26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeटॉप न्यूजCorona : कोरोनाला रोखण्यासाठी लागणार ५ वर्षांचा कालावधी!

Corona : कोरोनाला रोखण्यासाठी लागणार ५ वर्षांचा कालावधी!

जगभरातील लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात (Corona) लस तयार होणे २०२४ च्या अखेरपर्यंत अशक्य!

कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?

सर्व लोकांना लस पुरवण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागणार, त्याची व्यवस्था कशी करणार?

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचे सवाल

कोरोनाला रोखण्याचे भारतासमोर सर्वात मोठे आव्हान

टीम लय भारी

नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात कोरोनाने (Corona) विळखा घातला आहे. कोरोना व्हायरस रोखणे हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. देशासमोरील या आव्हानावर भाष्य करताना सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी शनिवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनावरील लस खरेदी आणि वितरणासाठी पुढील वर्षी जवळपास ८० हजार कोटी खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे भारत सरकार पुढच्या वर्षी ८० हजार कोटी उपलब्ध करणार का? असे त्यांनी विचारले आहे.

तसेच भारतात कोणत्याही प्रकारची लस आणि वितरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगीची गरज असते. त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मी हा प्रश्न विचारला कारण आपल्याला त्यासाठी प्लॅनिंग आणि उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे अदार पूनावाला म्हणाले.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ती कोरोना व्हायरससाठी वेगवेगळ्या लसींवर काम करत आहेत. त्याच्या विविध संभाव्य लसींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी असलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसीचा समावेश आहे, जी सध्या जगात सर्वात चर्चेत आहे. त्याचबरोबर इंस्टीट्यूट स्वतःची लसही विकसित करीत आहे. २०२४ च्या अखेरपर्यंत जगभरातील लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात लस तयार होऊ शकणार नाही.

मागील आठवड्यात फायनेंशियल टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार अदार पूनावाला यांनी सांगितले होते की, औषध निर्मिती करत असलेल्या कंपन्या कमी कालावधीत संपूर्ण जगभराला लस पुरवू शकत नाहीत. त्या प्रमाणात उत्पादन क्षमता विकसित झालेली नाही. पृथ्वीवरील सर्व लोकांना लस पुरवण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. तसेच एका व्यक्तीसाठी जर लसीचे २ डोस लागत असतील संपूर्ण जगभरासाठी १५ अब्ज डोजची गरज भासू शकेल.

अदार पूनावाला यांनी भारतातील १.४ अब्ज लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी चिंता व्यक्त केली होती. कारण लसीच्या वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी कोल्ड चेन सिस्टिम सध्या उपलब्ध नाही. लस तयार केल्यानंतर कमी तापमानाच्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवावी लागते. एका जागेवरून इतर ठिकाणी नेण्यासाठी कोल्ड सिस्टिम असणे गरजेचे असते. मागच्या आठवड्यात कोल्ड चेन सिस्टिमबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञ डॉ. फाऊची यांनीही चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बत ८५ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले. तर ९० हजारांहून जास्त कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होण्याची

जागतिक आरोग्य संघटनेला भीती

 

कोरोना या महामारीशी सगळे जग सामना करते आहे. अशात कोरोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत. असे असले तरीही कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही शक्यताच आहे मात्र ही एक दु:खद बाबच आम्ही मानतो आहोत.

सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत. अशात कोरोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

माईक रेयान यूएन एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती बोलून दाखवली आहे. कोरोना व्हायरसची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यामुळे येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात ही शक्यता अधिक आहे असंही रेयान यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त, रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहे तर भारतात ही एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी