31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजIndia vs China : चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद

India vs China : चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद

टीम लय भारी

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खो-यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत (India vs China) भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले आहेत. भारतीय लष्कराने या बातमीला दुजोरा दिला आहे. भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

याअगोदर, या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, तामिळनाडूच्या रामानाथपुरम जिल्ह्याचे रहिवासी जवान पलानी तसेच झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी गावाचे कुंदन ओझा यांनाही हौतात्म्य आल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, गलवानच्या या चकमकीत चीनी सैन्यातील ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही ‘एएनआय’ने वर्तवली आहे.

दरम्यान, शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

२० जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्करानेही दुजोरा दिला आहे. चकमकीत जखमी झालेले १७ जवानदेखील शहीद झाल्याने एकूण संख्या २० झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे.

दरम्यान या चकमकीत चीनचेही नुकसान झाले आहे. चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून गंभीर जखमी झाले आहेत.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितलं आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.

चीनने भारतीय सैन्यांनी वास्तविक नियंत्रण रेखा पार करुन दोन वेळा आपल्या सैन्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान भारताकडूनही परराष्ट्र मंत्रालयानेही संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला असून चीनकडून वास्तविक नियंत्रण रेखा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “१५ जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं”.

“सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यपही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहोत,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सीमा व्यवस्थापनाकडे एक जबाबदार देश म्हणून पाहताना भारत वास्तविक नियंत्रण रेषेच्या आतमध्ये राहूनच हालचाल करणार हे स्पष्ट आहे. चीनकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करत आहोत असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी