28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटलांनी भाजपला हिनवले; ‘’सत्ता की लालच बुरी’’!!

जयंत पाटलांनी भाजपला हिनवले; ‘’सत्ता की लालच बुरी’’!!

टीम लय भारी 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोनाशी निकराने लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. परंतु भाजपने राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधलाय..दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.

विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारविरोधात आक्रमक झालाय..’मेरा आंगन मेरा रणांगण’ असा नारा देत उद्या राज्यभरात भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. यामध्ये भाजपच्या निशाण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे नावाला उद्धेशून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी घोषणाही तयार केल्या आहेत. या घोषणांचे फलक हातात घेतलेले भाजपचे कार्यकर्ते राज्यभरात उद्या दिसतील. दरम्यान, भाजपच्या या भूमिकेवर  जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता. दरम्यान, यावरून आता भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे. “कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडतायत,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.

“कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडत आहेत. संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही. लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही. झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही. मात्र विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा मात्र पुरेपूर आहे,” असं म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विटरवून जयंत पाटलांवर हल्लाबोल केला होता. “राज्यपालांकडे सारखे जाऊन, त्यांना त्रास देण्यापेक्षा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाला पाठिंबा द्या, या लढाईत प्रत्यक्ष सहभागी व्हा,” असा सल्लाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

”राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही चिंताजनक आहे, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर आहे, या सर्व आघाडय़ांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला असून, सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जयंत पाटील यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन केले होते.

भारत एकसंघ दिसावा म्हणून आम्ही मोदींचं ऐकलं, महाराष्ट्रात दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही – जयंत पाटील

आपला देश एकसंघ दिसावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या आम्ही वाजवल्या. त्यांनी सांगितले दिवे लावा आम्ही लावले परंतु महाराष्ट्रात दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. भाजपमंडळींना राजकारण करायचे आहे म्हणून महाराष्ट्रात आंदोलन पुकारलं असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

संपूर्ण जगच हतबल झाले आहे. अशातच भाजपाचे लोक राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. आम्हीही विचारू शकतो, देशात कोरोना आला कसा?कोरोना आला तेव्हा पंतप्रधान ट्रम्पच्या स्वागतात व्यस्त होते असं आम्ही म्हटलं नाही मात्र भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातंय असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपचे लोक रोज येऊन सांगतात आम्ही ऐवढी मदत केली तेवढी मदत केली. हा प्रसंग जाहिरातीचा आहे का ? मदत केली तर त्याची जाहिरात कशाला हवी ? असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसही मदतीचे आकडे देऊ शकते मात्र अशा संकटकाळी आम्हाला कोणताही बडेजाव करण्यात रस नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मजूरांची परिस्थिती खूप वाईट आहे. राज्य सरकारने सर्व व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी पाठवले त्याबद्दल मजूर महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहे मात्र तिथले सरकार मजूरांना राज्यात घ्यायला तयार नाही. यातले बहुतांश राज्य भाजपशासित आहेत अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.

फडणवीस म्हणतात आम्हाला विचारले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालांना भेटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी इतके वर्षे काम केलंय आता मात्र मुख्यमंत्र्यांचा नंबर ते विसरलेत का अशी कोपरखळी करत तुमच्या सुचना असतील तर मन मोठे करून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त व्हा असा सल्लाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानाला उद्यापासून सुरुवात…

येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २२ व्या वर्षात पदार्पण करत असून याच निमित्ताने प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास ५ लाख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ‘महासंवाद’ करणार आहेत. यावेळी जयंत पाटील हे जवळपास ५ लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतील.

राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास ६ महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल तसेच राज्य पूर्वपदावर येईल त्यानंतर काही समस्या उद्भवतील या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. लोकांपर्यंत मदत पोहोचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

येत्या २२ मे २०२० रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून हे अभियान सुरू केले जाणार आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी झटला आहे, पक्षाचे जे काही वैभव आहे ते कार्यकर्त्यांमुळेच आहे म्हणून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी