33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रगावातील खराब रस्त्याने घेतला चिमूरड्याचा जीव

गावातील खराब रस्त्याने घेतला चिमूरड्याचा जीव

टीम लय भारी 

औरंगाबाद : गावात असलेल्या खराब रस्त्यामुळे (Bad Road) एका आठ वर्षीय मुलाचा जीव गेल्याची (The bad road in the village took the life of the little boy) संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे गावात राजकीय नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी फक्त स्वतःचा विचार न करता सामान्य नागरिकांचा सुद्धा विचार करावा, असे मत गावातील लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखमापूर येथे राहणाऱ्या कृष्णा परदेशी या आठ वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटात अचानक दुखू लागले. यामुळे त्याचे वडील बाबुलाल परदेशी त्याला त्यांच्या दुचाकीवरून गंगापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. पण गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाल्याने त्यांची दुचाकी त्या चिखलात फसली. अनेक प्रयत्न करूनसुद्धा हि दुचाकी चिखलातून बाहेर निघाली नाही. याचवेळी चिमुकल्या कृष्णाला पोटात होणाऱ्या वेदना असह्य झाल्याने त्याच्या वडिलांसमोरच त्याने प्राण सोडला.

दरम्यान, गावातील लोकांमध्ये घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर राजकीय नेत्यांबद्दल असंतोष देखील निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेवरून पायउतार होत असताना औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यात आले. पण याचे श्रेय मिळविण्यासाठी या निर्णयाला स्थगिती देत शिंदे-भाजप सरकारने पुन्हा औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात येईल, असे घोषित केले. राजकीय स्वार्थासाठी नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. सध्याचे राजकारण तर इतके दूषित झाले आहे की प्रत्येक राजकीय नेता मी श्रेष्ठ कसा ? हेच दाखवून द्यायच्या मागे लागला आहे.

परंतु या राजकीय संघर्षामध्ये सामान्य नागरिक मात्र भरडला जाऊ लागला आहे. गेल्या २४ दिवसात ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या घडणाऱ्या सर्व घटनांना जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र लखमापूर येथे घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय वाद बाजूला ठेऊन ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती सध्या करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी