मुंबईतील घाटकोपर पूर्वेमधील चाळिशीतील दाम्पत्य 8 मार्च रोजी राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपक शाह आणि टीना शाह अशी मृतांची नावं आहेत. घाटकोपर पूर्वेतील पंतनगरच्या कुकरेजा पॅलस या टॉवरमधील घरातील बाथरुममध्ये या दाम्पत्याचा मृतदेह आढळला. यावरून गिझरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बाळगण्यात आला होता. आता मात्र या दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण आले असून दाम्पत्याचा मृत्यू गीझरमुळे नसून भांग पिल्याने झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. दरम्यान पंतनगर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Ghatkopar Shah couple died not because of geyser but because of drinking Bhang!)
धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मित्रांसोबत रंग खेळून आलेले दीपक शहा (44) आणि टीना शहा (38) हे दाम्पत्य बाथरूममध्ये उलट्या आणि गिझरच्या पाण्याने वेढलेल्या अवस्थेत आढळले. विलेपार्ले येथे दुपारी 3.30 वाजेपर्यंत मित्रांसोबत रंगपंचमी साजरी केल्यानंतर ते दोघे मंगळवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास कुकरेजा टॉवर्स येथे घरी परतले. एका दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळलेल्या नाहीत. दरम्यान काल (शुक्रवार, 12 मार्च रोजी) भांग-दारू यांसारख्या विषबाधेचे कारण असू शकते, असा अंदाज पोलिस व डॉक्टरांनी वर्तवला. या दाम्पत्याचे शव तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याचप्रमाणे पोटातील केमिकल, घटनास्थळी सापडलेल्या उलटीच्या खुणा आणि इमारतीच्या कॅमेऱ्यातील फुटेज तपासले जात आहेत. यावरून काही माहिती मिळणे शक्य आहे.

घटस्फोटानंतर दीपकचे हे दुसरे लग्न आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. त्याला दोन मुले आहेत. माजी पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच या जोडप्याला फोन करणाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत या दोघांना आलेल्या 4,500 कॉल्सवरून पोलीस नावांची यादी करत आहेत.
हे सुद्धा वाचा :
महिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस
धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल
बुधवारी (8 मार्च) दुपारच्या सुमारास मोलकरीण त्यांच्या घरी गेली, मात्र दारावरची बेल किंवा फोन कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या एका नातेवाईकाने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. सुरुवातीला गिझरमधून गॅस गळतीमुळे मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. मात्र गिझर बंद असल्याचे निष्पन्न झाल्याने या दाम्पत्याचा मृत्यू गीझरमुळे नसून भांग पिल्याने झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून पुढील तपास पंतनगर पोलिस करत आहेत. गुरुवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दोघांचे मृत्यूचे कोणतेही प्राथमिक कारण दिलेले नाही. कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेद्वारे पुढील विश्लेषणासाठी व्हिसेरा आणि आवश्यक पेशींचे जतन करण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले.