33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रिकेटखेळाडूंच्या जर्सीवर आता 'इंडिया' ऐवजी 'भारत'? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज सलामीवीर विरेन्द्र सेहवाग हा त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी (5 सप्टेंबर), भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन आगामी क्रिकेट विश्वचषकासाठि भारतीय संघ जाहीर केला. संघात सामील असलेल्या खेळांडूंचा एक विडिओ पोस्ट करत We Are Team India असा कॅप्शन दिला आहे. परंतु ह्यावर सेहवागने प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विरेन्द्र सेहवागने आपल्या ट्विटर पोस्टद्वारे बीसीसीआय आणि जय शाह यांना एक विशेष विनंती केली आहे. “माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे. आमचे मूळ नाव ‘भारत’ अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. मी BCCI आणि जय शाह यांना आग्रह करतोय की या विश्वचषकात आपल्या खेळाडूंच्या छातीवर भारत असा उल्लेख असावा.”

तर दुसऱ्या एक पोस्ट मध्ये सेहवाग म्हणतो, “टीम इंडिया नाही टीम भारत. या विश्वचषकात आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डू यांचा जयजयकार करत आहोत, आपल्या हृदयात भारत असू दे आणि खेळाडूंंनी “भारत” नाव असलेली जर्सी घालावि.”

सेहवागच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या असून काही लोकांनी त्याचे समर्थन केले आहे तर काही लोक सेहवागच्या विधानाचा विरोध करत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने आज आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली असून निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. यंदाचा विश्वचषक भारतात होणार असून ऑक्टोबर महिन्यापासून स्पर्धेची सुरवात होणार आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघात फार बदल केले नसून आशिया चषकातील संघाप्रमाणेच हा संघ असेल. फक्त फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला संधी मिळाली असून आशिया चषक संघातील तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान मिळू शकले नाही. आशिया चषक संघातून डच्चू मिळालेल्या यजुवेंद्र चहल विश्वचषक संघात ही स्थान मिळवू शकला नाही. आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून प्रवास करणाऱ्या संजू सॅमसन याला देखील संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय, संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेले फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन यांनादेखील संधी मिळू शकलेली नाही.

नुकतेच दुखापतीतून बाहेर आलेले के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषक स्पर्धेतही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ते सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची धुरा शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन यांच्यावर असेल तर हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल हे ऑल राऊंडर फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये संघाला मजबूती देतील. तेज गोलंदाजीची धुरा जसप्रीत बूमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज कडे असेल. तर कुलदीप यादव हा जडेजा आणि अक्षरसह फिरकी गोलंदाजी सांभाळेल.

हे ही वाचा 

युझी गेला बागेश्वर बाबाच्या चरणी आणि झाला टीममधून पत्ता कट!

वर्ल्डकप साठी भारतीय संघ जाहीर; या बड्या खेळाडूला मिळाला टीममधून डच्चू

आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १२ नोव्हेंबर, बंगळुरू

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी