27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी; नाना पटोलेंचा...

मोदी सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी; नाना पटोलेंचा घणाघात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली गोदिंया व भंडारा जिल्ह्यात संपन्न होत असलेल्या जनसंवाद यात्रेला नागरिक उदंड प्रतिसाद देत आहेत. जनसंवाद यात्रेच्या नवव्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. मोदी व भाजपा सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तिरोडा येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

आपल्या भाषणात पटोले म्हणाले, “केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी आहे.”

नाना पटोले पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी जे बोलतात नेमके त्याच्या उलटे करतात, शेतीचा खर्च कमी करून शेतमालाला दुप्पट भाव देतो असे म्हणाले होते पण प्रत्यक्षात शेतीचा खर्च प्रचंड वाढवला व शेतमालाचा भाव मात्र कमी केला. पेट्रोल, डिझेलवर शेतकऱ्यांच्या नावाने ४ रुपये कृषी कर घेतात आणि या कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये मोदी सरकार लुटते. वर्षभरात एका शेतकऱ्याकडून जवळपास १ लाख रुपये या कराच्या रुपाने लुटतात आणि शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली फक्त ६ हजार रुपये देतात. आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजपा पाठ थोपटून घेतात.”

“लोकशाहीमध्ये लोकांचे ऐकायचे असते पण आता ‘मी’ आहे जेथे ‘मी’पणा येतो तेथे ‘आम्ही’ संपते. म्हणूनच आता ‘मन की बात’ होत आहे. देशात फक्त ‘मन की बात’ सुरु आहे, मोदी सरकार जनतेला विचारत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व लोकशाही संपवण्याचे काम रोज सुरु आहे, शेतकरी रोज मरतो आहे, तरुणांना रोजगार नाही, महागाईबद्दल सरकार बोलत नाही. निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत, ओबीसी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. तलाठी भरतीतून तरुणांना कोट्यवधी रुपयांना सरकारने लुटले. देशातील व राज्यातील भाजपाचे हे सरकार जनतेच्या मुद्द्यावर लक्षच देत नाही. म्हणून जनतेच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहेत.”

“ही लढाई आपण एकत्र मिळून लढू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी काँग्रेस लढत आहे. केंद्रातील व राज्यातील अन्यायी, अत्याचारी भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा व काँग्रेसला सत्तेत आणा, तुम्हाला न्याय देण्याचे काम करेन,” पटोले म्हणाले.

हे ही वाचा 

कल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि एकनाथ शिंदेच झाले ट्रोल

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात कॉँग्रेस नेत्यांतर्फे जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगर शहरात जनसंवाद यात्रा पार पडली. माजी मंत्री व विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात जनसंवाद यात्रा काढली. ही पदयात्रा ५ दिवसांत ८५ किलोमीटरहून अधिक अंतर कापून कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुके आणि ५ मतदार संघात पोहोचली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली आज चौथ्या दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी