32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात कोरोना लसीअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यावेळी, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकावर एक गंभीर आरोप केला आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

“महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असे ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सोबत जोडले आहे. त्यात केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी चव्हाण यांनी दिली आहे.

लोकसभेत केंद्र सरकारने दिलेली माहिती

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे चव्हाण यांनी म्हटलेय आहे. ही वागणूक फक्त कोरोना लसीपुरतीच नाही, तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात आला आहे. लोकसभेत केंद्र सरकारने राज्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली. त्या माहितीनुसार आपण विविध राज्यांमधील रुग्णसंख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेतली तर धक्कादायक चित्र निर्माण होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

प्रति १ हजार रुग्णांमागे कोणत्या राज्यांना काय मिळाले?

  • गुजरात – N95 मास्क – ९६२३, पीपीई किट – ४९५१, व्हेंटिलेटर्स – १३
  • उत्तर प्रदेश – N95 मास्क – ३९१६, पीपीई किट – २४४६, व्हेंटिलेटर्स – ७
  • पश्चिम बंगाल – N95 मास्क – ३२१४, पीपीई किट – ८४८, व्हेंटिलेटर्स – २
  • तामिळनाडू – N95 मास्क – २२१३, पीपीई किट – ६३९, व्हेंटिलेटर्स – २
  • महाराष्ट्र – N95 मास्क – १५६०, पीपीई किट – ७२३, व्हेंटिलेटर्स – २
  • केरळ – N95 मास्क – ८१४, पीपीई किट – १९२, व्हेंटिलेटर्स – १

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी