31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमनोरंजन'या' अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

‘या’ अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

सध्या मराठी मालिकांची विशेष चलती आहे. या मालिकांचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. त्यातही जर त्या मालिका झी मराठीच्या (Zee marathi) असतील तर सोने पे सुहागाच. कारण झी मराठीवरील मालिका आणि प्रेक्षक यांचे एक खास जिव्हाळ्याचे नाते आहे. मागील अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीने रसिकांचे पुरेपूर मनोरंजन केले आणि एक खास जागा निर्माण केली. या वाहिनीने एक उत्तमोत्तम कलाकार मराठी किंबहुना संपूर्ण मनोरंजनविश्वाला दिले आहेत. यातलेच एक मोठे आणि लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री सुरुची आडारकर (suruchi adarkar). ‘का रे दुरावा’ या मालिकेने घराघरामध्ये पोहचलेली सुरुची मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय नाव.

मधल्या थोड्या काळापासून अभिनयपासून दूर असलेली सुरुची अचानक तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आणि गाजू लागली. नुकतेच सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लगीनगाठ बांधली आणि सुरुची तुफान चर्चेत आली. तिने अचानक दिलेल्या या आनंदाच्या बातमीमुळे तिचे फॅन्स चांगलेच खुश झाले होते. मात्र आता त्यांचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरुचीने अजून एक सुखद धक्का तिच्या चाहत्यांना दिला आहे.

मालिकांपासून दूर असलेली सुरुची लवकरच पुन्हा एकदा मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या झी मराठीवरील लोकप्रिय आणि तुफान गाजणाऱ्या ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेत ती एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सुरुचीचा या मालिकेतील लूक आणि तिची भूमिका याबद्दल तुफान चर्चा रंगताना दिसत आहे. सध्या सातव्या मुलीची सातवी गोष्ट ही मालिका कमालीची गाजत आहे. रहस्यमयी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवले आहे.

या मालिकेत येणारे विविध ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना मालिकेशी जुळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. सध्या मालिकेत पंचपीटीकेच्या रहस्यासोबतच विरोचकबद्दल देखील नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. आता यातच सुरुचीची होणारी मालिकेत एन्ट्री काय नवीन ट्विस्ट घेऊन येते हे बघणे खूपच उत्सुकतेचे असणार आहे.

हे ही वाचा

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

मनोज जरांगेंच्या कुटुंबात कुणबी प्रमाणपत्र नाही

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

सुरुची या मालिकेत कोणती भूमिका साकारणार? ती विरोचकला मदत करणार की नेत्राला? तिच्या येण्यामुळे नक्की धोका कोणाला असणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मालिकेतच पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने आणि मालिकेतील कलाकारांनी सुरुचीच्या मालिकेतील एन्ट्रीबद्दल पोस्ट करत तिचे मालिकेत स्वागत केले आहे.

तत्पूर्वी सुरुचीने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. महिन्याभरापूर्वीच सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केले. त्यांनी त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले होते. अचानक सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. या लग्नामुळे पियुष ट्रोल देखील झाला होता. कारण हे त्याचे तिसरे लग्न आहे. मात्र यासर्वांकडे दुर्लक्ष करत ही जोडी सध्या आपापल्या कामावर लक्ष देताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी