30 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeराजकीयराजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सोमवारी 24 जणांचा मृत्यू झाला तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असताना या मृत्यूंची दखल आता मुंबई हायकोर्टानं घेतली असून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सु-मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. गुरुवारी सकाळी यावर तातडीची सुनावणी होणार आहे. राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे हे मृत्यू प्रकरण गाजत असताना, ‘रुग्णालयातील अव्यवस्था, अस्वच्छता याबाबत जाब विचारताना खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः या डॉक्टरांबरोबर पाण्याचा पाईप हाती घेऊन स्वच्छता करायला लावली यात काय चुकले?’ असा सवाल भाजपचे सह-मुख्य, प्रवक्ता अजित चव्हाण यांनी केला आहे. ‘घटना घडल्यानंतर हेमंत पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तोच वेळ मदत कार्यासाठी सत्कारणी का लावला नाही? असा सवाल सुषमा अंधारे अशोक चव्हाण यांना विचारतील का?’ असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये होत असलेल्या मृत्यू प्रकरणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नांदेडनंतर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16 आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले 9 असे 25 मृत्यू अवघ्या 24 तासांत झाले आहेत. रुग्णालय प्रशासन मात्र याप्रकरणी सारवासारव करत असल्याचं दिसून आलंय. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.

खासगी रुग्णालये स्थिती बघून रुग्णाला अॅडमिट करून घेतात. तर शासकीय रुग्णालयाात सर्वांना अॅडमिट करून घ्यावंच लागतं. त्यामुळे हे आकडे मोठे दिसत असल्याचं शासकीय रुग्णालयांचं म्हणणं आहे. कारणं काहीही दिली जात असली तरी शासकीय रुग्णालयाची व्यवस्थाच सध्या व्हेंटिलेटवर असल्याचं सत्य नाकारता येणार नाही. दरम्यान नांदेडमधील झालेल्या या मृत्यूंनंतर राज्य सरकारचे गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ हे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले. या दोघांनीही त्या घटनेची माहिती घेतली. नांदेडमधील घटनेची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

या घटनेची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत, ‘मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई अशा कारणांनी जर मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशी कानउघाडणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी केली आहे. यावर आता राज्य सरकारने गुरुवारी तातडीने आपली भूमिका मांडावी’ असे निर्देश दिले आहेत. असे सगळे काही असताना आता या घटनेला राजकीय रंग चढायला लागले आहेत.

हे सुद्धा वाचा
अमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारला जातोय बाबासाहेबांचा ‘इतका’ उंच पुतळा, लवकरच होणार अनावरण…
अजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला ‘बँड’ !
नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू…

‘नांदेडच्या रुग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या डीनला जाब विचारणाऱ्या शिवसेना खासदारहेमंत पाटील यांच्यावर या प्रकरणी आरोप करत जातीयवादाचा विखार पसरवणाऱ्या, सतत एखाद्या नागिणी प्रमाणे विखारी जातीयवादी फुत्कार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेची जातीयवादी मानसिकता दिसून आली आहे.’ अशी टीका भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केली आहे.

‘रुग्णालयातील अव्यवस्था, अस्वच्छता याबाबत जाब विचारताना हेमंत पाटील यांनी स्वतः या डॉक्टरांबरोबर पाण्याचा पाईप हाती घेऊन स्वच्छता करायला लावली यात काय चुकले? राजकीय कार्यकर्त्यांनी आता आंदोलन करण्यापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासात बसायची का? केलेले आंदोलन चुकीचे आहे अशी टीका समजू शकतो, पण याच जातीचा अधिकारी आहे म्हणून आंदोलन केले हे सुषमा अंधारे यांची जातीयवादी मानसिकता त्यांचा खुजेपणा दर्शवणारी आहे. घटना घडल्यानंतर हेमंत पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तोच वेळ मदत कार्यासाठी सत्कारणी का लावला नाही? असा सवाल सुषमा अंधारे अशोक चव्हाण यांना विचारतील का?’ असा सवालही अजित चव्हाण यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी