33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमंत्रालयSuper Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या...

Super Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवले; अन् न्यायालय कोपले !

निरुपद्रवी असलेल्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्या शापाचा छोटासा चटका उदय सामंत यांना बसला असावा. आणखी कुणाकुणाला हा छाप लागू शकतो अशा शंका व भिती अंधश्रद्धाळू, देवभोळ्या, धर्मांध लोकांच्या मनात येई लागल्यात.

उदय सामंतांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अन् एकनाथ शिंदे गटामध्ये टुनकन बेडूक उडी मारली. त्यानंतर मलईदार असलेले उद्योग खाते मटकावले. पण ही मलई त्यांना पचणार नाही की काय असे दिसतेय. कारण उद्योग खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर सामंत यांनी मोठा हात मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. सामंत यांनी गुपचूप डाव साधला होता. पण न्यायालयाने चपराक लगवल्यामुळे त्यांचा हा डाव फसला आहे. वरून नामुष्की ओढवली तो भाग निराळाच.‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ (MIDC) म्हणजे लोण्याचा गोळा आहे. या ठिकाणचे लोणी ओरपण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी वाट्टेल तेवढी किंमत मोजण्याची तयारी अशा अधिकाऱ्यांची असते.

बदली, नियुक्ती करण्यासाठी ‘टेंडर भरणे’ हा गुबगुबीत ‘कोड वर्ड’ मंत्रालयात प्रचलित आहे. एमआयडीसीमध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी उदय सामंत यांना तब्बल १९ अधिकाऱ्यांचे टेंडर मिळाले. इतके मोठे टेंडर मिळताच सामंत यांच्या तोंडाला पाणी सुटले. दुर्दैवाने त्यांना सल्ला देणारेही अवतीभवतीचे खुषमस्करे सुद्धा नमुनेदार निघाले. सामंत यांनी जुने शासन निर्णय, नियम यांचा नीट अभ्यास केला नाही, आणि बिनधिक्कतपणे या 19 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मलईदार पदांवर करून टाकल्या.

या १९ अधिकाऱ्यांच्या नेमणुका ज्या ठिकाणी करण्यात येणार आहेत, तेथील मूळ अधिकाऱ्यांचे काय होणार याची फिकीर सामंत यांनी ठेवली नाही. या ठिकाणचे बहुतांश अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेले होते. सामंत यांनी या अधिकाऱ्यांची MIDC मधील सेवा संपवून टाकली. या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यात जावे, असा हुकुमशाही निर्णय त्यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी घेवून टाकला. तिथेच सामंत यांच्या अब्रुचे खोबरे झाले. कारण यातील काही अधिकारी वर्षभरापूर्वीच MIDC मध्ये रूजू झाले होते.

हे सुद्धा वाचा…

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी वेदांता-फॉक्सकॉनच्या अपयशाचे श्रेय शिंदे सरकारच्या माथी मारले

Queen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे रहस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार अंत्यविधीला

Uday Samant : अनिल देशमुखांचे पणवती कार्यालय उदय सामंतांच्या नशिबी!

त्यांना काही महिन्यांपूर्वीच शासनाने मुदतवाढ सुद्धा दिली होती. या अधिकाऱ्यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात असल्याचे काही महिन्यांपूर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. शिवाय प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची सेवा कशा पद्धतीने समाप्त करता येते, व कशा पद्धतीने समाप्त करता येत नाही याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी आदेश काढलेले आहेत. सामंत यांनी जुन्या आदेशांची कसलीच पर्वा केली नाही. आलेले टेंडर सोडायचे नाही, एवढा विचार करून त्यांनी जुन्या अधिकाऱ्यांना अपमानास्पद पद्धतीने MIDC तील सेवेतून काढून टाकले.

यातील तीन अधिकाऱ्यांना हा अन्याय सहन झाला नाही. एफ. व्ही. आर. मुकादम, एन. व्ही. गवळी व ए. एस. मोरे असे या तिघा अधिकाऱ्यांची नावे आहेत. अपर जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी या संवर्गातील हे तिन्ही अधिकारी होते. त्यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा’मध्ये (मॅट) धाव घेतली. न्यायाधिरणाने तब्बल नऊ पानांचा भलामोठा आदेश पारीत केला आहे.

या अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे या आदेशात विस्ताराने नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या तिन्ही अधिकाऱ्यांना MIDC मध्येच काम करू देण्यास न्यायाधिकरणाने सांगितले आहे. त्यामुळे उदय सामंत यांची पुरती फजिती झाली आहे. त्यामुळे येथून पुढे तरी उदय सामंत आपल्या मंत्रीपदाचा मनमानीपणे वापर करणार नाहीत, यासाठी काळजी घेतील का असा सवाल करण्यात येत आहे.

उच्च व तंत्र शिक्षण खात्यात सुद्धा सामंत यांनी असेच मनमानी निर्णय घेतले होते. सीईटी सेल व महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळातील प्रवेश प्रक्रियेचे (MSBTE) सोशल मीडियाचे भलेमोठे कंत्राट देवून कारण नसताना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी केली होती. त्यांचे हे पाप त्यावेळी पचून गेले. यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण खात्यात काम केलेले राजेश टोपे यांच्याकडे सामंत यांनी शिकवणी लावली असती तर असे कंत्राट द्यायची गरजच नाही. हेच काम फुकटात अधिक प्रभावीपणे करता येते हे त्यांना समजले असते.

नवाब मलिक, अनिल देशमुखांची पणवती

धर्मभोळेपणा व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विद्यमान सरकार सत्तेत आहे. त्यामुळे जप, तप, भक्ती, देव – धर्म, ज्योतिष याला या सरकारमधील मंत्री अग्रक्रम देतात. त्यामुळे उदय सामंत यांच्यामागे कुणाची पणवती लागली असा विचार केला तर तो धर्माभिमानी लोकांच्या दृष्टीने रास्त ठरेल. उदय सामंत यांना यापूर्वी मंत्रालयाच्या समोर सिंधुरत्न हा बंगला मिळाला होता. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून या बंगल्याला नवे नाव दिले होते. शिवाजी महाराजांची आठवण सांगणारा हा बंगला सामंत यांनी सोडला. कारण तो छोटा होता. सामंत यांनी नव्या सरकारमध्ये मोठा बंगला मिळवला.

मलबार हिल या अलिशान परिसरातील मुक्तागिरी हा बंगला त्यांनी घेतला. मुक्तागिरी या बंगल्यात यापूर्वी नवाब मलिक यांनी वास्तव्य केले होते. दुसऱ्या बाजूला मंत्रालयातील अनिल देशमुख यांचे कार्यालय उदय सामंत यांनी घेतले. नवाब मलिक व अनिल देशमुख हे दोघेही सध्या तुरूंगात आहेत. नवाब मलिक व अनिल देशमुख यांना नक्की तुरूंगात का डांबले आहे, याचे खरे कारण ‘राजकारण’ हे आहे. घोटाळा हे फक्त निमित्त. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही दोन्ही ठिकाणे उदय सामंत यांना छळू लागली आहेत का, असा अंधश्रद्धाळू विचार देव, धर्म मानण्यांच्या मनात नक्कीच येईल.

निरुपद्रवी असलेल्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्या शापाचा छोटासा चटका उदय सामंत यांना बसला असावा. आणखी कुणाकुणाला हा छाप लागू शकतो अशा शंका व भिती अंधश्रद्धाळू, देवभोळ्या, धर्मांध लोकांच्या मनात येऊ शकतात. मंत्रालयात तर तशीच चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी