29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रजामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

जामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

टीम लय भारी

जामखेड : करोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असतानाही चोरून दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागताच जामखेड पोलिसांनी हाॅटेल रंगोलीवर धाड टाकली. यात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. या कारवाईत पोलिसांनी लाखो रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्याची धडक कारवाई केली. त्याचबरोबर आघी शिवारात सुरू असलेला गावठी हातभट्टी दारू बनवण्याचा अड्डा उध्वस्त करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे.

सध्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. मात्र गावा गावात दारूच्या शोधासाठी तळीराम भटकत आहेत. दारू विक्रेत्यांना असेल त्या ठिकाणी गाठून दारू मिळवली जात आहे. दारूड्यांच्या मुक्त संचारामुळे करोनाचा धोका वाढला आहे. अवैध्य दारूची विक्री रोखण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी मोहिम हाती घेतली आहे. जामखेड शहरात करोनाचे चार रूग्ण आढळून आल्यापासुन शहरात कडेकोट बंदोस्त करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन मोठी खबरदारी घेत आहे. अश्याही स्थितीत तळीरामांना दारूचा पुरवठा करून घराबाहेर पडण्यास उद्युक्त केले जात असल्याची बाब जामखेड पोलिसांच्या कानी येताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या टिमने हाॅटेल रंगोलीवर धाड टाकली. येथे चोरून दारूची विक्री केली जात होती. यावेळी पोलिसांनी घेतलेल्या झडती हाॅटेलमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. लाखो रूपयांची दारू पोलिसांनी जप्त करत हाॅटेल मालक प्रदिप नरवडे याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस नाईक अजय साठे, पो काॅ बाजीराव सानप, शशी म्हस्के, सचिन पिरगळ सह आदींचा समावेश होता. तपास पो ना अजय साठे हे करत आहेत.

तर दुसरीकडे जामखेड तालुक्यातील आघी गावात सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी केलेल्या कारवाईत आघी येथील नारायण सुदाम पवार याच्या शेतातील लिंबाच्या आडोश्याला असलेल्या गावठी हातभट्टी दारू बनवण्याचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दहा हजार रूपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे नशाकारक रसायने व इतर साहित्य हस्तगत करून ते जागीच नष्ट केले. हातभट्टी दारू सेवनामुळे मानवी जीवितास विषबाधा होईल व जीवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना देखील कच्चे रसायन वापरून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे उद्देशाने विनापरवाना बेकायदा आपले कब्जात बाळगल्याप्रकरणी पोलिस काँस्टेबल सचिन पिरगळ यांच्या फिर्यादीवरून नारायण पवार याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी