29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईवर्तणुकीतील तफावतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची गरज - प्रा. प्रविण बांदेकर

वर्तणुकीतील तफावतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची गरज – प्रा. प्रविण बांदेकर

शिक्षण संस्थांमध्ये धर्मांधता व अंधश्रद्धेला पूरक असे वातावरण अतिशय जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. विरोधक धर्मामध्ये घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे समाज प्रबोधन करताना, रूढी परंपरांवर आघात करताना त्यामध्ये शिरूनच आपल्याला बदल घडवून आणावे लागतील, बाहेरून आघात करून चालणार नाही, असे विचार प्रा. बांदेकर यांनी मांडले आहेत.

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी देशात; तसेच जागतिक पातळीवर फसव्या विज्ञानाविरोधात केलेला संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. या असल्या छद्मविज्ञानाविरोधात आपण सर्वांनी सावध राहणे; तसेच त्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. बुवाबाजी, अंधश्रद्धा, ढोंग इत्यादी विरोधात पुरावे देऊन या कार्यकर्त्यांनी योग्य तेथे तिखट भाषेत टीका केलेली आहे. लबाडी करणे, खोटेपणाने वागणे ही केवळ विकृती आणि वर्तणुकीतील विसंगती नव्हे, तर तो फसव्या विज्ञान क्षेत्रातील एक आवश्यक घटक बनलेला आहे. विशेषतः वर्तणुकीतील विसंगतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे, ते करित असताना स्वतःच्याही वागवणूकीतील विसंगती दूर केल्या पाहिजे, असे परखड मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रविण देशमुख यांनी मालवण येथील नाथ पै. सेवांगणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आधारस्तंभ व शतकवीर पुरस्कार’ वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपले विचार मांडले. (Prof. Pravin Bandekar)

सध्या देश एका कठीण कालखंडातून जात आहे. देशातील सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. याला पांढरपेशी लोकांची थंड राहण्याची आणि उदासीन वृत्ती कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संस्थांमध्ये धर्मांधता व अंधश्रद्धेला पूरक असे वातावरण अतिशय जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. एकाच वेळी विज्ञानावरती बोलत असतानाच परस्पर विरोधी धार्मिक कृतींचा सर्रास वापर केला जातो आहे, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

अनेक शिक्षक सुद्धा सार्वजनिक जीवनात अवैज्ञानिक गोष्टी करित असतात. वर्तणुकीतल्या अश्या विरोधाभासी वातावरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. समाजाला याच परस्परविरोधी वर्तनुकीची जाणीव करून देण्याची मोठी जबाबदारी समितीच्या कार्यकर्त्यांवरती आहे. समाज संभ्रमित झालेला आहे. त्यामुळे बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वर्तनुकीतील विसंगत वर्तन हे सनातन्यांच्या पथ्यावरती पडू नये यासाठी आपण सावध राहायला हवं असे सुचनाही त्यांनी केल्या. सनातन्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले अडथळे आधी दूर करावे लागणार आहेत.

विशेषतः एखादी संस्था आपल्याला पुरस्कार देते आणि ती संस्था जर त्यांच्या ध्येयधोरणापासून दूर जात असेल तर तो पुरस्कार परत देण्याची पण तयारी आपली असली पाहिजे अशी अपेक्षा सध्या राज्य शासनाच्या पुरस्कार देण्याच्या पद्धतीतील विसंगतीवर भाष्य करताना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांची जबाबदारी देखील अधिक वाढते. ज्या संस्थेने आपल्याला पुरस्कार दिला, तिच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. ‘दी ब्लाइंडनेस’ या नोबेल प्राईस विनर जगप्रसिद्ध कादंबरीच्या लेखकाचा संदर्भ देवून, अंधश्रद्धा ही जन्मजात नसून ती त्या व्यक्तीवर समाजामार्फत लादली गेलेली असते आणि म्हणूनच ती आपण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी दूर करू शकतो. हा विश्वास एक कार्यकर्ता म्हणून या सर्व पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना आहे व हीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी आशादायी बाब आहे, असे मत प्रा. प्रविण बांदेकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना नाथ पै. सेवांगणाचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनी ‘अंधार फार झाला पणती जपून ठेवा’ अशा शब्दात सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे यावर आपले सविस्तर मत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी याच परिस्थितीचा आवाका जाणून घेत, समजून घेत काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपले अनुभव उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडलेत. परिस्थितीचे भान ठेवून व सध्याचे धर्मांध वातावरण पाहता, धर्माची कृतीशील चिकित्सा करताना त्या धर्माला समजून घेतच प्रबोधन केलं पाहिजे असे मत व्यक्त केले.

विरोधक धर्मामध्ये घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे समाज प्रबोधन करताना, रूढी परंपरांवर आघात करताना त्यामधे शिरूनच आपल्याला बदल घडवून आणावे लागतील, बाहेरून आघात करून चालणार नाही, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा : अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

या पुरस्कर वितरण सोहळयाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त सचिव दीपक गिरमे, गणेश चिंचोले, अंधश्रद्धा निर्मूलन वृत्तपत्राचे संपादक राजीव देशपांडे, संपादक मंडळाच्या सदस्य मुक्ता दाभोळकर,
कार्यकारी समिती मंडळातील सदस्य हमीद दाभोलकर, प्रा. प्रविण देशमुख, प्रा. अशोक कदम, फारूख गवंडी, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, सम्राट हटकर, प्रकाश घादगिणे सह महाराष्ट्रच्या २३ जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी