29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयमराठ्यांचे वाटोळे करणारे 'ते' कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार

मराठ्यांचे वाटोळे करणारे ‘ते’ कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार

मराठा आरक्षणावरून आता मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यापूर्वी जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal ) यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ हे दोघेही ओबीसी नेते आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मराठा नेते आणि ओबीसी नेते यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आता जरांगे-पाटील यांनी थेट विजय वडेट्टीवारांना आव्हान दिले आहे. येत्या २४ डिसेंबरला अशा सहा नेत्यांची नावे सांगतो ज्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे, असा इशारा जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. त्यामुळे सरकारविरोधात असलेल्या मराठा आंदोलनाचा मार्ग बदलणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते.

तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुम्ही कुणासाठी काम करता हे कळले असून तुमच्या सारख्याच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, असे सुनावत जरांगे-पाटील यांनी ‘तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे आणि मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात’ अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे.

मराठा समाजातील युवकांनी नीट अभ्यास करून, विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपले भले नक्की कशात आहे, याचा विचार करावा, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावरून संतप्त झालेल्या जरांगे-पाटील यांनी यांनी त्यांना सुनावले आहे. ‘मराठ्यांना मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता उगाच फालतू शब्द बोलून तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुले दूधखुळी नाहीत. मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही, या शब्दांत जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपूर्वी जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Aarakshan) जोरदार वाद झाला होता. तो वाद अजून शमलेला नसताना आता जरांगे-पाटील विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष सुरू झाला आहे. तुम्हाला मराठा समाजाविषयी माया नाही. काय करायचे हे आम्हाला तुम्ही सांगू नका. अभ्यास करायचा की नाही हे आमच्या मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं आहे, असा घणाघाती वार जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. शिवाय असं काहीतरी फालतू बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात, असा आरोपही त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

हे ही वाचा

प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

नवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा रद्द

दरम्यान, जरांगे-पाटील एवढ्यावरच थांबलेले नाहीत. तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही पाच-सहा जण काय नमुने आत, हे आम्हाला कळलं आहे. त्यामुळे तुम्ही मराठ्यांचे शत्रू झाला आहात. आता कुणबी नोंदीचे पुरावे मिळू लागले म्हणून  काहीही बोलू लागले आहेत. मात्र थोडे थांबा, मराठे आता काही दिवसांत तुम्हाला सल्ले शिकवतील. मराठ्यांना विरोध करा, हेच राहुल गांधींनी तुम्हाला शिकवले का, असा सवालही जरांगे यांनी वडेट्टीवार यांना केला आहे. शिवाय मराठा समाजाचे वाटोळे करणाऱ्या त्या ६ जणांची नावे २४ डिसेंबरला सांगतो, असा इशाराच मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी