जर्मनी ठप्प झाली आहे. संपूर्ण सार्वजनिक दळणवळण बंद आहे. EVG व वर्दी युनियनचा हा दशकातील सर्वात मोठा वाहतूक संप ठरला आहे. 10.5 टक्के वेतनवाढीच्या मागणीसाठी दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटी फिस्कटल्याने हा 24 तासांचा देशव्यापी संप सुरू झाला आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून जर्मनीमधील जवळजवळ सर्व विमाने, ट्रेन आणि बसेस ठप्प झाल्या आहेत. मात्र, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर या संपाचा परिणाम मर्यादित असेल, असे आर्थिक तज्ञांनी म्हटले आहे.
जर्मनीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अशी हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लांब पल्ल्याच्या आणि प्रादेशिक रेल्वे गाड्या तसेच बस व स्थानिक सार्वजनिक वाहतूक पूर्णत: प्रभावित झाली आहे. जर्मन रेल्वे नेटवर्क ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गोदी कामगार संपावर सामील झाल्यामुळे रेल्वे नेटवर्क आणि देशाच्या बंदरांवर दोन्ही मालवाहू वाहतुकीलाही फटका बसला आहे.

बाडेन-वुर्टेमबर्ग, हेस्से, लोअर सॅक्सनी, नॉर्थ राईन-वेस्टफेलिया, राईनलँड-पॅलॅटिनेट, सॅक्सनी आणि बव्हेरिया या सात जर्मन राज्यांमध्ये संपामुळे बस, ट्राम तसेच भूमिगत मेट्रो सेवा यांसारख्या स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवादेखील ठप्प आहेत. याचा परिणाम म्हणून, बहुतेक प्रवाशांनी कार आणि सायकलला प्राधान्य दिल्याने रस्त्यावर वाहतूकसमस्या झालेली आहे.
BER बर्लिन ब्रँडनबर्ग विमानतळ वगळता प्रत्येक प्रमुख जर्मन आंतरराष्ट्रीय विमानतळ संपामुळे प्रभावित झाले. देशभरात, सुमारे 4,00,000 प्रवाशांना विलंब किंवा उड्डाण रद्द होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर्मनीतील सर्वात मोठ्या हब, फ्रँकफर्ट येथे, सर्व इनकमिंग आणि आउटबाउंड फ्लाइट्स सोमवारी संपूर्ण रद्द करण्यात आल्या. काही लांब पल्ल्याच्या फ्लाइट्सच्या बाबतीत उड्डाण एक दिवस लांबणीवर टाकण्यात आले आहे. म्युनिक आंतरराष्ट्रीय विमानतळाने संप आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन रविवारी आधीच उड्डाणे थांबवली होती. सोमवारीही सर्व प्रवासी उड्डाणे बंद आहेत. या संपामुळे अनेक प्रमुख बंदरातील कामकाज आणि बंदरांवरील व्यावसायिक व प्रवासी वाहतूकही ठप्प आहे.
वर्दी युनियन या जर्मनीतील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे सुमारे 25 लाख कर्मचारी संपात उतरल्याचे वर्दी युनियनचे प्रमुख फ्रँक वेर्नेके यांनी सांगितले. हा दशकांतील सर्वात मोठा संप असल्याचे ते म्हणाले. तर, 30,000 हून अधिक रेल्वे कामगार संपात सामील असल्याचे EVG युनियनने सांगितले.
गेला आठवडाभर या संपायची तयारी सुरू होती. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसातही सार्वजनिक प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक सार्वजनिक वाहतूक, बस, रेल्वे आणि विमानतळ ग्राउंड स्टाफ यासह सार्वजनिक क्षेत्रातील अनेक वाहतूक नियोक्त्यांसोबत EVG आणि वर्दी या दोन प्रमुख कामगार युनियन्सच्या गेले अनेक दिवस वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, चर्चेच्या दोन फेऱ्यात समाधानकारक तोडगा न निघाल्याने चर्चेच्या तिसऱ्या फेरीच्या प्रारंभी हा 24 तासांचा संप पुकारण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :
तर संप अटळ; जुनी पेन्शन योजनेत 14 लाख कर्मचारी आक्रमक
यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश; गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या!
50 हजार सैनिकांना यमसदनी पाठवणारी विषकन्या : माता हारी
जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?

राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर ड्यूश बानने (Deutsche Bahn) सोमवारचा नियोजित संप लक्षात घेऊन देशातील सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा बंद करण्याचे गेल्या आठवड्यातच जाहीर केले होते. डॉइश बानचा हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक होता. या ताठर भूमिकेने संप चिघळल्याचे सांगितले जाते. बर्याचदा डॉइश बान रेल्वे सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते. अनेक गाड्या आंतरराष्ट्रीय सीमाही ओलांडतात. जर्मनीतील यापूर्वीच्या संपात स्थानिक सेवांवरच अधिक परिणाम झाला होता. यावेळी लांब पल्ल्याच्या वाहतुकीला फटका बसला. प्रादेशिक रेल्वे सेवा देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. सार्वजनिक सुट्टीच्या सेवांप्रमाणे आपत्कालीन वेळापत्रकावर ऑपरेट करणे देखील शक्य होताना दिसत नाही, असे डॉइश बान प्रवकत्याने म्हटले आहे.
Germany Standstill, Transport Strike, Strike Biggest in Decade, EVG Vardi Union, Deutsche Bahn