32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
HomeराजकीयNCP : नाथाभाऊ काय चीज आहे ते आता दाखवून देऊ : शरद...

NCP : नाथाभाऊ काय चीज आहे ते आता दाखवून देऊ : शरद पवार

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. (Senior BJP leader Eknath Khadse joined the NCP in the presence of NCP President Sharad Pawar.)

यावेळी शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकारणातील कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल, यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असे म्हटले. एकदा शब्द दिला म्हणजे नाथाभाऊ मागे हटत नाहीत. त्यामुळे आता ख-या अर्थाने नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ, असा इशारा पवारांनी दिला आहे.

आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरू विचारांचा होता. एक काळ असा आला की काँग्रेसला उतरती कळा लागली. त्याकाळात भाजपची नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचे काम नाथाभाऊंनी केले. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात या जिल्ह्यातील कार्यकर्ता यशस्वी झाला ते केवळ नाथाभाऊंमुळे. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू होतोय, असे शरद पवार म्हणाले. आता यानंतरच्या काळामध्ये हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचाराने चालणार, असे चित्र उभे करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार, असा शब्द यावेळी खडसेंनी आपल्याला दिला असल्याचे पवारांनी सांगितले.

खडसेंचा अनुभव पक्षासाठी अनुभवाचा ठरेल. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळेल, अशी चर्चा असताना शरद पवारांनी त्यावरही भाष्य केले. नाथाभाऊंची पक्षातील अनेकांशी चर्चा झाली. पण त्यांनी एका शब्दाने आपली ही अपेक्षा आहे असे कधीही सांगितले नाही. कोणतेही बदल होणार नाहीत. आहेत ते सर्व तसेच राहतील. महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा असल्याचे खडसेंनी सांगितले, असे शरद पवार म्हणाले.

भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू – खडसे

त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केले, तितकेच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.
खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५-६ आमदार निवडून येतील

गेल्या ४० वषार्पासून एकनाथ खडसेंनी अनेकांना न्याय मिळवून दिला. विकासाची दृष्टी असणारे, प्रशासनावर वचक असणारा नेता राष्ट्रवादी आले त्याचा आनंद आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल. जळगाव जिल्ह्यातून किमान ५-६ आमदार एकनाथ खडसेंमुळे निवडून येईल असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला.

अजित पवार नाराज नाहीत!

खडसेंच्या पक्ष प्रवेशाला अजित पवार उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शरद पवारांनी त्याचेही खंडन केले. मीडियामध्ये लोक परस्पर काहीतरी जाहीर करून टाकतात. मला आश्चर्य वाटतं. कोरोनाच्या काळात आमच्यातील अनेकांना त्रास झाला. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना दिल्या आहेत. त्यातून एखादा सहकारी नसेल तर गडबड आहे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले.

पक्षप्रवेश सोहळा

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कुणी किती भूखंड घेतले ते दाखवतो : खडसे

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणा-यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे खडसे यांनी म्हटले. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.

त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन

४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील खडसे यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी