33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमुंबईनको तो जीवघेण्या गर्दीचा प्रवास; लोकलमध्ये महिला डबे वाढवण्याची महिला संघटनेची मागणी

नको तो जीवघेण्या गर्दीचा प्रवास; लोकलमध्ये महिला डबे वाढवण्याची महिला संघटनेची मागणी

मुंबईत कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. त्यातुलनेत उपनगरीय लोकलमधील महिलांच्या डब्यांची संख्या काही वाढलेली नाही. मर्यादित डब्यांमुळे महिला प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे महिला डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

देशातील सर्वाधिक प्रवासी महिलांचा टक्का उपनगरीय लोकलमध्ये आहे. यामुळे महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन असणे आवश्यक आहे. सध्याच्या हेल्पलाईनमध्ये सर्वच प्रवाशांचे कॉल जात असल्याने महिलांना योग्यवेळी मदत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरून पनवेल-वाशी-नेरुळ येथून महिला नोकरी, शिक्षण आणि इतर कामासाठी मुंबईत येतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर जलद लोकल नाही. यामुळे धीम्या लोकलनेच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. यातही महिला डब्यांची संख्या कमी असल्याने महिलांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ‘निर्भया निधीची तरतूद केली आहे. महिलासाठी या निधीचा वापर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अन्य बाबीच्या पूर्ततेसाठी हा निधी वापरला जातो. महिला डब्यात गस्त घालणाऱ्या आरपीएफ आणि रेल्वे पोलीस सर्वच डब्यामध्ये अपेक्षित असताना प्रत्यक्षात नाममात्र गस्त घातली जाते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षित प्रवासाचे काय असा प्रश्न तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत निर्भया निधीतून कोणती कामे केली आहेत. या निधीपैकी किती निधी वापरात आहे आणि किती निधी पडून आहे, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

1 कोटींचा विक्रमी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षक

मंगलप्रभात लोढा यांच्या विधवा नामकरण प्रस्तावाला महिला संघटनेचा आक्षेप

आता महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Women Travel Association demand to increase ledies coach in local

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी