27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयश्रीरामाचा भाजप प्रवेश !

श्रीरामाचा भाजप प्रवेश !

भितीपोटी, अंधभक्तीपोटी किंवा स्वार्थापोटी, नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा एक कलमी कार्यक्रम देशभरात राबविला जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शंकराचार्यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागण्याचे धाडस दाखविले आहे. विरोधी पक्षाचे नेते सुद्धा जितक्या ताकदीने आरोप करणार नाहीत, तेवढ्या ताकदीने दोन्ही शंकाराचार्यांनी मोदींना झोडपून काढले आहे. त्यांनी केलेल्या या धाडसाची त्यांना निश्चितच किंमत मोजावी लागू शकते. त्यांची चौफेर कोंडी केली जावू शकते. हिंदू धर्मातील सर्वोच्च पदावर असलेल्या या दोन्ही शंकराचार्यांना धर्मबाह्य ठरविण्याचीही ताकद भाजप व संघाकडे आहे.

श्रीरामाची प्रतिष्ठापना रविवारी अखेर नव्या व अर्धवट बांधलेल्या मंदिरात झाली. हा सोहळा कोट्यवधी भारतीयांनी दूरचित्रवाणी व मोबाईलवर पाहिला. हा सोहळा भारतीय जनता पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय कार्यक्रम असल्याचेच अधिक जाणवत होते. श्रीरामाच्या मूर्तीपेक्षा नरेंद्र मोदी यांच्यावरच दूरदर्शनच्या कॅमेऱ्याचा अधिक फोकस राहिलेला दिसत होता. नरेंद्र मोदी यांची वेशभूषा, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या हातातून केले जाणारे विविध धार्मिक विधी… असे बारीकसारीक पैलूंचे प्रक्षेपण केले जात होते. अधूनमधून रामलल्लाची मूर्तीही पाहायला मिळत होती. रामलल्लाची मूर्ती दाखवताना त्यासोबत नरेंद्र मोदींवरून कॅमेरा हटणार नाही, याचीही काळजी घेतली जात होती. मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत यांचीही छबी दाखविली जात होती. बिचारी श्रीरामाची मूर्ती एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे दिनवाण्या नजरेने हे सगळे ओंगळवाणे चित्र पाहात होती.
एकूणच प्रभू श्रीरामाचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचा फील येत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशभरातील सगळ्या भाजप नेत्यांनी तसेच रा. स्व. संघाच्या संलग्न संघटनांनीही ज्या पद्धतीने जनतेच्या डोक्यात हा कार्यक्रम जबरदस्तीने कोंबला, त्यावरून तरी तसेच दिसत आहे.
लोकसभा निवडणुका हाता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे श्रीरामाच्या नावाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा मनसुबा होता. त्यात काही अंशी यश येईल सुद्धा. पण शंकराचार्यांनी उघडपणे नरेंद्र मोदी व भाजपवर तोफा डागल्या आहेत. हिंदू धर्मात शंकराचार्य यांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. देशात चार धर्मपीठे आहेत. या धर्मपीठाचे प्रमुख चार शंकराचार्य असतात. हिंदू धर्मातील ही सर्वोच्च पदे आहेत. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेवरून या शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातील दोन शंकराचार्यांनी तर नरेंद्र मोदी व भाजपला अक्षरशः उघडे पाडले आहे.
श्रीराम मंदिराची उभारणी नरेंद्र मोदी व भाजपमुळे होत असल्याचे चित्र तयार केले जात आहे. पण ही ढोंगबाजी असल्याचे शंकराचार्यांनी दाखवून दिले आहे. रामजन्मभूमीचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू होता, तेव्हा भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही कार्यकर्ता या खटल्यात सामील झालेला नव्हता. एकूण ९० दिवस युक्तीवाद चालू होता. त्यातील ४० दिवस श्रीराम जन्मभूमीच्या बाजूला युक्तीवाद चालला होता. त्यातील २३ दिवस मी व माझे वकील हा युक्तीवाद करीत होतो, असे शंकराचार्यांनी आठवण करून दिलेली आहे. भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांचे केवळ रस्त्यावर हुल्लडबाजी करण्यापलिकडे कोणतेही योगदान नाही,असेही शंकराचार्यांनी ठणकावले आहे.

हे सुद्धा वाचा

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

मीरा रोड परिसरात सनातनवाद्यांवर झालेल्या हल्ल्यावरून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
धर्मसत्ता व राज्यसत्ता स्वतंत्र आहेत. पण राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घाईघाईत उरकण्यात आला आहे. मंदिराचे काम पूर्ण झालेले नाही. अर्धवट काम असताना मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यास कुणाचाही विरोध नाही. पण केवळ निवडणुका जवळ आल्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आल्याची नाराजी शंकराचार्यांनी व्यक्त केली आहे.
शंकराचार्य एवढ्यावरच थांबलेले नाहीत. औरंगजेबाने हिंदू मंदिरांचे जितके नुकसान केले नाही, तेवढे नुकसान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अयोध्या परिसरातील अनेक जुनी मंदिरे तोडून टाकली आहेत. ८०० – १००० वर्षे जुन्या मूर्ती छिन्न विछीन्न अवस्थेत कचऱ्यात फेकून दिल्याचे आपण पाहिले आहे. या पापासाठी मी नरेंद्र मोदींना कधीही माफ करणार नाही, असाही संताप शंकराचार्यांनी केला आहे.
ज्योतिषांद्वारे शुभमुहूर्तांची पंचागे लिहिली जातात. त्यात २२ जानेवारी हा शुभ दिवस असल्याचे कुठल्याही पंचांगात नमूद केलेले नाही. केवळ राजहट्टाने २२ जानेवारी रोजीचा मुहूर्त शोधल्याचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात ज्या पक्षकारांनी खटला चालवला त्यातील कुणाही व्यक्तीला मंदिर न्यासामध्ये स्थान दिलेले नाही. न्यासामध्ये सगळे भाजपसमर्थक आहेत. धर्मशास्त्राचे उल्लंघन होत असतानाही न्यासामधील एकही सदस्य त्यावर बोलत नाही, अशीही नाराजी शंकराचार्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या देशात धार्मिक उन्माद सुरू आहे. हिंदू धर्माचे व देशभक्तीचे पेंटट केवळ भाजपकडे आहे. धर्मरक्षक व देशभक्तीची प्रमाणपत्रे देण्याची जबाबदारी भाजपकडे आहे. विरोधकांवर ईडी, सीबीआय, आयकर खाते यांची करडी नजर आहे. विरोधी पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपसोबत घेवून स्वच्छ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
भितीपोटी, अंधभक्तीपोटी किंवा स्वार्थापोटी, नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा एक कलमी कार्यक्रम देशभरात राबविला जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शंकराचार्यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागण्याचे धाडस दाखविले आहे. विरोधी पक्षाचे नेते सुद्धा जितक्या ताकदीने आरोप करणार नाहीत, तेवढ्या ताकदीने दोन्ही शंकाराचार्यांनी मोदींना झोडपून काढले आहे. त्यांनी केलेल्या या धाडसाची त्यांना निश्चितच किंमत मोजावी लागू शकते. त्यांची चौफेर कोंडी केली जावू शकते. हिंदू धर्मातील सर्वोच्च पदावर असलेल्या या दोन्ही शंकराचार्यांना धर्मबाह्य ठरविण्याचीही ताकद भाजप व संघाकडे आहे.
भविष्यात मोठे संकट दिसत असतानाही शंकराचार्यांनी राजसत्तेचे पाय चाटण्याऐवजी धर्मसत्तेचे रक्षण करण्यासाठी निकराची लढाई लढली आहे. त्याबद्दल त्यांचे निश्चितच कौतुक करावे लागेल. भाजप व नरेंद्र मोदी यांचे हिंदू प्रेम किती ढोंगी आहे, हे सुद्धा या निमित्ताने जनतेच्या समोर आले ते बरे झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी