28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयकोण रोहित पवार ? त्याची औकात काय ? मंत्री रवींद्र चव्हाण यांची...

कोण रोहित पवार ? त्याची औकात काय ? मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली

बागेश्वर धाम पीठाधीश्वर असलेले धीरेंद्रकृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर आणि कालीचरण महाराज या दोघांनी साईबाबा व महात्मा गांधी यांच्याबद्द्ल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहे. या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाना साधताना भोंदूबाबांच्या आड जाऊन महाराष्ट्रातील निवडणुका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका केल्यानंतर त्यावर भाजपचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोण रोहित पवार ? त्याची औकात काय ? अशी वाईट प्रतिक्रिया दिल्यामुळे सोशल मीडियावर वातावरण तापले आहे.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री उर्फ़ बागेश्वर यांनी “साईबाबा देव होऊ शकत नाही” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यापाठोपाठ कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढल्यामुळे वादळ माजले होते. त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करून भाजपवर अप्रत्यक्षरित्या शरसंधान साधले होते.

श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध ! पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत. याचा अंदाज येऊ लागलाय…असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं ! असे आव्हानही रोहित पवार यांनी भाजपचा स्पष्ट उल्लेख टाळून दिले होते.

मात्र, रोहित पवार यांनी ट्विटरवरून भाजपला धारेवर धरल्यानंतर डोंबिवली येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली. “रोहित पवार कोण ? त्याची काय औकात ? बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही, अशा शब्दात चव्हाण यांनी रोहित पवार यांची अवहेलना केली. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याला बोलण्याचा अधिकार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले होते.

हे सुद्धा वाचा
देशातील काही न्यूज पोर्टल्स आणि काही परदेशी माध्यमे भारतीय विचार आणि समाजाविरोधात प्रोपगंडा चालवत आहेत; अनुराग ठाकुर यांचा आरोप 

‘धनगड’ की ‘धनगर’ समाज? 10 एप्रिलला होणार अंतिम सुनावणी 

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ‘ग्रामसुरक्षा योजना’  
त्यावर रोहित पवार यांनी पुन्हा ट्विट करून उत्तर देताना ” रवींद्र चव्हाण साहेब, आपण भाजपचे सदस्यच नाहीत तर सुसंस्कृत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहात, असे चव्हाण यांना ध्यानात आणून दिले. पत्रकारांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही सावरकरांबद्दल उत्तर देताय, यावरून तुम्हाला त्यांचा प्रश्नच कळला नाही, हे दिसते, असे संयमी उत्तर पवार यांनी दिले आहे. मात्र, यावरून रोहित पवार आणि रवींद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असून सोशल मीडियावर दोन्ही बाजुंनी क्रिया, प्रतिक्रिया उमटत असल्याचे बघायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी