35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजआज नव्या सरकारचा निर्णय होणे गरजेचे, अन्यथा....

आज नव्या सरकारचा निर्णय होणे गरजेचे, अन्यथा….

लय भारी न्यूज नेटवर्क


मुंबई :
 भाजपप्रणीत जुन्या सरकारचा कार्यकाळ आज मध्यरात्री 12 वाजता संपत आहे. 145 आमदारांचे पाठबळ नसल्याने भाजपही नव्या सरकारच्या स्थापनेसाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे घटनात्मक तरतुदींचा कीस काढायला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना काल उशिरा पाचारण केले. त्यामुळे आता नव्या सरकारबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आज उशिरापर्यंत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करणे आवश्यक आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नवे सरकार आस्तित्वात आले नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते असे बोलले जात आहे. परंतु राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीची परिस्थिती अजून आलेली नाही, त्यामुळे एवढ्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असे घटनात्मक तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

  1. घटनेचे अभ्यासक सुभाष काश्यप, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, विधीमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे या तज्ज्ञांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना विविध शक्यता व्यक्त केल्या आहेत. भाजप व शिवसेनेनेही आपल्या भूमिका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार खालील घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत.निवडणुकीनंतर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतो, असा सर्वसाधारण रिवाज आहे. पण घटनेत अशी कोणतीच तरतूद नाही. घटनेनुसार, सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. या मोठ्या पक्षाकडे बहुमत नसेल तर, त्यांना राज्यपाल विशिष्ट मुदत देऊन त्या कालावधीत विधीमंडळाच्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतात. त्यानुसार विद्यमान राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी सुचना करणे अपेक्षित आहे. यांत अगोदरच खूप उशीर झाला असल्याचे घटनातज्ज्ञांचे मत आहे.
  2. सर्वात मोठ्या पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही, तर राज्यपाल दुसऱ्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतात. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेला हीच अपेक्षा आहे. राज्यपालांनी भाजपला सत्तेसाठी पाचारण करावे. परंतु भाजप सभागृहात बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे शिवसेनेला वाटते. भाजपला अपयश आल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रित करावे. शिवसेना सभागृहात (काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने) बहुमत सिद्ध करेल, असे संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सुचित केले आहे.
  1. जुन्या सरकारचा कार्यकाळ संपत असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ पाचारण करणे अपेक्षित आहे. परंतु बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्याने भाजप वेळकाढूपणा करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारला काळजीवाहू सरकार म्हणून आणखी काही दिवस कारभार पाहण्यास सांगू शकतात. जुन्या सरकारचा कार्यकाळ संपला तरी राज्यपाल त्यांच्या अधिकारात जुन्या सरकारला आणखी काही काळ काम पाहण्यास सांगू शकतात. कर्नाटक, गोवा येथील राज्यपालांनी भाजपहिताचे निर्णय घेतले होते. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपालांनीही घटनेचा अर्थ भाजपहिताच्या दृष्टीने लावल्यास नवल वाटायला नको. वेळ मारून नेण्याच्या दृष्टीने राज्यपाल भाजपहिताचा निर्णय घेऊ शकतात.
  1. फडणवीस सरकारला काळजीवाहू सरकार म्हणून आणखी काही दिवस संधी दिल्यास भाजप व शिवसेना यांच्यात समेट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्यास स्थिर सरकार सत्तेवर येण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा होईल.
  1. राज्यपाल भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आजच सुचना करू शकतात. बहुमत सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या कालावधीत भाजपचे नेते शिवसेनेची मनधरणी करू शकतात. असे झाल्यास भाजप सभागृहात बहुमत सिद्ध करू शकते.
  1. मागील सरकारमध्ये भाजपने शिवसेनेची गळचेपी केली होती. याचा राग शिवसेनेच्या मनात सलत आहे. त्यामुळे सत्तेत समान वाटा व अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या फार्म्यूल्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेना सध्या तरी एकही पाऊल मागे घ्यायला तयार नाही, तर दुसऱ्या बाजूला भाजप मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला राजी नाही. अशातच शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला हवा, असे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उघडपणे बोलू लागले आहेत. किंबहूना शिवसेना सरकार स्थापन करणार असेल तर काँग्रेस व राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देऊ शकते. सध्या शिवसेनेने भाजपसोबत प्रचंड ताणून धरले आहे. त्याचे कारण म्हणजे, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा शिवसेनेला पडद्यामागे शब्द मिळालेला असू शकतो.
  1. राज्यात स्थिर सरकार येणे गरजेचे आहे असे सांगत शरद पवार यांनी सन 2014 मध्ये भाजपला पाठींबा दिला होता. हा मुद्दा उपस्थित करून पवार शिवसेनेला पाठिंबा द्यायची भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेमधील प्रचंड आत्मविश्वास पाहता सध्या तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून टॉनिक मिळालेले असण्याची शक्यता दिसत आहे.

8. मावळत्या सरकारचा कार्यकाळ संपल्यामुळे देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. परंतु राजीनामा दिल्यानंतरही फडणवीस यांनाच काळजीवाहू सरकारची जबाबदारी पार पाडण्यास राज्यपालांकडून सांगितले जाऊ शकते.

वरील सगळे मुद्दे लक्षात घेता राज्यपालांनी भाजपला तात्काळ सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणे आवश्यक आहे. परंतु भाजपसाठी हा निर्णय अवघड आहे. त्यामुळे विद्यमान फडणवीस सरकारलाच आणखी काही दिवस काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहण्याचा निर्णय राज्यपाल संधी देऊ शकतात. त्यामुळे भाजपला शिवसेनेसोबत बार्गेनिंग करण्यासाठी आणखी काही दिवस मिळतील, असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी