29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजVidhanSabha 2019 : भाजपच्या धनगर नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

VidhanSabha 2019 : भाजपच्या धनगर नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीत एका धनगर उमेदवाराला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेल्या व्यक्तीलाच राष्ट्रवादीने तिकिट दिले आहे.

पडळकर यांचे मित्र उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने तिकिट दिले आहे. माळशिरस येथून जानकर निवडणूक लढवतील. माळशिरस हा विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ रिपब्लीकन पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. असे असले तरी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सल्ल्यानेच रिपाईंचा उमेदवार निश्चित केला जाईल. विशेष म्हणजे, जानकर हे सुद्धा भाजपमध्येच कार्यरत होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका नेत्याला आपल्या गोटात खेचण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. दुसऱ्या बाजूला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात वचपा काढण्याची संधीही साधली आहे.

VidhanSabha 2019 : भाजपच्या धनगर नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये कट्टर वैर आहे. सन 2009 मध्ये उत्तमराव जानकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना घसघशीत मतदान मिळाले होते. पण त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविले होते. त्यानंतर जानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने जानकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविले. त्यामुळे त्यांना आता निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण चेहऱ्यांना संधी

जानकर यांची माळशिरसमध्ये मोठी ताकद आहे. ऊस शेतकरी तसेच धनगर समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणात व राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे ते रिपाईंच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर देतील, असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी