27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमुंबईगोविंदा आला रे आला.... आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल

गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल

व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दहीकाला अर्थात दहीहंडी उत्सव. कृष्ण जयंतीचा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात उंचच उंच दहीहंडी लावून हा सण साजरा करण्याची एक पद्धत आहे. या दहीहंडी उत्सवात मडक्याला खूप महत्व असते. हा उत्सव ७ सप्टेंबर म्हणजेच तीन दिवसावर आला असताना मडक्यांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. कल्याणमधील कुंभार आळीत रात्रंदिवस कलाकार हे काम करत आहेत. अनेक बाजारात मडकी दाखल झालेली आहेत.

श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही-लोणी खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. ‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला’ असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही पद्धत आहे.

कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. यावेळी राधा कृष्णाच्या मूर्तीचे पूजन केले जाते. अशा मूर्ती कल्याणच्या विराज आर्ट मध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. दीड हजारपासून तीन हजारपर्यंत या मूर्ती मिळतात अशी माहिती मूर्तिकार संतोष घोणे यांनी ‘लय भारी’ शी बोलताना दिली. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला ‘काल्याचे’ कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते.
हे सुद्धा वाचा
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे असे का म्हणाले…

वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते. गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते.

श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते. आपल्याकडे दहीहंडी उभारल्यावर मडक्यात दही, फळांच्या फोडी असतात. त्यामुळेच की काय दहीकाला उत्सव मडक्याशिवाय पूर्णच होत नाही. कल्याणच्या कुंभार वाड्यात दिडशेपासून ते थेट ३०० रुपयांपर्यंत मडकी उपलब्ध होतात. अनेक सार्वजनिक मंडळे त्यासाठी आधीच ऑर्डर देतात. त्यानुसार सुबक रंगरंगोटी केलेली ही मडकी विक्रीस तयार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी