27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली...

अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती

टीम लय भारी

पुणे :  पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातही ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनात तसेच तळागाळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याची आवश्यकता होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली असल्याचे सूत्रांनी सांगितले ( Ajit Pawar appointed Dr. Rajesh Deshmukh as a Pune collector ).

ही बातमी लिहित असतानाच आज डॉ. देशमुख यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. पुण्याचे जिल्हाधिकारी पद मिळावे यासाठी अनेक रथी महारथी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. पण जमिनीवर पाय असलेल्या डॉ. देशमुख यांच्या नावाला अजिदादांनी पसंती दिली.

डॉ. देशमुख यांनी IAS पदाची कारकिर्द सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुरू केली. त्यानंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

जलसंधारण, मनरेगा, कृषी, रस्ते… अशा तळागाळातील लोकांशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये डॉ. देशमुख यांनी प्रभावी काम केले होते. गावोगावी जावून त्यांनी अनेक गावांतील कठीणातील कठीण समस्या सोडविल्या होत्या. लोकाभिमूख कार्यपद्धतीमुळे त्यांनी सामान्य शेतकऱ्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांना आपलेसे केले होते.

IAS पदावर पदोन्नती होण्याअगोदर डॉ. देशमुख यांनी तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव म्हणूनही काम केले होते.

कोरोनोचं वाढतं आव्हान पेलण्यासाठी अजितदादांनी डॉ. देशमुख यांची जिल्हाधिकारीपदी विशेष निवड केली आहे. डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्याने जिल्हा प्रशासन अधिक एकसंघ व कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे ( Ajit Pawar given preference to Dr. Rajesh Deshmukh due to Corona pandemic ) .

डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळविला होता.

हे सुद्धा वाचा

अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…

देवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

अजितदादांचा मोठा निर्णय, ‘कोरोना’साठी पुण्यात तीन जम्बो रूग्णालये उभारणार

सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी

विधान परिषदेचे तत्कालिन विरोधी पक्षनते धनंजय मुंडे हे अभ्यासू व आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून ओळखले गेले. त्या काळात डॉ. राजेश देशमुख यांनी धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

IAS श्रेणीत निवड झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या त्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेचा आलेख सातत्याने उंचावत गेला. सुरुवातीला जिल्ह्याचा ६२ हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. माण, खटाव, कोरेगावसारख्या तालुक्यात दुष्काळमुक्ती व रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले ( Dr. Rajesh Deshmukh done excellent work in Satara district ).

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ७२ गावांचा कायापालट करुन दाखवला. गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. गावांच्या विकासासाठी ११० कोटींचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी केली.

खासगी उद्योग, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, बालविकास, बचतगट चळवळ सक्षम करणं अशा अनेक स्तरांवर त्यांची कामगिरी सरस ठरली आहे.

स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजनेसारख्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याने त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर अव्वल यश मिळालं आणि त्याबद्दल डॉ. देशमुख यांचं राष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे. अवघ्या १४ महिन्यात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून जिल्हा परिषदेला वेगळी उंची प्राप्त करुन दिली होती.

यवतमाळमध्ये प्रभावी कामगिरी

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही डॉ. राजेश देशमुख यांनी स्वतंत्र छाप सोडली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील फवारणीमुळे एकावेळी २२ जणांचा मृत्यू झाला होता. डॉ. देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वत: फवारणीयंत्र हाती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. फवारणीबाबत शेतकरी जनजागृतीसाठी अभियान सुरु केलं, त्यांच्या प्रयत्नांमुळेच नंतरच्या दोन वर्षात जिल्ह्यात विषारी फवारणीमुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांनाही त्यांनी वठणीवर आणलं. असहकार्य करणाऱ्या बँकांमधली सरकारी खाती बंद करुन त्यांनी त्या बँकांना शेतकऱ्यांना पिककर्ज देण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीचं कौतुक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतही झालं होतं ( IAS Dr. Rajesh Deshmukh done commendable work in Yavatmal ) .

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, सर्वांसाठी घरे, राष्ट्रीय महामार्गाचे काम, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठीचं अधिग्रहण, ऑक्सिजन पार्क, शासकीय कामकाजात सुलभता अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ.राजेश देशमुख यांनी यवतमाळचे लोकप्रिय व यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून जनमानसावर आपली छाप सोडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी राबवलेला मागेल त्याला शेततळे कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. त्याअंतर्गत जिल्ह्यात ७ हजार शेततळी निर्माण करण्यात आली. ९०० शेततळ्यात मत्स्यशेती सुरु झाली. यातून शेतकऱ्यांना जोडव्यवसाय मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात रेशीम शेतीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. १२ हजार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखून यशस्वी केला.

घरकूल योजना मिशन मोडवर राबविली. डॉ. राजेश देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. यवतमाळमधील त्यांच्या कार्याचं राज्य व देशपातळीवर कौतुक झालं आहे. त्या कारकिर्दीची दखल घेऊनच त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही बातमी लिहित असताना ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेत होते.

पुण्यातील ‘कोरोना’चे आव्हान

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणून जिल्हा कोरोनामुक्त करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान ते नक्की पेलतील, असा विश्वास जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी