29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यातील भावी आमदार लागले पंचायत निवडणुकीच्या तयारीला

सातारा जिल्ह्यातील भावी आमदार लागले पंचायत निवडणुकीच्या तयारीला

लय भारी न्यूज नेटवर्क : अजित जगताप

सातारा : गेले वर्षभर सोशल मीडियावर स्वतःची ओळख भावी आमदार अशी व्हायरल करून अर्ज दाखल करणाऱ्यांनी काल माघार घेतली. काहींना ‘लाख मोला’चा सल्ला मिळाला, तर काहींजणांनी ‘गड्या आपली पंचायत समितीच बरी’ असा विचार करून आतापासूनच तयारीला सुरूवात केली.

सातारा जिल्ह्यातील सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल. सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या  आठ जागांसाठी १६९ उमेदवारांनी रितसर अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काहींनी मोठी जाहिरातबाजी करून स्वतःच्या नावापुढे स्वयंघोषित भावी आमदार अशी बिरूदावली चिटकवून टाकली होती. पण कोठेच डाळ शिजत नसल्याने अखेर ९६ जणांनी अर्ज माघारी घेऊन जिल्हा परिषद ,पंचायत समिती नाहीतर ग्रामपंचायत सदस्य होण्याची मनाची तयारी केली आहे.

‘मोठ्या मोठ्या बाता आणि पक्षप्रमुख हाणतोय चार – दोन लाथा’ याचा सुद्धा काहींनी चांगलाच अनुभव घेतला आहे. सध्या फलटण या आरक्षित मतदारसंघात १० जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे फलटणमध्ये – ११, वाई – १०, कोरेगाव-11, माण – ११, कराड (उत्तर) – ६, कराड (दक्षिण) -१३, पाटण – ९ व सातारा – जावळी – ६ उमेदवार उभे राहिले आहेत. माण – खटाव मतदारसंघ वगळता भाजप – सेना, काँग्रेस – राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. माण – खटावमध्ये मात्र भाजप, शिवसेना आणि सर्वपक्षीय प्रभाकर देशमुख यांच्यात तिरंगी लढत होईल. तिथे वंचितचे डॉ. प्रमोद गावडे यांचेही चांगले वातावरण आहे.

या सगळ्या मतदारसंघात ७३ जण नशीब आजमावत असले तरी प्रमुख पक्षातील उमेदवारांना स्वपक्षातून दगा फटका बसणार आहे. त्याची सुरुवात अर्ज माघारी घेण्यापासूनच काही  मातब्बर नेते व कार्यकर्ते यांनी केल्याची चर्चा वाई –महाबळेश्वर – खंडाळा, कोरेगाव – खटाव तालुक्यात ऐकण्यास मिळत आहे.

प्रचाराचा अवधी कमी असल्याने राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. तोपर्यंत प्रचाराची धुरा सांभाळली पाहीजे अशी अपेक्षा नेते बोलून दाखवित आहेत. पण ज्यांनी अर्ज काढून घेतले आहेत अशी मंडळी आता निवांत बसली आहेत. त्यांना ‘आजीवन भावी आमदार’ अशी ग्रामीण भागात नवी ओळख निर्माण झाली आहे. त्याची ही खुमासदार चर्चा पारावर रंगू लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी