30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे वंचितला मविआमध्ये सहभागी करुन घेण्यात यशस्वी होतील का?

उद्धव ठाकरे वंचितला मविआमध्ये सहभागी करुन घेण्यात यशस्वी होतील का?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा केली. सोमवारी (दि. २३) रोजी दादर पुर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत युती झाल्याचे जाहीर केले. मात्र आता वंचित बहुजन आघाडीला (VBA) महाविकास आघाडीमध्ये (MVA) सामील करुन घेणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. आजच्या पत्रकापरिषदेत उद्धव ठाकरे यांनी वंचितने मविआचा घटक म्हणून वाटचाल करायला हरकत नाही असे म्हटले. त्यामुळे वंचितला देखील मविआत आणण्याबाबत ते उत्सुक असल्याचे दिसून आले. (Uddhav Thackeray Will successful Alliance VBA and MVA?)

सन २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षात कोसळले आणि शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारला आता सहा महिने झाले.

शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पडझड झाली आणि शिवसेना दोन गटांमध्ये विभागली त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रीत येत युतीची घोषणा केली. मात्र शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने आता वंचित देखील महाविकास आघाडीत सहभागी होणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आजच्या पत्रकारपरिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि आमचे शेतावरुन भांडण नसल्याचे म्हणत राजकारणात काहीही होऊ शकते याकडे लक्ष वेधले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मविआचा घटक म्हणून वाटचाल करायला हरकत नाही असे म्हणत एक प्रकारे त्यांना मविआत येण्याचे निमंत्रणच दिले आहे.

मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मात्र तशी अधिकृतपणे कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांची काय भूमिका असेल याबाबत अद्याप काही चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शरद पवार आणि आमचं शेताच भांडण नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमच्या युतीचा स्विकार करेल असे देखील म्हटले. तर उद्धव ठाकरे यांच्या मविआच्या दिशेने वाटचाल करा या विधानामुळे उद्धव ठाकरे आता वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार का ? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शरद पवार यांनी शिवसेना वंचितच्या युतीबाबत प्रतिक्रीया देताना मला यातील काही माहिती नाही असे विधान केले आहे. त्यामुळे पुढे महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेण्यासाठी शरद पवार अनुकूल होतील का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

आता उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात काढला पेन ड्राईव्ह; काय आहे त्या फिल्ममध्ये?

हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचा इतिहास झाला प्रकाशमान

CISF मध्ये निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा..!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर शिवसेना आणि वंचित आता एकत्र निवडणुक लढतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेत एक अंकी संख्याबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार की महापालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुका लढणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता वंचित बहूजन आघाडीची युती केवळ शिवसेनेसोबत राहणार की उद्धव ठाकरे वंचितला मविआमध्ये सहभागी करुन घेण्यात यशस्वी होतील याची वाट पहावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी