31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! कोरोना संसर्गानंतर 'ही' बॉलिवूड अभिनेत्री शूटिंगमध्ये सहभागी, गुन्हा दाखल

धक्कादायक! कोरोना संसर्गानंतर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री शूटिंगमध्ये सहभागी, गुन्हा दाखल

टीम लय भारी

मुंबई :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन सुध्दा करण्यात आले आहे. परंतु काही ठिकाणी लॉकडाऊन न करता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रसिध्द चित्रपट अभिनेत्रीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक परिसरात वावरून शूटिंगमध्ये ही सहभागी झाल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या अभिनेत्रीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ओशिवरात राहणारी बॉलिवूड अभिनेत्री

 संबंधित चित्रपट अभिनेत्री बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘के पश्चिम’ विभागा अंतर्गत ओशिवरा परिसरात राहते. कोव्हिडची बाधा झालेली असतानाही ती सार्वजनिक परिसरात वावरली. एवढंच नव्हे, तर तिने चित्रिकरणांमध्ये ही सहभाग घेतला. परिणामी कोरोना संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोव्हिड विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. तरी व्यापक हिताच्या दृष्टीने कोरोना विषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

 आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे पोलीस तक्रार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269, 270 आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम 2 आणि 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

होम क्वारंटाईन न होता शूटिंग

संबंधित चित्रपट अभिनेत्रीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानुसार तिला कोरोना संसर्ग झाला असल्याचे ११ मार्च २०२१ रोजी निष्पन्न झाले होते. परंतु, त्यानंतर तिले आपल्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहणे बंधनकारक होते, परंतु नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक परिसरातील वावर तिने सुरुच ठेवल्याचे पालिका अधिकाऱ्यांना समजले.

समुपदेशन करुनही सकारात्मक प्रतिसाद नाही

या अनुषंगाने के पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी १४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा तिच्या घरी गेले. वारंवार विनंती करुन ही तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यासही तिने नकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर परिसरातील एका समाजसेवकाच्या मदतीने तिला विनंती केली असता, तिने दरवाजा उघडला. त्यानंतर तिच्या हातावर नियमानुसार विलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला.

 मुंबई पोलिसांद्वारे गुन्हा नोंद

संबंधित चित्रपट अभिनेत्रीने कोरोना संसर्ग असून ही सार्वजनिक परिसरांमध्ये वावरणे, चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभाग घेणे आणि परिणामी इतर लोकांना कोरोना संसर्ग होऊ शकेल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांद्वारे त्यांच्यावर संबंधित कलमअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नागरिकांनी कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतद्वारे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे. या नियमांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक परिसरात वावरताना मास्क वापरावा, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे यासह कोरोना संसर्ग झाला असल्यास विलगीकरण विषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे; यासारख्या बाबींचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी