32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनवहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे. त्यानंतर वहिदा रेहमान यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वहिदा रेहमान यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शरद पवारांनीही ट्वीट करत वहिदा रेहमान यांचे कौतुक केले आहे.

ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि नृत्याचा ठसा उमटवणाऱ्या वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यामुळे योग्य व्यक्तिचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वहिदा रेहमान अभिनेत्री म्हणून जेवढ्या मोठ्या आहेत, तेवढ्याच एक व्यक्ती म्हणूनदेखील मोठ्या आहेत. देवआनंद यांचे हा 100वा जन्मदिवस आहे. या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दोन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. गुरुदत्त, देवआनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत काम करूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. असे कलाकार फार दुर्मिळ असतात.

प्यासा, कागज के फुल, चौदवी का चांद, साहेब बिवी और गुलाम, गाईड, खामोशी, बीस साल बाद आदी शेकडो चित्रपटांमध्ये अभियनाचे चार चांद लावणाऱ्या वहिदा रेहमान अगदी अलीकडच्या ‘दिल्ली 6’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. योगायोग पाहा, वहिदा रेहमान यांचे गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण झाले होते. आणि त्या चित्रपटाचे नायक होते देवआनंद. देवआनंद यांचा आज जन्मदिन म्हणजे ते आपल्यात असते तर 100 वर्षांचे असते. ‘गाईड’ हा देवआनंद आणि वहिदा रेहमान यांचा खूप गाजलेला चित्रपट. तसेच ‘कालाबाजार’, ‘बात एक रात की’, ‘प्रेमपुजारी’ आदी चित्रपटांतही ते एकत्र होते. म्हणजेच देवआनंद यांच्या जन्मदिनी वहिदा रेहमान यांना हिंदी सिनेसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे, याला निव्वळ योगायोग म्हणावा का, असही प्रश्न आहे.

वहिदा रेहमान या उत्तम नृत्यांगनादेखील आहेत. वास्तविक त्यांची नृत्यकला पाहून त्यांना चित्रपटांमध्ये पहिली संधी मिळाली. त्याला अभिनयाची जबरदस्त साथ मिळाल्यामुळे वहिदा रेहमान अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. आज त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने देशभरातून तसेच जगभरातील त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी