आज कर्नाटक विधानसभेचे निकाल स्पष्ट होत असून येथे काँग्रेसचा स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करेल. कर्नाटकात भाजपला मतदारांनी नाकारले असून देशपातळीवर या निकालाचे पडसाद पडत आहेत. कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे अभिनंदन केलेच, शिवाय 2024 साली देशात होणाऱ्या निवडणुकांनंतर वेगळंच चित्र असेल असे देखील ते म्हणाले. तसेच दोन दिवसांत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक बोलावली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकात भाजपचा धुव्वा उडाला असून काँग्रेसने मोठा विजय मिळवल्याचे स्पष्ट होत आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेस 133 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने भाजपला चितपट केले असून या विजयाचे श्रेय काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला दिले. कर्नाटकात स्थानिक मुद्द्यांवर निवडणुक लढवत, भाजपच्या प्रचाराची हवा काढत विजयी वाटचाल केली. दरम्यान आगामी काळात राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना मध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच लोकसभेची निवडणुक देखील 2024 मध्ये होऊ घातली आहे. भाजपला रोखण्यासाठी सध्या देशात महाआघाडीची चर्चा सुरु असली तरी अद्याप त्याला मुर्त रुप आलेले नाही. काँग्रेसच्या कर्नाटक विजयामुळे मात्र पक्षाला नवसंजीवनीच मिळालेली आहे.
कर्नाटक निवडणुकीनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना 2024 मध्ये देशात होणाऱ्या निवडणुकीनंतर वेगळे चित्र असेल असे सांगतानाच जात आणि धर्मावर निवडणुकी जिंकण्याचा प्रयत्न केल्यास नेहमीच यश मिळेल असे नाही, असा कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा अर्थ असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोदींच्या कर्नाटक प्रचारातील बजरंगबलीच्या मुद्द्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. हा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे होते असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे सध्या वातावरण आहे. राज्यात 2019 साली महाविकास आघाडीचे सुत्र पवार यांनी गुफल्याचे मानले जाते. देशातील अनेक नेते शरद पवार यांच्या भेटी घेत आहेत. नुकतेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मुंबई दौऱ्यावर शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी महाआघाडीचे नेतृत्व केल्यास मान्यच असेल असे देखील ते म्हणाले होते. कर्नाटक निवडणुकीमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुनावला असून आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर महाआघाडीसाठी काँग्रेस उत्सुक असेल का हे देखील महत्त्वाचे असणार आहे.
शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या वादळावेळी देशपातळीवरील अनेक नेत्यांनी त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून फोन केल्याचे पवार यांनी सांगितले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या नावाचा देखील त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे लोकसभेसाठी महाआघाडीची मोट बांधण्यास पवार पुढाकार घेतील का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, केसीआर या नेत्यांचे महाआघाडीबाबत अद्याप तरी कोणतेच अनुकुल मत झालेले नाही, अशावेळी देशपातळीवर सर्वांशी संवादाचे माध्यम म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.
हे सुद्धा वाचा
कर्नाटक : 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेस 119; स्पष्ट बहुमत!
एलन मस्क ट्विटरचे सीईओपद या महिलेकडे सोपविणार !
उद्धव ठाकरे यांनी विधान भवनाला घेराव घातला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
महाराष्ट्रात मविआ मजबूत ठेवण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. मविआच्या वज्रमुठ सभा देखील राज्यात होत आहेत. मात्र काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे मविआतील वातावरण हेलकावे खात असल्याचे चित्र देखील माध्यमांमधून दिसून येते अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार पून्हा तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर लगेचच राज्यात महाविकास आघाडीची बैठक बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले असून आगामी काळात राजकीय चित्र कसे असेल हे पाहावे लागणार आहे.