शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे हिंदवी स्वराजचे संस्थापक, स्वराज्यरक्षकांच्या पुण्यतिथीकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवरायांना अभिवादन करायला, या राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीस श्रद्धा-सुमने अर्पण करायला एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस अँड कंपनीला वेळ नाही. कारण ही मंडळी छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या सावरकरांच्या गौरव यात्रेत मश्गुल झालेली आहेत.
हिंदू हृदय सम्राट, महान पराक्रमी असा रयतेचा राजा, हिंदवी स्वराजचे संस्थापक, राष्ट्र नायक, थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 343 वी पुण्यतिथी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं दीर्घ आजाराने निधन झाले होते. अशा या स्वराज्य रक्षक, महापराक्रमी राजाला श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याला वेळ नसावा, हे केव्हढे या राष्ट्राचे दुर्दैव! त्याऐवजी ही मंडळी करतआहेत काय? तर – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवासाठी यात्रेत मश्गुल आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर निवडणूक लढणाऱ्या, महाराजांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या या मंडळींना आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा त्यांची बदनामी करणारे विनायक सावरकर हे जास्त प्राधान्याचे वाटू लागले आहेत. महाराजांची पुण्यतिथी दुर्लक्षून त्यांची बदनामी करणाऱ्या सावरकरांच्या गौरवात रममाण असलेल्या शिंदे-फडणवीस अँड कंपनीच्या कृतीचा अर्थ तरी महाराष्ट्राने काय घ्यावा.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरित्या जारी केला गेलेला शिंदे-फडणवीस यांचा आजचा सरकारी कार्यक्रम (दौरा) खाली जसाच्या तसा दिलेला आहे. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे संध्याकाळी सावरकर गौरव यात्रा कार्यक्रमात सामील होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे दिवसभर सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारी बैठकात व्यस्त आहेत. शिवरायांना श्रद्धांजली वाहण्याचा कोणताही सरकारी अधिकृत कार्यक्रम यात दिसत नाही.
मा.मुख्यमंत्री महोदय यांचे सोमवार, दि.३ एप्रिल २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी १२.०० वा.
एम.आर.व्ही.सी. प्रकल्पांबाबत सादरीकरण
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
दुपारी ०२.०० वा.
नाबार्ड स्टेट क्रेडीट सेमिनार
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
दुपारी ०३.०० वा.
राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
सायं. ०४.०० वा.
कोयना परिसरातील ग्रामविकास विभागाकडे सुरु असलेली जल वाहतूक सुविधा पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत बैठक.
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
सायं. ०५.०० वा.
जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथील इमारतीचे व वसतिगृहाचे बांधकामाबाबत आढावा बैठक
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
(मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत कार्यक्रम/ दौरा)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम
(सोमवार, दि. 3 एप्रिल 2023)
दुपारी 12 वाजता : एमआरव्हीसी प्रकल्पाबाबत बैठक, सह्याद्री, मुंबई
दुपारी 2 वाजता : नाबार्ड स्टेट क्रेडीट सेमिनार, सह्याद्री, मुंबई
दुपारी 3 वाजता : राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक, सह्याद्री, मुंबई
सायं. 7 वाजता : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, बंदरपाखाडी, मनपा शाळेजवळ, कांदिवली (प.), मुंबई
(उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत कार्यक्रम/ दौरा)
भाजपासाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणूक प्रचारात वापरण्यापुरते आहे काय, असा संतप्त सवाल शिवप्रेमी आज करू लागले आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांचे शिवरायप्रेमही बेगडी असल्याची भावना व्यक्त होत आहे. (फोटो सौजन्य : गुगल)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान सोशल मीडियात शिवरायांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही बातमी लिहीपर्यंत तरी तसेही काही केलेले दिसत नाही. मुंबईतील सरकारी कार्यक्रमाव्यतिरिक्त फडणवीस सकाळी नागपुरात असल्याचे त्यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टवरुन दिसते. सेपक टॉकरा या खेळाबाबात, नागपूर लॉजिस्टिक हब, जी-20 मेयो हॉस्पिटल तसेच इतर कार्यक्रमांच्या पोस्टस् त्यांनी सोशल मीडियात केल्या आहेत. अगदी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांनाही त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र, शिवरायांचे कृतज्ञ स्मरण करायचा फडणवीस यांना विसर पडला आहे.
हे सुद्धा वाचा :
शिंदे-फडणवीसांची सावरकर गौरवयात्रा म्हणजे अदानी बचाओ यात्रा; राऊतांचा निशाणा
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाली असा कोणताच पुरावा नाही,सुप्रिया सुळे
एकनाथ शिंदे यांचे सोशल प्रोफाईल सावरकरांना वाहिलेले, ज्यांच्या नावे राजकारण करताहेत त्या शिवरायांना मात्र स्थान नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक व ट्विटर कव्हर फोटो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या सावरकर यांना मानाचे स्थान दिलेले आहे. मात्र पुण्यतिथी असूनही राजांना कव्हर फोटो किंवा प्रोफाईल इमेजमध्ये कोणतेही स्थान दिलेले नाही. सावरकर यांनी लिखाणातून केलेल्या बदनामीबाबत शिंदे-फडणवीस यांची काय भूमिका आहे, ते त्यांनी जाहीर करायला हवे. त्यांना शिवरायांची सावरकरांनी केलेली बदनामी मान्य आहे का? असा संतप्त सवाल आज सारे शिवप्रेमी करू लागले आहेत.
सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ? सविस्तर इथे वाचा