29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
HomeराजकीयMNS vs SS : मनसेने जे केले ते उघडपणे केले; शिवसेनेसारखे लग्न...

MNS vs SS : मनसेने जे केले ते उघडपणे केले; शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर अन् लफडं दुस-यासोबत केले नाही! संदीप देशपांडे यांचे अनिल परबांना प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई : आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते मंत्री अनिल परब यांच्या टीकेवर मनसेने जिव्हारी झोंबणारे प्रत्युत्तर (MNS vs SS) दिले आहे. मनसेने जे केले ते उघडपणे केले; शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर अन् लफडं दुस-यासोबत केले नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांना फटकारले आहे. यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेत जोरदार वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती.

अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेने जे केले ते उघडपणे केले आहे. आम्ही पोटात एक ओठात एक असे कधी केले नाही. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला जी भूमिका देशहिताची वाटली ती आम्ही देशासमोर मांडली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

आम्ही शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर आणि लफडे दुस-यासोबत केले नाही. तसेच शिवसेनेने मराठी आणि हिंदू लोकांसोबत दगाबाजी केली. त्यामुळे आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे सांगत देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी, अनिल परब यांनी भाजपा-मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली होती. अनिल परब म्हणाले होते की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही. मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल. मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे. आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे. ज्या भाजपा नेत्यांना लोकसभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते हे कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी