29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयशिंदे सरकार जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टाचा फैसला कधी ? निकालाबाबत पाच...

शिंदे सरकार जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टाचा फैसला कधी ? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निकालाकडे सर्वांचेच लक्ष; घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम.आर. शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत, तत्पूर्वीच निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात एक खास परंपरा पाळली जाते. त्यातच पहिल्या आठवड्यात लॉंग वीकएंड आणि 13 व 14 मे रोजी सुटी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल नक्की कधी येऊ शकतो, निकालाबाबत सहमती नसेल आणि एखाद-दोन न्यायाधीशांचे वेगळे मत असेल तर काय, यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया ...

मे महिना उजाडला आहे. आता शिंदे सरकार जाणार की राहणार? यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. ही सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम.आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा निकाल येण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णमुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून घेतल्या आहेत. ही सर्व सुनावणी 16 मार्च रोजीच पूर्ण झालेली आहे. आता फक्त निकाल यायचा राहिला आहे. घटनापीठाने राखून ठेवलेला हा निकाल कधी येणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

याच पार्श्वभूमीवर, शिंदे सरकार येत्या 2-3 आठवड्यात कोसळेल, असे भाकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडेच केले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनाही गेल्या काही दिवसांपासून वेग आलेला दिसत आहे. सुप्रीम कोर्टात सत्राच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी साधारणत: कोणताही महत्त्वाचा निकाल दिला जात नाही, अशी परंपरा आहे. त्यातच 13 आणि 14 मे रोजी सुप्रीम कोर्टाला सुटी आहे. त्या आधी पहिल्या आठवड्यात लॉंग वीकएंड आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात 12 मे पूर्वी महाराष्ट्राचा निकाल येऊ शकतो. नक्की कधी येऊ शकतो निकाल, यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया …

या पंधरवड्यात कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल माईलस्टोन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार की जाणार ? या संदर्भात “झी 24 तास” वृत्तवाहिनीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील मराठी वकीलांशी खास बातचीत केली. अॅड. सिद्धार्थ शिंदे, अॅड. आकाश काकडे, अॅड. कश्मीरा लांबट, अॅड. श्वेतल शेफाल, अॅड. यतीन जगताप, अॅड. प्रशांत केंजळे, अॅड. राज पाटील ही अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारी दिग्गज मंडळी “झी 24 तास”च्या वार्तालापात सहभागी झाली होती.


8 ते 12 मे दरम्यान दिला जाऊ शकतो निकाल : अॅड. सिद्धार्थ शिंदे

15 मे रोजी जस्टीस शाह निवृत्त होत आहेत. तर त्यांच्या आधीच म्हणजे 12 तारखेपूर्वीच निकाल येऊ शकतो. कारण 13 व 14 मे रोजी कोर्टाला सुटी आहे. 15 ला, शेवटच्या दिवशी साधारणत: कोणताही महत्त्वाचा निकाल न देण्याची परंपरा आहे. त्यामुळे 12 तारखेच्या आतच निकाल येऊ शकतो. अजून जर आपण पाहिले तर शुक्रवार, 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार असा लॉंग वीकएंड येत आहे. तर आता अशी शक्यता जास्त आहे, की 8 मे ते 12 मे दरम्यान निकाल दिला जाऊ शकतो.



अॅड. प्रशांत केंजळे

यावर्षी 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आली आहे. बुद्ध पौर्णिमेची सुटी घोषित झाली आहे. 5, 6 आणि 7 मे हे तीन दिवस सुटीचे आहेत. असे होऊ शकते, की घटनापीठातील पाचही न्यायाधीश एकत्र येऊन सोयीचे ठरवून 8 मे रोजी निकाल देऊ शकतात. यासंदर्भातील जे नोटिफिकेशन आहे, ज्याला सप्लिमेंटरी लिस्ट म्हणतात, ते कदाचित शनिवारी दिले जाऊ शकते.

अॅड. राज पाटील
निकालाची तारीख (प्रोनाऊन्समेंट डेट) ही निश्चितपणे आधी कळते. सुप्रीम कोर्टाच्या नोटिफिकेशनमध्ये, कॉज लिस्टमध्ये ती दाखविली जाते. त्यामुळे निकालाची आगाऊ माहिती कळेलच. या निकालावर महाराष्ट्रातील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून देशभरातील लोकांना महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर वाटते. देशभरातील सर्व राजकीय पक्षांच्या नजरा या निकालाकडे आहेत. देशातील राजकारणासाठीही हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे.


या निकालाला एव्हढा वेळ लागतोय कारण …. : अॅड. आकाश काकडे

या निकालाला एव्हढा वेळ लागतोय कारण सर्व न्यायाधीशांची जोपर्यंत कुठल्याही निकालाबाबत सहमती होत नाही, तोपर्यंत प्रत्येक न्यायाधीश निकालपत्रावर सही करणार नाही. मग कुणाचे जर काही वेगळे असेल त्यात मत तर वेळ लागतो. तसा सर्वसाधारण हा निकाल 3-2 ने अपेक्षित आहे. कोण कुठे 3 मध्ये जाईल, कोण 2 मध्ये जाईल, ते आता सांगता येणार नाही. सुनावणी सुरू असताना 3-2 चे चित्र दिसून येत होते. न्यायाधीशांच्या कलाचा अंदाज येत होता. एखादे न्यायाधीश डिसेंटिंग ओपिनियन जजमेंटसुद्धा लिहू शकतात. त्यामुळे किती दिवसात येईल, कधी येईल, काय येईल, हे काही सांगता येत नाही.



अॅड. कश्मीरा लांबट
घटनापीठ फक्त मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीनच दिवस कामकाज करते, असे काही नाही. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार असा कधीही निकाल येऊ शकतो. आज 1 मे रोजी सुद्धा एका प्रकरणात घटनापीठाने निकाल दिला आहे. न्यायमूर्ती शाह हे निवृत्त होण्यापूर्वी आता 15 मे च्या आत कधीही निकाल लागू शकेल.

अॅड. श्वेतल शेफाल
काही प्रकरणात संबंधित न्यायाधीश आजारी असल्याने घरून सुनावणी करत आहेत. मात्र, त्याचा किंवा सुप्रीम कोरतातील कामकाजाचा या निकालावर काहीही परिणाम होणार नाही. घटनापीठाचे नियमित कामकाज सुरूच आहे. हाही निकाल 15 मे पूर्वीच येईल. हा निकाल देशातील सर्व राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.



याशिवाय जाणून घ्या 

  1. महाराष्ट्रातील प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकते, की सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवू शकते?
  2. महाराष्ट्रात पुन्हा पूर्वीची परिस्थिती येऊ शकते का? घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का?
  3. जर न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल आला नाही तर काय?
  4. महाराष्ट्रातील सत्तसंघर्ष सात न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाऊ शकतो का?
  5. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?


अॅड. सिद्धार्थ शिंदे

सलग सुटयांचा कोर्टाच्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नाही. याच घटनापीठाकडे 16 फेब्रुवारी रोजी दिल्ली विरुद्ध केंद्र सरकारचा निकाल राखून ठेवलेला आहे. तोही अजून आलेला नाही. तोही आता अपेक्षित आहे. अनेक प्रकरणात राखीव निकाल यायला 2 ते 3 महीने लागतात. सुप्रीम कोर्टात अनेक निकाल प्रलंबित आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात आपल्याला याचे महत्त्व जास्त वाटतेय, कारण आपण महाराष्ट्राशी संबंधित आहोत. 15 मे पूर्वी आपला निकाल नक्कीच येऊ शकेल.

Maharashtra Political Crisis, Shinde Govt Will Remain or Go , Supreme Court Verdict, Supreme Court, Maharashtra 16 MLA Disqualification

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी