32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeराजकीयगांधी - नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले - उत्तरार्ध (शरद पवार यांचा...

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' या नावाने 'लय भारी'ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(शरद पवार) प्रसार माध्यमांचा गैरवापर करून हयात आणि हयात नसलेल्या व्यक्तींची अव्याहत बदनामी करणे हा उद्योग काही प्रवृत्तींनी मांडला आहे. या बदनामीतून महात्मा गांधींची देखील सुटका झाली नाही. परंतु, व्हॉट्सअॅप आणि इतर सामाजिक माध्यमांवरून सर्वाधिक लक्ष्य केले जाते आहे ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना! नेहरुंच्या जन्म, वंश आणि चारित्र्याबाबत अफवा पसरवून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली जाते. नेहरूंनी इतके आघात हयात असताना देखील सोसले नसतील. त्याचे मानसशास्त्र नेहरूंच्या यशस्वीतेत आहे. त्यांनी केलेल्या अजरामर कार्यात आहे. त्यांच्या अनमोल योगदानात आहे.
नेहरूंनी धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळ्या ठेवल्या, राष्ट्र निधर्मवादी केले ही पोटदुखी कडव्या, जातीयवादी शक्तींमध्ये आहे. नेहरू इतिहास, समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर राहिला तर ते राज्य अधोगतीकडे जाते हे त्यांनी जाणले होते. देशाच्या फाळणीनंतर देखील भारत देश विविध जाती-धर्म, भाषा आणि संस्कृतींनी युक्त होता. ‘एक देश–एक धर्म’ हे सूत्र देशाला बांधू शकत नाही आणि एका धर्माच्या पुरस्काराने देशात शांतता आणि सौख्य नांदू शकत नाही हे त्यांचे ठाम मत होते. भारत हे धर्मराष्ट्र होऊ शकते, ही भीती देखील भारत-पाक फाळणीचे कारण होते. मुस्लीमच नव्हे तर शिख, बौद्ध , जैन धर्मीय देखील भारतीय लोकशाहीचे घटक आहेत. लोकशाही गणराज्यात त्यांना विश्वास देणे ही सत्ताप्रमुखाची जबाबदारी असते ती त्यांनी पार पाडली.

sharad pawar slams narendra modi narrated mahatma gandhi pandit jawaharlal neharu

नेहरूंच्या या सर्वसमावेशक धोरणामुळे देशाचे भलेच झाले आहे, नुकसान नाही.
दुसरी पोटदुखी वेगळीच आहे. काहींना विश्वगुरू व्हायचे आहे. नेहरूंसारख्या विश्वात वंद्य असणाऱ्या व्यक्तीला इतिहासातून आणि नव्या पिढीच्या नजरेतून नामशेष केल्याशिवाय त्यांना स्वतंत्र भारतातील मीच सर्वात प्रभावी आणि मोठे नेतृत्व असल्याचा दावा करता येणार नाही. ही मानसिकता नेहरूंच्या मुळावर येते. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला, फाळणीच्या जखमांनी विव्हळणारा, पाकिस्तानच्या टोळ्यांचे पाशवी आघात सहन केलेला कोलमडलेला, विपन्न देश नेहरूंनी कसा उभा केला याचे जगाला आश्चर्य वाटले. त्याकाळी एका मागास देशाचे नेतृत्व करत असताना देखील त्यांची जगातील प्रमुख नेत्यांमध्ये नोंद घेतली जात होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात आलिप्तवादी धोरण स्वीकारले असताना देखील पंडित नेहरू एकटे पडले नाहीत. विकसित देशांमध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारताला वेगळा मान होता. नेहरूंची मानहानी करून तसा मान मिळवण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे.
निधर्मवाद स्वीकारून, विज्ञानाची कास धरून नव्या विचारांची पिढी घडवण्यासाठी पंडित नेहरू शेवटपर्यंत कटिबद्ध राहिले. पायाभूत सुविधा, शेती, सिंचन, अणूऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, उच्च शिक्षण वगैरे क्षेत्रांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत देखील त्यांनी मुलभूत व भरीव कामगिरी केली. आज भारत ही एक महाशक्ती म्हणून गणली जात आहे याचे श्रेय त्यांनी केलेल्या पायाभरणीत आहे. त्यांच्या विचार आणि कृतीची पाळेमुळे इतकी घट्ट रूजली आहेत की, माध्यमांचा अतिरेकी गैरवापर करून उखडून टाकणे सोपे नाही. नेहरूंची बदनामी करत असताना त्यांनी भारताचे कसे नुकसान केले याचा देखील पाढा सामाजिक माध्यमांद्वारे वाचला जातो. नव्या पिढीची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.

Mahatma Gandhi - Pandit Jawaharlal Neharu
‘गांधी – नेहरू यांनी देशांचं खरंच नुकसान केलं का ?’ हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा

नेहरू प्रामुख्याने चीन धोरणावरून टीकेचे बळी ठरतात. चीनबरोबर पंचशील करून नेहरू गाफील राहिले आणि चीनने आक्रमण ओढवून घेतले, अशी टीका नेहरूंवर केली जाते. नेहरूंचे धोरण हे मुळातच आदर्शवादी आणि मानवतावादी होते. त्याच्याशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. १९५० मध्ये माओच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकारने तिबेटवर बेकायदा कब्जा केला. १९५९ च्या मार्च महिन्यात तिबेटमध्ये उठाव झाला तो चीनने बळाचा वापर करून दडपून टाकला. दलाई लामांसह जवळजवळ लाखभर शरणार्थी भारतात आले. भारताने चीनच्या कृतीला विरोध केला. शरणार्थींना आश्रय दिला. ही नेहरूंची चूक कशी होऊ शकेल? एखादा स्वायत्त, स्वतंत्र प्रदेश चीनने ताब्यात घ्यावा आणि भारताने त्याचे समर्थन करावे हे कसे शक्य होते?
नेहरूंना १९६१ मधील फॉरवर्ड पॉलिसीबद्दल दोष दिला जातो. तिबेट ताब्यात घेऊनही चीन गप्प बसला नव्हता. भारताच्या हद्दीत देखील त्याने अतिक्रमण केले. त्याचा विरोध करणे, सीमेवर आपल्या चौक्या, गस्तीपथके वाढवणे हे आवश्यक होते. या नितीचे आजही समर्थन करावयास हवे. नेहरूंच्या या धोरणांमुळे १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, बराचसा भूभाग घशात घातला असा आरोप केला जातो. पण त्यामुळे धोरण चुकीचे होते असे म्हणता येत नाही. इतर कोणत्याही राज्यकर्त्याने हेच केले असते. भारताला चीनी आक्रमणाची चाहूल लागली नाही, याला देखील काही कारणे आहेत. १९५४-५५ आणि १९५८ मध्ये चीन आणि तैवानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. १९५८ मध्ये चीन-तैवान खाडीयुद्ध चार महिने चालू होते. या युद्धात अमेरिकेने तैवानला सर्वोतोपरी मदत केली. या पार्श्वभूमीवर चीन भारतावर आक्रमण करील, अशी आशा नव्हती. पण चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. भारताला पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. पंडित नेहरूंना याचा मोठा धक्का बसला. परंतु, तरीदेखील त्यांनी आलिप्तवादी धोरण सोडले नाही, ते खंबीर राहिले, शीतयुद्धातील महाशक्तींबरोबर गेले नाहीत. नेहरूंच्या या धोरणांचा विरोध करणारे, नेहरूंमुळे देशाचे नुकसान झाले असे म्हणणारे यांच्याकडे ‘नेहरूंच्या चीन विषयक धोरणाला पर्यायी धोरण कोणते असावयास होते’ याचे व्यवहार्य उत्तर आजही नाही.
लडाखमध्ये पॅन्गॉन्ग त्सो सरोवराची चीनच्या दिशेकडील टोके हाताच्या बोटाप्रमाणे आहेत. त्या बोटांवरून चीनी व भारतीय सैन्यात चकमकी होत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्याऐवजी सध्याच्या सरकारने बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना नेहरूंच्या फॉरवर्ड पॉलिसीला दोष देण्याचा नैतिक अधिकार नाही.
विषय खूप मोठा आहे. मी काही महत्त्वांच्या घटनांचे विवेचन करून गांधी-नेहरूंनी देशाचे नुकसान केले अथवा नाही याची चिकित्सा केली आहे. देशाच्या नेतृत्वाला स्थळ-काळ सापेक्ष निर्णय घ्यावे लागतात. त्यांनी घेतलेल्या तत्कालीन निर्णयांची, राबवलेल्या धोरणांची आज समीक्षा करताना त्या स्थळ-काळाचे भान ठेवावे लागते. अन्यथा नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेवर अन्याय होतो. राजकीय स्वार्थापोटी असे करू नये. गांधी-नेहरूंसारख्या असामान्य व्यक्तिमत्वांवर नाहक टीका आणि त्यांची बदनामी करणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे की, प्रसारमाध्यमे ताब्यात घेऊन, प्रसिद्धी तंत्राचा वापर करून निर्माण केलेली प्रतिमा आभासी असते. आपल्या देशाचे ब्रीद वाक्य ‘सत्यमेव जयते!’ आहे. सत्य निर्भय आणि चिरंजीवी असते हे त्यांनी विसरू नये (समाप्त).

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरही ते दीर्घकाळ होते.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी