राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवारांनी महाराष्ट्राला शांततेचे आवाहन केले आहे. सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या, असे त्यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वसामान्य माणसांनी पोलिस यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य द्यायची गरज आहे, असेही ते म्हणाले.
बारामतीमध्ये स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून पवारांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे, की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घ्या.”
शासकीय यंत्रणा विशेषतः पोलिस यंत्रणा जी पावले टाकते, त्या यंत्रणेला सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज आहे, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “आपण सर्वांनी यंत्रणेला सहकार्य केले, तर परिस्थिती तातडीने बदलली, असे चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर अथवा अन्य शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी शांतता निर्माण केलीच पाहिजे.”

हे सुद्धा वाचा :
देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र ; शरद पवार
रोहित पवार म्हणाले, आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःख होतंय
दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, ताराराणींचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, “काही लोक चुकीचे वागत असतील; पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल. त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढेच आवाहन आहे.”
