35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईचंद्रकांत पाटील, मुनगंटीवार राज्यपालांकडून हात हलवत परत का आले ? : संजय...

चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार राज्यपालांकडून हात हलवत परत का आले ? : संजय राऊत यांची कोपरखळी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार वारंवार सांगत आहेत की, जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मग ते राज्यपालांकडून हात हलवत परत का आले. त्यांनी भाजप समर्थक 145 आमदारांची यादी सोबत घेऊन जायला हवी होती, अशी कोपरखळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मारली. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज दुसऱ्यांदा राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढविला. भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 105 आमदार आहेत. त्यांनी सरकार स्थापन करावे. परंतु ते सरकार स्थापन करीत नाहीत. कारण बहुमतासाठी आवश्यक असलेलेले 145 आमदारांचे संख्याबळ तयार करण्यात त्यांना यश येत नाही. सन 2014 मध्ये अपुऱ्या संख्येवरच भाजपने सरकार स्थापन केले होते. तसे त्यांनी आताही करावे. पण ते करणार नाहीत. कारण सन 2014 पेक्षा आताची परिस्थिती वेगळी आहे. बेकायदा कामे करणे, पोलिस बळाचा वापर, धमक्या देणे हे आता चालणार नाही. सत्तेचा माज आणि मस्ती जेव्हा उतरते तेव्हा साम, दाम, दंड ही नीती चालत नाही. सत्ता असेल तरच हे सगळे चालते, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

विद्यमान सरकारची मुदत आठ तारखेपर्यंत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. बहुमत नसल्याने ते सरकार स्थापन करीत नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सत्तेची हवस त्यांना आहे. ते कायदेशीर पेच तयार करीत आहेत. कोणत्याही पद्धतीत अन्य पक्षांचे सरकार नाही आले पाहीजे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. संविधान त्यांची जहागीर असल्याप्रमाणे वागत आहेत. संविधान हे जनतेचे आहे, असेही राऊत यांनी ठणकावले.

देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत. त्यांनाच आम्ही मुख्यमंत्री करणार आहोत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी विधान केले होते. त्याचाही समाचार राऊत यांनी घेतला. फडणवीस जर शिवसैनिक आहेत, तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करायला सांगा. शिवसैनिक खोटे बोलत नाही. सत्तेसाठी तो पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसैनिक वचनाला जागतो अशा कानपिचक्या राऊत यांनी दिल्या.

भाजपने स्वतः सरकार स्थापन करावे. विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे. त्यांना जमत नसेल तर आमच्याकडे पर्याय आहे. आम्ही आमचे बहुमत विधीमंडळात सिद्ध करून दाखवू असे आव्हानही राऊत यांनी दिले. युतीमध्ये जे ठरले होते त्यानुसारच सत्तेचे वाटप झाले पाहीजे. शिवसेनेचा अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाला पाहीजे ही आमची मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत याच भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अस्थितरता महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. या राज्याला लवकरात लवकर सरकार मिळावे. महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी, नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने भावना व्यक्त केली आहे. या पुढे राज्याचे नेतृत्व शिवसेनाच करेल. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी