27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमुंबईभुजबळांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना मिळते सन्मानाची वागणूक

भुजबळांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना मिळते सन्मानाची वागणूक

राज्यातील जनता मंत्रालय वा, मंत्र्यांच्या घरी गेल्यावर आपल्या समस्यांचे निवारण होईल; या आशेने  मुंबई गाठतात. लांब मतदार संघातील कार्यकर्ते, मुंबईसह शहरातील विविध उपनगरातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे मंत्र्यांचे बंगले कायम गजबजलेले असतात. पण काही मंत्र्यांच्या बंगल्यात कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळते का? तर त्याचे उत्तर नकारार्थी असतेच. असे असताना मंत्रालयाजवळ जवळ असणाऱ्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘सिद्धगड’ या बंगल्यावर सकाळपासून कार्यकर्त्यांची रीघ लागते. मग सकाळी वा, दिवसभरात कधीही आलेल्या कार्यकर्त्याला मस्त चहा पाणी देण्यात येतो. त्यांच्या बंगल्यातील कर्मचारी अतिशय सौजन्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांशी वागतात. त्यामुळेच की काय भुजबळांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या सन्मानाच्या वागणुकीची सगळीकडे चर्चा आहे.

भाजीविक्रेता ते मंत्री यशस्वी कारकीर्द
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा लढवय्या सैनिक, शिवसेनेचा पहिला महापौर,आमदार नंतर मंत्री, उपमुख्यमंत्री असा भुजबळ यांचा राजकीय प्रवास आहे. हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. भायखळ्याच्या मंडईत भाजीचे दुकान सांभाळत छगन भुजबळ यांनी मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. ते शालेय वयात असताना शिवसेनेचे नाव झाले आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना जॉईन करून समाजासाठी भरीव कार्य केले पाहिजे यापोटी ते शिवसेनेत दाखल झाले. शाखाप्रमुख आणि नगरसेवक महापौर, आमदार, उपमुख्यमंत्री  असा पल्ला गाठला.

शिवसेनेचा पहिला महापौर 
१९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेचे महापौर झाले. १९९० च्या दशकात मंडल आयोगावरून राज्यातले वातावरण धुमसू लागले. शिवसेनेची मंडल आयोगाबाबतची भूमिका भुजबळ यांना काही पटली नाही आणि त्यांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. नागपूर अधिवेशनात भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम करत शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी सुरुवातीला कॉग्रेसमध्ये प्रवेश केला, नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याचवर्षी राष्ट्रवादीची प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

महत्वाची मंत्रीपदे भूषवली 

१९८५ व १९९० अशा दोन वेळा शिवसेनेकडून भुजबळ मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून आले. नोव्हेंबर १९९१ मध्ये ते मंत्री झाले. महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले. १८ ऑक्टोबर १९९९ रोजी भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली.

एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. शिवसेना सोडल्यावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर भुजबळ यांनी २००४ मध्ये येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि निवडून आले. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. राजकारण करता करता समता परिषदेच्या माध्यमातून ते समाजकारण करत आहेत.

हे सुद्धा वाचा
रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
सरकारी कंत्राटी भरतीसंदर्भात मोठा निर्णय…
स्टार्टअप, नवीन संशोधनाला नव्या शैक्षणिक धोरणात महत्व – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

सौजन्याची अशीही वागणूक

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार आठ आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यात भुजबळ यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांना राज्य मंत्रिमंडळात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही खाते मिळाले. त्यांचा बंगला मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सेंटरजवळ सिद्धगड हा बंगला मिळाला. या बंगल्यावर सकाळी १०पासून रात्रीपर्यंत कार्यकर्त्यांचा राबता असतो. अनेक कार्यकर्ते ग्रामीण भागातून येतात. अनेकजण मुंबई जवळच्या उपनगरतून येतात. या सगळ्या कार्यकर्त्यांना भुजबळ यांच्या बंगल्यात सौजन्याची वागणूक मिळते. सोबत चहा आणि पाण्यासाठी आपुलकीने विचारणा होते. अशा वागणुकीमुळे कार्यकर्ते सुखावतात. छगन भुजबळ हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे दु:ख त्यांना कळते. त्यामुळेच आपल्या बंगल्यावर येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला ‘सौजन्याची वागणूक’ दिली पाहिजे, अशा सूचना  त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी