28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमुंबईकोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन...

कोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन प्रवास

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. कोविड नंतर मुंबई विमानतळावरुन एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. कोविड नंतर मुंबई विमानतळावरुन एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी केवळ दोन वेळा या पेक्षा अधिक प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला आहे. मात्र कोविडनंतर प्रथमच हा विक्रम झाला आहे. मुंबई विमानतळावरील देशांतर्गत प्रवास करणाऱ्या १ लाख ११ हजार ४४१ प्रवासी व आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या ३९ हजार ५४७ जण अशा एकूण १ लाख ५० हजार ९८८ प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे. एक धावपट्टी असलेल्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये मुंबई विमानतळाचा समावेश होतो. १० डिसेंबर रोजी हा विक्रम प्रस्थापित करण्यात मुंबई विमानतळ प्रशासनाला यश आले. कोविड काळात मुंबई विमानतळावरुन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वाधिक म्हणजे ७३ हजार ५०९ प्रवाशांनी एका दिवसात प्रवास केला होता.

कोविड पूर्वी २० डिसेंबर २०१९ रोजी १ लाख ५० हजार २७६ प्रवाशांनी एका दिवसात प्रवास केला होता. २१ डिसेंबर २०१८ रोजी एका दिवसात १ लाख ५६ हजार ३२९ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला होता. २२ डिसेंबर २०१७ रोजी १ लाख ५२ हजार ५६२ प्रवाशांनी प्रवास केला होता. विशेष म्हणजे एका दिवसात दीड लाख प्रवाशांनी प्रवास करण्याचे प्रसंग डिसेंबर महिन्यातच घडले आहेत.

हे सुध्दा वाचा

माझ्या विचारांचा सरपंच निवडून न आल्यास निधी देणार नाही; नितेश राणे म्हणाले याला धमकी समजा किंवा काहीही…

आता शिवरायांच्या पंक्तीत मोदींना बसवू पाहत राज्यपाल ‘पॅकअप’च्या मूडमध्ये; घटनात्मक पदाचा प्रोटोकॉल धाब्यावर, राष्ट्रपतींऐवजी अमितभाईंकडे मागितले मार्गदर्शन!

सर्वसामान्यांना दिलासा; महागाईचा आलेख खालावला

१० डिसेंबर २०२२ रोजी देशभरात ५ हजार ५८६ उड्डाणांच्या माध्यमातून ८ लाख २७ हजार ४२९ प्रवाशांनी हवाई प्रवास केला. त्यामध्ये देशातील विविध विमानतळांवर मिळून ४ लाख १४ हजार ११४ प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला, अशी माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देण्यात आली. २०१८-१९ मध्ये मुंबई विमानतळावरुन ४८.८३ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता.

मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत कोविड काळात कमालीची घट झाली होती. मात्र कोविड नंतरच्या काळात आता पुन्हा मुंबई विमानतळ गर्दीेेने गजबजू लागले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागू लागल्या आहेत.
मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत. मात्र त्या दोन्ही धावपट्ट्या एकमेकांना छेदणाऱ्या असल्याने एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर करता येतो. एक धावपट्टी असलेल्या विमानतळांमध्ये मुंबई विमानतळ सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. २०१८ च्या डिसेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरुन २४ तासांत तब्बल १००४ विमानांची वाहतूक करण्यात आल्याचा विक्रम प्रस्थापित करण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी