33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमंत्रालयIAS अधिकाऱ्याची उत्कृष्ट कामगिरी, निवडणूक आयोगाने घेतली दखल !

IAS अधिकाऱ्याची उत्कृष्ट कामगिरी, निवडणूक आयोगाने घेतली दखल !

भारत निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची दखल घेत 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड साठी निवड केली आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल देशस्तरीय ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड्स’ शुक्रवारी (दि.20) जाहीर केले. मतदार शिक्षण आणि सहभागासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्हाधिकारी IAS अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 25 जानेवारी रोजी डॉ. देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या गेल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मतदार शिक्षण आणि सहभाग ही बाब निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, याची प्रशासनात जाणीव जागृती करत जिल्ह्यात मतदार शिक्षणाचे कार्यक्रम वर्षभर घेण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन, संविधान दिन, शिक्षक दिन, महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन आदी दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीचे कार्यक्रम घेत मतदार नोंदणी करण्यात आली. 25 नोव्हेंबर आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी 442 महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून 48 हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

VIDEO : आता रिमोट व्होटिंग, निवडणूक आयोगाची घरबसल्या मतदानाची सोय !

विविध उपक्रमांच्या माध्यमातून 94 हजारापेक्षा अधिक महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमे अंतर्गत गेल्या दोन वर्षांत सुमारे 7 लाख दुबार, छायाचित्र नसलेले आणि समान छायाचित्र असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना यापूर्वी देखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी