29 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरएज्युकेशनशिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

गेल्या २० – २५ वर्षांत या महाराष्ट्राने अनेक शिक्षण मंत्री पाहिले. रामकृष्ण मोरे, वसंत पुरके, राधाकृष्ण विखे – पाटील, (काही काळ पतंगराव कदम), बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा, विनोद तावडे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड या नेत्यांनी शिक्षण खात्याचा कारभार पाहिला. यापैकी वर्षा गायकवाड सामान्य लोकांना सहजासहजी भेटत नसायच्या. पण त्यांच्या कार्यालयात सामान्य लोकांचा अपमान तरी होत नव्हता. दीपक केसरकर यांचे पीए मात्र वाईट पद्धतीने लोकांचा अपमान करतात

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना भेटण्यासाठी तुम्हाला जायचे आहे का…? असा काही विचार तुमच्या डोक्यात असेल तर तो काढून टाका… फारच महत्वाचे काम असेल तर अपमान सहन करण्याची, तेथील स्वीय सहाय्यकांकडून (पीए) दोन शब्द ऐकून घेण्याची तयारी ठेवा… दीपक केसरकर हे साक्षात महाराजे आहेत… आणि त्यांचे पीए म्हणजे सरदार आहेत. भेटायला जाणाऱ्या सामान्य जनतेची औकात ही किंड्या मूग्यांची आणि जनावरांची आहे. जनावरांना कशाही पद्धतीने हाकलले तरी चालते, अशी अत्यंत ‘शिस्तबद्ध सिस्टीम’ केसरकर यांनी आपल्या कार्यालयात घातली आहे. या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची जबाबदारी बिपीन चव्हाण नावाच्या स्वीय सहायकावर सोपविली आहे.

शालेय शिक्षण हे अत्यंत संवेदनशील खाते दीपक केसरकरांकडे आहे. पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या राज्यभरातील शाळा केसरकर यांच्या अखत्यारित येतात. कोट्यावधी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण चळवळीतील संस्था व व्यक्ती नेहमीच शिक्षण मंत्र्यांकडे मोठ्या संख्येने येत असतात. या सगळ्या लोकांना भेटणे कोणत्याही मंत्र्यांना शक्य नाही. परंतु आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीने परत जाताना शिव्या शाप देत जाऊ नये याची काळजी बरेच मंत्री घेत असतात.

दीपक केसरकर यांनी मात्र येणाऱ्या अभ्यागतांची अशी काळजी घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर, येणाऱ्या माणसाचा हमखास अपमान झालाच पाहीजे, त्याची कोणत्याही परिस्थितीत निंदानालस्ती व्हायला हवी, येणाऱ्या माणसांवर आपले कर्मचारी खेकसले पाहीजेत… याची तजवीज केसरकर यांनी करून ठेवलेली आहे. या सगळ्याची जबाबदारी केसरकर यांनी बिपीन चव्हाण नावाच्या बिनडोक व अक्कशून्य पीएकडे दिली आहे.

हे सुद्धा वाचा

LayBhari Special : बाळासाहेब थोरातांनी मिळवले, ते वर्षा गायकवाडांनी घालवले

बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

Video : सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना धुतले

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची कप‍िल पाटील यांची दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

गुरूवारी संध्याकाळी दीपक केसरकर मंत्रालयात आपल्या दालनात आले होते. त्यावेळी त्यांच्या दालनाबाहेर अभ्यागतांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. खरेतर, अभ्यागतांसाठी हॉल आहे. हा हॉल बऱ्यापैकी रिकामा असतानाही अभ्यागतांना बाहेर रांगेत उभे करून ठेवण्यात आले होते. त्यातूनही काहीजण हळूच चंचू प्रवेश करून हॉलमध्ये पोहचत होते.

वास्तवात शिक्षण मंत्री केसरकर हे हॉलमध्ये नव्हते. ते कॉन्फरन्स रूममध्ये होते. शिवाय हॉल हा अभ्यागतांसाठीच असतो. असे असतानाही चव्हाण महाशय हे येणाऱ्या अभ्यागतांवर अतिशय वाईट पद्धतीने खेकसत होते. हॉलमध्ये येणाऱ्या व्यक्तीने घोर अपराध केला आहे अशा पद्धतीने त्याच्यावर खेकसत होते.

तुम्ही कुणाला विचारून आत आलात, तुम्हाला कुणी परवानगी दिली, काय काम आहे, बाहेर व्हा… अशा पद्धतीने हे चव्हाण महाशय बिचाऱ्या अभ्यागतांवर डाफरत होते. दरवाजावर असणाऱ्या शिपायाची सुद्धा चव्हाण महाशयांनी खरडपट्टी काढली. तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही लोकांना आत कसे सोडले… तुम्हाला निलंबित करू का… लोकं ऐकत नसतील, तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा… अशी मुजोरी सुद्धा चव्हाण यांनी दाखविली.

शिक्षक चळवळीत कार्यरत असलेल्या एका अनुभवी मान्यवरांनाही चव्हाण यांनी डाफरले… तुम्ही कशाला आतमध्ये आलात… तुम्हाला कुणी बोलावले आहे… असा भडीमार चव्हाण यांनी या मान्यवरावर केला. त्यावर अवाक् होवून या मान्यवरांनी चव्हाण यांना ‘आम्ही माणूसच आहे ना… आमच्याकडून नक्की चूक काय झाली आहे…’ असा प्रतिप्रश्न केला.

सामान्य लोकांना अशा पद्धतीने वाईट वागणूक देणे, शिपायांना अपशब्द बोलणे हे योग्य नाही, असे प्रस्तुत प्रतिनिधीनेही चव्हाण यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर चव्हाण यांच्यासोबत असलेल्या अन्य एका पीएने (किंवा कदाचित ओएसडी असलेल्या व्यक्तीने) प्रस्तूत प्रतिनिधीला ‘तुम्ही शिक्षक आहात का ? तुमच्यावर कारवाई करू का ?’ अशी धमकी दिली.

वास्तवात, चव्हाण हे पीए या पदावर कार्यरत आहेत. या पदाला काही मर्यादा आहेत. या मर्यादेत राहूनच चव्हाण यांनी वागायला हवे. मंत्र्याचे कार्यालय म्हणजे आपली खासगी जहागिरी नाही. शिक्षण खाते हे तळागाळातील लोकांशी संबंधित खाते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं भेटायला येणारच. शिक्षण क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणारे, शिक्षणासंबंधी दांडगा अभ्यास असणारे लोक सुद्धा शिक्षण मंत्र्यांना भेटायला येत असतात. अशा लोकांवर बिपीन चव्हाण यांच्यासारखा अक्कलशून्य माणूस जर डाफरायला लागला तर त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याची नाचक्की होणार आहे. येणाऱ्या अनेकांनी शिक्षण क्षेत्रात उदात्त कार्य केलेले असू शकते. अशा मान्यरांवर चव्हाणांसारखा तिनपाट पीए डाफरला तर त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याची नाचक्की होईल, याची काळजी स्वतः दीपक केसरकर यांनी घ्यायला हवी.

शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यावर सुद्धा सामान्य लोकांना अस्पृश्यतेची वागणूक

मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांच्या दालनात सामान्य लोकांना हाड – तूडची वागणूक दिली जाते. तशीच वागणूक बंगल्यावर सुद्धा दिली जाते. बंगल्यावर भेटायला येणाऱ्या व्यक्तीला आतमध्ये जावूच दिले जात नाही. बंगल्यावर गर्दी नसली तरीही कोणालाही बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. आतून पीए किंवा ओएसडींनी निरोप पाठवला तर तेवढ्याच व्यक्तीला भेटण्यासाठी आतमध्ये पाठविले जाते.

शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेले अडले नडलेल्या अनेक व्यक्ती घुटमळत असतात. त्यांना मंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडायचे असते. परंतु ओएसडी व पीए यांच्यापर्यंत वशिला नसल्याने त्यांना मंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकांना वाईट वागणूक देणारे पहिलेच शिक्षण मंत्री !

गेल्या २० – २५ वर्षांत या महाराष्ट्राने अनेक शिक्षण मंत्री पाहिले. रामकृष्ण मोरे, वसंत पुरके, राधाकृष्ण विखे – पाटील, (काही काळ पतंगराव कदम), बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा, विनोद तावडे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड या नेत्यांनी शिक्षण खात्याचा कारभार पाहिला. यापैकी वर्षा गायकवाड सामान्य लोकांना सहजासहजी भेटत नसायच्या. पण त्यांच्या कार्यालयात सामान्य लोकांचा अपमान तरी होत नव्हता.

रामकृष्ण मोरे व वसंत पुरके यांनी अनेक शैक्षणिक सुधारणा केल्या. वसंत पुरके हे एक चांगले शिक्षण मंत्री होते. परंतु त्याच्या कार्यालयातील कर्मचारी व्यवस्थित नसल्याने पुरके यांच्या हातातून हे खाते निसटले. शिक्षण खात्यामुळे त्यांचे राजकीय करिअर सुद्धा उद्ध्वस्त झाले.

पुरके, राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात सीबीएसई, आयसीएसई, एसससी या तिन्ही बोर्डातील दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत कसा प्रवेश द्यावा यावरून शैक्षणिक वर्षाच्या आरंभी जोरदार वादंग घडायचा हा वाद अनेक वर्ष चालू होता. विखे पाटील व थोरात या दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी आपापल्या कार्यकाळात मोठे वाद झेलले. पण त्यांनी सामान्य जनतेला, पालकांना, शिक्षणतज्ज्ञांना कधीही वाईट वागणूक दिली नाही. लोकांचा रोष पत्करला, पण शिक्षण खात्यात आमुलाग्र बदल सुद्धा घडवून आणले.

रामकृष्ण मोरे, वसंत पुरके, राधाकृष्ण विखे – पाटील व बाळासाहेब थोरात या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण खात्याची सुरळीत घडी घातली म्हणून दीपक केसरकर विनावादंग काम करीत आहेत. शिक्षण खाते कसे चालवावे याची धडे त्यांनी या जुन्या शिक्षण मंत्र्यांकडून घ्यायला हवेत. किमान बिपीन चव्हाण नावाच्या अक्कलशून्य पीएला ताबडतोबड हाकलून लावायला हवे. अन्यथा दीपक केसरकर यांचा वसंत पुरके व्हायला वेळ लागणार नाही.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी