33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाऋषभ पंत घाबरलेला होता, थरथरत होता; वाचविणाऱ्याला म्हणाला, आधी आईला कॉल करा..

ऋषभ पंत घाबरलेला होता, थरथरत होता; वाचविणाऱ्याला म्हणाला, आधी आईला कॉल करा..

कार अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंत घाबरलेला होता, थरथरत होता. तो त्याला वाचविणाऱ्याला म्हणाला, आधी आईला कॉल करा. ऋषभ पंतवर सध्या डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर हरियाणा परिवहन बसचालक सुशीलकुमार याने ऋषभ पंतला मदत केली. आश्चर्य म्हणजे, सुशीलकुमार क्रिकेट पाहत नाही. आपण ज्याला वाचवतोय, तो एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे, हेही त्याला माहिती नव्हते. ऋषभ पंतने त्याला स्वत: सांगितले, की तो स्टार क्रिकेटपटू आहे.

ऋषभ काल, शुक्रवारी दिल्लीहून उत्तराखंड येथील रुडकी येथे त्याच्या घरी जात असताना पहाटे सव्वा पाचच्या त्याचा अपघात झाला होता. त्यावेळी तो एकटाच कार चालवत होता. पेंगलेल्या अवस्थेत ऋषभने कार डिव्हायडरला ठोकल्यानंतर त्यांच्या गाडीत आग लागली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. अतिशय भीषण स्थितीतही हार न मानता, कारच्या खिडकीची काच तोडून ऋषभ कारमधून बाहेर पडला. त्यावेळी हरियाणा परिवहनची बस तेथून जात होती. बसचालक सुशील कुमार आणि त्याचे सहकारी जखमी ऋषभ पंतच्या मदतीला धावले. त्यांनी त्याच्यावर प्रथमोचार केले. उबदार रजाईही दिली. याशिवाय, त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सलाही बोलावले. त्यामुळे क्रिकेटपटू ऋषभ पंतवर वेळीच उपचार होऊन त्याचे प्राण वाचू शकले. सध्या त्याच्यावर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

हरियाणा परिवहन बसचा 42 वर्षीय चालक सुशीलकुमार याने सांगितले की, आमच्या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. ऋषभची कार आमच्या बसच्या पुढेच अतिशय वेगात चालली होती. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास 300 मीटर पुढे असलेल्या त्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरला धडकली. नंतर खिडकीची काच तोडून कुणीतरी धडपडत बाहेर आले. ती व्यक्ती जखमी अवस्थेत होती. प्रवासी चला, जाऊद्या, पोलिस येतील, असे सांगत होते. मात्र, मला आशा स्थितीत तिथून निघून जाणे योग्य वाटले नाही. मी स्वत: मग बस रस्त्याच्या कडेला थांबवून वाहक परमजीत सिंग आणि काही संवेदनशील प्रवाशांसह बसमधून उतरून बाहेर आलो. आम्ही तातडीने समोरच्या जखमी प्रवाशाच्या मदतीला धावलो.

rishabh pant
क्रिकेटपटू ऋषभ पंत (फाईल फोटो) आणि अपघातग्रस्त कार

सुशीलकुमार म्हणाला, “आम्ही तीन-चार जण कारजवळ पोहोचलो तेव्हा कार आगीत जळून खाक होत होती. कारमधून धडपडत बाहेर पडलेली ती जखमी व्यक्ती तेव्हा निपचित पडलेली वाटत होती. आम्हाला वाटले तो कारचालकच आहे. त्यांची हालचाल होत नाही पाहून आम्हाला वाटले की त्याचा मृत्यूच झालाय. नंतर 2-3 मिनिटांनंतर त्याला शुद्ध आली. त्याने आम्हाला तुटक-तुटक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला, पाठीवर जखमा होत्या. वाहकाने आणि मी मिळून त्याला कारजवळील आगीतून बाहेर काढले आणि उचलून रस्त्यावर बसजवळ आणले. आम्ही ताबडतोब 112 वर कॉल करून पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाला सूचना दिली.”

हे सुद्धा वाचा : 

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

त-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला, त्याला फरक पडत नाही

VIDEO : गुजरातबाहेर ब्रँड मोदी फेल! एकत्र आल्यास विरोधकांना मोठी संधी

‘इंडियन एक्सप्रेस’ने ऋषभ पंतला वाचविणाऱ्या सुशीलकुमारशी बातचीत केली. त्यानुसार, ऋषभने स्वतः सुशीलकुमारला सांगितले, की मी एक क्रिकेटर आहे. सुशीलकुमारने त्याला विचारले, की तुझ्यासोबत दुसरे कोणी आहे का? तेव्हा ऋषभ पंत म्हणाला, मी एकटाच आहे. यानंतर त्याने सांगितले, की माझ्या आईला फोन करा. सुशीलकुमारने कॉल केला; पण तिचा फोन बंद होता. तेव्हा ऋषभ थरथरत होता. बहुधा थंडीने हुडहुडत असावा. सुशीलकुमारने बसमधील एका प्रवाशाकडून रजाई घेतली आणि त्याला दिली. तेव्हा ऋषभ पंत खूपच घाबरलेला होता. तो जास्त बोलतही नव्हता. काही वेळाने पोलीस आणि रुग्णवाहिका आली.

ऋषभ पंतला वाचवणारा म्हणाला, मी क्रिकेट बघत नाही!
ऋषभ पंतला वाचवणाऱ्या सुशीलकुमारला जेव्हा ऋषभने क्रिकेटपटू म्हणून ओळख सांगितली, तेव्हाही त्या बसचालकाने त्याला ओळखले नाही. सुशीलकुमारने ऋषभ पंतला सांगितले, ” मी जास्त क्रिकेट पाहत नाही. मी हरियाणाचा आहे, त्यामुळे मला कबड्डी आवडते.” सुशीलकुमार गेल्या 9 वर्षांपासून बसचालक म्हणून काम करत आहे. “समोर अपघात घडत असताना त्या व्यक्तीला वाचविणे, त्यांची मदत करणे, याला माझे पहिले प्राधान्य आहे. धुक्यात असे अपघात सर्रास घडतात. समोरील कारमध्ये एखादा क्रिकेटपटू आहे, की आणखी कुणी, ते आम्हाला माहिती नव्हते. कुणीही असते तरी आम्ही मदतीला धावलोच असतो. एक जीव वाचविल्याचे समाधान आहे,” असे सुशीलकुमारने मुलाखतीत सांगितले.
Rishabh Pant Said Call Mother, Bus Driver Sushil Kumar, क्रिकेटपटू ऋषभ पंत, बसचालक सुशीलकुमार, आईला कॉल करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी