्ही जेव्हा विचार करतो की, आमच्या देशातील १३० कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त एक लाखाच्या आसपासच कोरोनाग्रस्त आहेत.

आपल्या महाराष्ट्रात १८ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त ३० हजार रुग्ण असून त्यातील बरेच जण ‘कोरोना’ ( Coronavirus ) औषधाशिवाय चांगले होऊन घरी गेले आहेत. तरीसुद्धा या ‘कोरोनो’ची ( Coronavirus ) भीती ही मीडिया आमच्यावर दररोज का घालत आहे ?

हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय षडयंत्र तर नाही ना ? ‘कोरोनो’च्या ( Coronavirus ) नावाखाली दुसरंच काहीतरी चाललं नाही ना ? कारण ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) मृत्यूपेक्षा लॉकडाउनच्या दुर्घटनेमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाणच जास्त होत आहे.

‘लॉकडाऊन’नंतर काय ?

साहेब, ‘लॉकडाऊन’नंतर आरोग्य खात्याला जास्त महत्त्व द्या. त्या खात्याचे बजेट वाढवा. महाराष्ट्रभर जास्तीत जास्त उत्तम दवाखाने तयार करा. आज पहा वसई, विरार, ठाणे या मुंबईच्या अगदी जवळ राहणाऱ्या लोकांना जे मुंबईतून औषधे घेऊन जातात त्यांचे लोकल आणि बस बंद असल्याने अतिशय हाल होत आहेत. मग महाराष्ट्रातील इतर जनतेचे काय हाल होत असतील याचा कृपया विचार करा.

साहेब, उद्योग व कामगार मंत्र्यांना जास्तीत जास्त अधिकार आणि बजेट देऊन त्यांना अधिकाधिक रोजगार तयार करायला सांगा.

गृह खात्याला मोठे बजेट देऊन अत्याधुनिक पद्धतीची योजना राबवून पोलिसांना सुरक्षितता द्या. त्यांच्या विम्याची रक्कम मोठी करा. त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्या.

साहेब, पत्र वाढलंय. समजतंय. पण काय करावं. आपल्यावरील प्रेमापोटी हा सर्व उपद्व्याप करीत आहोत.

सत्तेचा आणि जीवनाचा अमरपट्टा

साहेब, सत्तेचा आणि जीवनाचा कोणीही अमर पट्टा घेऊन येत नाही. परंतु जितका काळ आपल्या हातात सत्ता आहे ती गरीब, वंचितांसाठी वापरली तर तो सत्ता राबविणारा मात्र अमर होऊन जातो.

आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवतोय. कारण गेल्या सहा महिन्यांत त्या तुम्हीच तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे वाढविलेल्या आहेत.

धन्यवाद !

पुन्हा एकदा जय महाराष्ट्र !

आपला,

ॲड. विश्वास काश्यप,

ताजा कलम :  वारकऱ्यांच्या वारीचा प्रश्न तात्काळ मिटवून टाका. तिकडे अनाजी पंतांनी वारकऱ्यांना भेटून राजकारण तुमच्याविरुद्ध सुरू केले आहे.  आणि हो तिकडे मोदी साहेबांच्या गुजरातचा लॉकडाऊन संपला सुद्धा फक्त दोन शहरे सोडून.

(लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात)

हे सुद्धा वाचा

PoliceDuty : मंत्रालयातील 1400 कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी

Shocking : मुंबईत 15 लाख रुग्ण, आमदार नितेश राणे यांचा दावा

Lockdown4 : कोविड पॉजिटीव्ह रुग्णांना सहकार्य करा, हीन वागणूक देऊ नका; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

OMG : मुंबईतील १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता!

Watch | Lockdown 4.0: A list of what is allowed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी