33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeसंपादकीयMahadev Jankar : मेंढपाळपुत्र ते कॅबिनेटमंत्री; महादेव जानकरांचा थक्क करणारा प्रवास

Mahadev Jankar : मेंढपाळपुत्र ते कॅबिनेटमंत्री; महादेव जानकरांचा थक्क करणारा प्रवास

जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी दिल्ली येथे मागणी व आंदोलन करणारा देशातील एकमेव नेता म्हणजे महादेव जानकर. सातारा सांगली सीमेवरील म्हसवड हे ठिकाण. याचं म्हसवडमधील एक छोटसं गाव म्हणजे पळसावडे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकरांचे हे गाव.

जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी दिल्ली येथे मागणी व आंदोलन करणारा देशातील एकमेव नेता म्हणजे महादेव जानकर (Mahadev Jankar). सातारा सांगली सीमेवरील म्हसवड हे ठिकाण. याचं म्हसवडमधील एक छोटसं गाव म्हणजे पळसावडे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकरांचे हे गाव. पंचक्रोशीत सिध्दनाथाचं म्हसवड म्हणून नावाजलं जातं. पळसावडे गावाची पंधराशेच्या आसपास वस्ती. गावात धनगर समाजाची वस्ती अधिक. त्यानंतर मराठा आणि मग रामोशी समाज. कमी पावसाचा प्रदेश ही माण तालुक्याची ओळख. नजर टाकावी तिकडे माळरानं अन् खुरटी झुडपं. नुसता वारा भरारा वाहात असतो. दहिवडी, म्हसवड, आटपाडी परिसर म्हणजे, माणदेशाचं ह्रदय. माणदेशात भौतिक सुखसमृध्दी नसली, तरी सांस्कृतिक वैविध्य कमालीचे आहे.

साठीच्या दशकात व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी ही कादंबरी लिहीली होती. त्यामध्ये इथला दुष्काळ, मेंढपाळांचे जीवन, त्यांची स्थलांतरं आणि माणदेशी माणसाचा चिवट संघर्ष जगासमोर आला. त्याचं माणदेशाची कन्या आणि नशिबाने का असेना पण याचं जानकर साहेबांचे गाव म्हणजे माझे सासर.

लग्न झाल्यानंतर या गावात आल्यावर मला इथल्या लोकांची राजकारणात असलेली आवड आणि तळमळ पाहायला मिळाली. कदाचित जानकर साहेबांनीचं घातलेला हा वस्तुपाठ असावा. महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर समाजाचे नेतृत्व हे बोटावर मोजण्याइतपतचं मर्यादित आणि त्याचं नेतृत्वाची सुरुवात ही जानकर साहेबांनी केली. जानकर साहेबांचा आयुष्यपट पाहताना त्यांची असलेली समाजाप्रती तळमळ आणि निष्ठा या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

साहेब सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. त्यावेळी ते विद्यापीठ प्रतिनिधी होते. त्यावेळी मंडल आयोगाचे वारे देशभरात वाहू लागले होते. साहेबांनी व्ही. पी. सिंग यांना कॉलेजमध्ये आणलं होतं. व्ही. पी. सिंगाच्या विचारांनी ते प्रचंड भारावून गेले. त्यांचा ओबीसी समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याच काळात बापुसाहेब कोकरे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून आणि आपल्या आंदोलनातून संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता. हीच यशवंत सेना पुढे महाराष्ट्रात विलीन झाली. नाराज झालेल्या तरुणांनी पुन्हा यशवंत सेना पुनरुज्जीवीत करण्यास सुरुवात केली. याच यशवंत सेनेचे जानकर साहेब सेनेपती झाले.

हे सुद्धा वाचा

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा इमानी बाणा

Eknath Shinde Cabinet : नव्या मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे लॉबिंग

Eknath Shinde Cabinet Expansion : दीपक केसरकरांना मंत्रीपद, निलेश राणेंची मात्र फजिती !

यशवंत सेनेचे सेनेपती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरुवात केली आणि सळसळतं रक्त असणाऱ्या समाजातील तरुणांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घातला. महाराष्ट्राबाहेर फिरत असताना ते उत्तर प्रदेशमध्ये बसप संस्थापक कांशीराम यांना भेटले. कांशीराम यांना त्यांनी समाजाची झालेली कोंडी सांगितली, कांशीराम म्हणाले, “इतना बडा समाज है, फिर आप मांग क्यों करते हों ? खुद सरकार बनो.” कांशीराम यांच्याकडून जानकर साहेबांनी प्रेरणा घेतली. एनटी ओबीसी समाजाला शासनकर्ती जमात बनवण्याचा विडा उचलला. यशवंत सेनेने बसपाशी युती केली. १९९८ मध्ये नांदेड मधुन त्यांनी बसपाच्या तिकीटावरुन निवडणूक लढवली पण, इथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. इथूनच रासपची पायाभरणी झाली.

दुसऱ्यांच्या सावलीत राजकारण करता येत नाही. आपला पक्ष, आपले राजकारण आकाराला यायला हवं हा विचार करून बसपा महाराष्ट्रात उभा राहू शकत नाही हे लक्षात आल्यावर २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. वैचारिक पाया शाहु, फुले आंबेडकर यांची विचारसरणी, बहुजन समाजाची उन्नती हेच या पक्षाचे लक्ष.

नांदेड १९९८, सांगली २००६, माढा २००९, बारामती २०१४ अशा चार लोकसभा जानकर साहेबांनी लढवल्या. प्रत्येक वेळी ते हारत गेले, पण पक्ष जिंकत गेला. साहेबांनी समाजासाठी भरपूर केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी जयंती साजरी करण्याची सुरुवात ही साहेबांनीचं केली. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांनी पैशाची हाव न बाळगता निस्वार्थीपणे काम केले. मेंढपाळाच्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणं हे महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमचं घडत होते.

साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला. तसं बाळकडूचं त्यांना त्यांच्या आई गुणाबाई यांच्याकडून मिळालं होतं. साहेबांचा जन्म वायदेशातला (वाडे, सातारा). घरची स्थिती बेताचीच, मोठे बंधू अजूनही शेती करतात. राजकारणात असल्यावर घरच्या मंडळींचा थाट फार वेगळा असतो. परंतु साहेबांचे कुटूंब अजूनही एसटीने प्रवास करतात. ना पैशाची हाव, ना मोठेपणा. पीएचडी, पत्रकारिता आणि तीन चार वकिल हीच काय ते पूर्ण कुटुंबाची दौलत असेल.

महाराष्ट्राच्या राजकारणातील हे असे कुटूंब असेल ज्यांनी कधी स्वार्थ पाहिला नाही. आजकाल राजकारण करायचं म्हणजे पैसा हा फॅक्टर लागतो. पण ना पैसे, ना बॅकग्राऊंड, ना कोणते कारखाने, ना जमिनजुमला फक्त आणि फक्त स्वत:च्या मेहनतीच्या आणि निष्ठेच्या जोरावर इतकं मोठं पद भूषविणारे महाराष्ट्रातले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे जानकर साहेब असतील.

मंत्री असताना स्वतःच्या पुतण्याच्या बायकोची म्हणजेच सुनेची नागपूरला झालेली बदली न थांबवणाऱ्या जानकर साहेबांनी आपल्या सोबत पक्षाची प्रतिमा ही उजळ ठेवली आहे. शालेय जीवनापासून असणारी शुभ्र कपड्यांची आवड त्यांच्या राजकीय भविष्याची सुरुवात होती. हे आता त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींकडून ऐकायला मिळते आणि या पांढऱ्या कपड्यांवर त्यांनी आजपर्यंत डाग लागू दिला नाही.

बहुजन समाजाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान मिळवून देणं हा त्यांचा ध्यास आहे. आज मोठ्या प्रमाणात त्यांनी बहुजन समाजातील तरुणांना जागृत करण्याचे काम केले आहे. साहेबांमुळे बहुजनांना स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळाले. जानकर साहेबांना आपला पक्ष एका जातीचा करायचा नाही. शासनकर्ती जमात होण्यासाठी तुम्ही पायाचा दगड व्हा, इतरांना कळस चढण्याची संधी द्या, असं ते आपल्या समाजास आवाहन करत असतात. आजतागायत त्यांनी बहुजनांसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. असे निस्वार्थी व्यक्तिमत्व एकदिवस नक्कीचं देशाचे पंतप्रधानपद भूषवतील. जानकर साहेबांच्या गावात राहतो आणि त्यांचे नातेवाईक आहोत हे सांगताना उर भरुन येतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी