29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयलोकप्रिय गायक केके यांनी संगीतक्षेत्राला काय दिले याचे विश्लेषण करणारी हेमंत देसाई...

लोकप्रिय गायक केके यांनी संगीतक्षेत्राला काय दिले याचे विश्लेषण करणारी हेमंत देसाई यांची पोस्ट

टीम लय भारी 

मुंबई : म्युझिक म्हणजे प्रत्येकाचाच आवडीचा विषय. या संगीत विश्वातील आवाजामुळे माझ,तुमच,आमच,आणि आपल सर्वांचच आयुष्य कसं बहरुन गेलंय .मात्र याच संगीत विश्वातला एक सितारा आज काळाच्या पडद्यामागे गेलाय. लोकप्रिय गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुनथ यांच काल मंगळवारी निधन झालं आणि संपूर्ण गायन विश्वावर शोककळा पसरली आहे. केकेंच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. प्रत्येकानेच आपल्या सोशल मडियातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.केके यांनी संगीतक्षेत्राला काय दिले याचे विश्लेषण करणारी पोस्ट चित्रपटविषयक लिखाणास एक नवे वळण देणारे लेखक बाबू मोशाय म्हणजेच हेमंत देसाई यांनी लिहिलेय. (senior journalist hemant desai post on KKPassesAway)

अरे, हे काय जाण्याचे वय होते?… तुझे लाइव्ह कॉन्सर्ट बघायचे होते, अजून अल्बम्स ऐकाबघायचे होते. म्युझिक बँक, हंगामा, सारेगामा कॅराव्हान आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग आहे, पण तरी जिवंत माणूस आपल्या आसपास वावरतोय, गातोय आणि आपल्या जीवनाला एक सांगीतिक स्पर्श करतोय, ही जाणीव वेगळीच नाही का? आज अरमान व अमान मलिक, सिद्धार्थ महादेवन,अर्जित सिंग, दर्शन रावल यांचा काळ आहे. पण त्यांच्या अगोदरचा काळ केके, तुझा होता. केके, तुझा आवाज अफाट अवकाशात बेफाटपणे घुमायचा, त्याच्यातील चढत आणि बढत जबराट होती. खुदा जाने, आँखों में तेरी अजब सी, तू ही मेरी शब है अशी तुझी अनेक गाणी आठवतात. केके, तू केवढ्या मोठ्या प्रमाणात(3500) जिंगल्स गायला आहेस, आमच्या विनय मांडकेंसारखा! एकदा हरिहरनने तुझे गाणे ऐकले आणि तुला मुंबईला यायला सांगितले. पण तू पद्धतशीरपणे संगीताचे शिक्षण घेतलेले नाहीस आणि तरीही तुझ्यात गुणवत्ता आहे, हे हरीने जाणले नि तुला उत्तेजन दिले, ही किती मोठी गोष्ट आहे… किशोरकुमारनेही कुठलेही संगीत शिक्षण घेतले नव्हते, यावर विश्वास बसत नाही, पण खरी गोष्ट आहे. ‘माचिस’ मधील ‘छोड आये हम वो गलियाँ’ हे गाणे हरीहरन, सुरेश वाडकर, विनोद सहगल आणि केके, तू गायले आहेस. केके, तू तामिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली, मल्याळम, गुजराथी, आसामी आणि मराठीत सुद्धा गायला आहेस. लहानपणापासून तुला ‘मेहबूबा, मेहबूबा’ हे ‘शोले’ मधील गाणे आणि ‘राजा रानी’ या चित्रपटातील ‘जब अंधेरा होता है’ ही गाणी खूप आवडायची. ही दोन्ही गाणी राहुलदेव बर्मनची. 1970 च्या दशकातील त्या रचना आधुनिक, प्रयोगशील वळणाच्या होत्या आणि तुझ्या गायकीतही जागतिकीकरणानंतरची आधुनिकता दिसे. ‘हम दिल दिल दे चुके सनम’ मधील ‘तडप तडप’ वाली तुझी तगमग किंवा ‘मुझे कुछ कहना है’ मधील टायटल सॉंग वा ‘अक्स’ मधील ‘बंदा ये बिंदास है’ यामधील केके, तुझी शैली निराळीच होती. वेस्टर्न संगीताचा तुझ्यावरील प्रभाव नेहमीच जाणवला आणि हिंदी चित्रपटसंगीत 2000 पासून जे आरपार बदलले, त्याची सुरुवात तुझ्यासारख्यांपासून झाली. पुरुष गायकांमध्ये सर्वात उच्च व्होकल रेंज तुझ्यात दिसली. चढा सूर लावताना आवाजावरचे नियंत्रण तुझे कधीच गेले नाही. ‘अलविदा’ हे गीत याचेच उदाहरण होय. ‘तडप तडप’ या गाण्यातील भावोत्कटता आणि भावनांचा परमोच्च बिंदू गाठण्याची तुझी असोशी प्रकर्षाने जाणवली. ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ मधील ‘चली आयी’ गाण्यात चित्रा बरोबरचे तुझे अत्यंत पॅशनेट असे गाणे आहे. ‘दस बहाने’त तू धमाल केली आहेस. त्यात केके, तुझ्याबरोबर शानचा आवाज आहे आणि अभिषेक बच्चन त्यावर तुफान नाचतोय. अभिषेकची डान्सिंग स्टाइल मला नेहमीच आवडते. क्या मुझे प्यार है, बीतें लम्हें, लबों को, तू आशिकी है ही तुझी गाणी तुझ्या आर्ततायुक्त स्वरवैशिष्ट्यांसह प्रकट झाली. किशोर, मुकेश आणि रफीप्रमाणेच केके, तू खूप लवकर दिसेनासा झालास… आता ‘द ट्रेन’ मधील ‘ दर्द में भी ये लब मुस्कुरा जाते है, बीतें लम्हें हमें जब भी याद आते है’ हे गाणे आठवतो आणि तुझी याद पुन्हा पुन्हा जागवत राहतो.. केके, तुला श्रद्धांजली. असा लेख हेमंत देसाई यांनी लिहिला आहे.


हे सुद्धा वाचा :

पंडित जवाहरलाल नेहरू हे कर्तृत्व प्रत्येकाला माहीत असायलाच हवे, हेमंत देसाई यांचे विश्लेषण

ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी