29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचा उमेदवार अजितदादांचे ऐकेना, दादांनी जाहीर केला अपक्षाला पाठींबा

राष्ट्रवादीचा उमेदवार अजितदादांचे ऐकेना, दादांनी जाहीर केला अपक्षाला पाठींबा

लय भारी न्यूज नेटवर्क

सोलापूर : निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अनेक पक्षांचे नेते बंडखोर, नको असलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी सुचना करीत होते. अजितदादा पवार यांनीही पक्षाच्या एका अधिकृत उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची सुचना केली. पण या उमेदवाराने काही केल्या अर्ज मागे घेतलाच नाही. अजितदादांनी आता अपक्षाला मतदान करा. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करू नका, असे जाहीर आवाहन केले आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी केले वक्तव्य दुर्दैवी आहे. शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत असे वक्तव्य करणे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया घाटणेकर यांनी व्यक्त केली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना असल्याचे आवाहन अजितदादांनी केले आहे.

संजयमामा शिंदे लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होते. पण यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. करमाळा मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेनेच्या रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संजयमामा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबतही सलगी वाढविली आहे. देवेंद्र फडणवीसांचा मला पाठींबा असल्याचे ते खासगीमध्ये सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांना अजितदादांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे संजयमामांनी एकाच वेळी दोन्ही डगरीवर पाय दिल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कडून रश्मी बागल यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा प्रचार करूनही ते विधानसभेला मदत करणार नाहीत म्हणून त्यांनी

शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतील असे बोलले जात होते. मात्र त्यांनीही राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी घेण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. यावेळी नारायण पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्यास पसंती दिली.

त्यानंतर शेवटच्या टप्प्यात संजय पाटील घाटनेकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे घाटणेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ पंधरा मिनिटे शिल्लक असताना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आला. राष्ट्रवादी अडचणीत असतानाच धाडस करून संजय पाटील घाटणेकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच राष्ट्रवादीचा पाठिंबा अपक्ष संजयमामा शिंदे यांना असल्याची घोषणा अजित पवार यांनी केल्याने संजय पाटील घाटणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी