25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeराजकीयअगला स्टेशन ' मातोश्री'...? असं कसं घडू शकतं ?

अगला स्टेशन ‘ मातोश्री’…? असं कसं घडू शकतं ?

भ्रष्टाचाराचा सफाया आणि घोटाळेबाजांना सजा मिळण्याची आशा, अपेक्षा आणि शक्यता आता लोप पावली आहे. परिस्थिती अशी असतांना खासदार संजय राऊत यांच्या 'मैत्री' या निवासस्थानानंतर ईडीचे पुढचे टार्गेट 'मातोश्री' आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे असतील काय?

वांद्र्याच्या कला नगरातील ‘मातोश्री’ (Matoshree) हे उद्धव ठाकरे यांचे केवळ निवासस्थान नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती वास्तू लाखो शिवसैनिकांसाठी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाइतकेच महत्वाचे श्रद्धास्थळ आहे. देशाच्या राजकीय इतिहासात एकच पक्ष, एकच नेता, एकच झेंडा, एकच मैदान असा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या शिवसेनेसाठी मातोश्री हे प्रेरणास्थान आणि ऊर्जा स्रोत आहे. त्या भोवती बाळासाहेबांच्या करिष्म्याचे वलय आहे. भाजपचे ‘पुराण पुरुष’ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन यांच्या मातोश्री येथील शिवसेना प्रमुखांसोबतच्या भेटीगाठी- बैठकांतूनच शिवसेना- भाजप युती बहरली होती.

प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्वोच्च पदावर विराजमान होण्याआधी मातोश्री येथे जाऊन शिवसेना प्रमुखांची भेट घेतली होती. त्यातून मातोश्री आणि शिवसेनेच्या राजकीय दराऱ्याला एक राष्ट्रीय परिमाण प्राप्त झालेले आहे.

द्विपक्षीय लोकशाही असलेली राष्ट्रे जरूर सापडतील. पण जगाच्या पाठीवर एखादा देश तरी असा आहे काय ज्या देशात एकच पक्ष असून तिथे विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही? तसे झाले तर तिथे लोकशाही शिल्लक आहे असे कोण म्हणू शकेल? आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काय म्हणतात ते पाहा. ‘महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. देशात फक्त भाजपच राहील. बाकी सर्व पक्ष नष्ट होतील! ‘

त्यांचे हे विधान तीन दशकांहून अधिक काळ भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या शिवसेनेपुरते मर्यादित नाही. देशातील सर्व राजकीय पक्षांना उद्देशून ते आहे. त्यामुळे नड्डा यांच्या या विधानाला राजकीय पक्षांनी स्वप्नरंजन वा बाष्कळ बडबड समजू नये. त्यांच्या म्हणजे भाजपच्या संकल्पनेतील २०२४ नंतरच्या भारत या राष्ट्राचे ते चित्र आहे. त्यांचे विधान हे त्याचे सूतोवाच असून ते चित्र साकार करण्याचा इरादा, दृढ संकल्पच त्यातून व्यक्त झाला आहे.

शिवाय नड्डा यांच्या त्या विधानाला ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना केलेल्या अटकेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काही यु ट्यूब चॅनेलवर ‘ईडी: अगला स्टेशन मातोश्री?’ अशी चर्चा सुरू झाली आहे. घटना- घडामोडींच्या विश्लेषणपर चर्चेत व्यक्त होणारा तो अंदाज समजू शकतो. पण सध्याच्या सूडाच्या राजकारणात तशी शक्यता नाहीच, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अर्थात, तसे काही घडले तर त्याचे संभाव्य परिणाम काय असतील हा मुद्दा वेगळा आहे.

पण भाजपशी युती केलेल्या आणि एनडीएत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या वाट्याला जे काही आले आहे, ते पाहता ‘युतीमध्ये आमची २५ वर्षे सडली!’ या उद्धव ठाकरे यांच्या जळजळीत उद्गारामागील वेदना आता सर्वांनाच कळू शकते. त्यांनी युतीची २५ वर्षे म्हटली असली तरी प्रत्यक्षात युतीत सडलेल्या वर्षांचा काळ हा तीन दशकांहून अधिक आहे. कारण एनडीएची स्थापना १९९८ ची असली तरी शिवसेना- भाजप यांची युती ही त्याआधीची म्हणजे १९८९ पासूनची आहे.

या युतीमुळेच १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर ६७ जागा लढून अवघ्या १६ जागा जिंकू शकलेला भाजप आज शिवसेनेवर कुरघोडी करून १०६ जागांवर पोहोचला आहे! तर, २०१४ मध्ये स्वबळावर लढून ६३ जागा जिंकलेली शिवसेना मात्र भाजपशी युती असतांनाही २०१९ मध्ये ५६ जागांवर घसरली आहे. त्या निवडणुकीवेळी सत्तेच्या सौदेबाजीत शिवसेनेला खच्ची करण्यासाठी भाजपने ३७ जागांवर शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची चोख व्यवस्था केली होती, असा शिवसेनेचा आरोप आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या कालखंडात युतीमध्ये स्वाभाविकपणे शिवसेनेचे स्थान मोठ्या भावाचे होते. अन भाजपने धाकट्या भावाची भूमिका मान्य केलेली होती. त्याचे कारणच युतीमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकमेकांची राज्यातील ताकद आणि व्याप्ती मान्य केलेली होती. हे सामंजस्यच निवडणुकीतील जागा वाटपात शिवसेनेच्या पदरात भाजपपेक्षा अधिक जागा टाकत असे. त्यातून १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर भाजपला उपमुख्यमंत्री पद मिळाले होते.

पण प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आणि भाजपमध्ये वाजपेयी- आडवाणी यांच्या स्थानी नरेंद्र मोदी- अमित शहा हे आल्यानंतर शिवसेना- भाजप युतीचे स्वरूप पालटले. त्यातील राजकारण हे चढाओढ आणि कुरघोडीवरच थांबलेले नाही. मित्र पक्षाचा समूळ नायनाट आणि मित्र पक्षातील नेत्यांना देशोधडीला लावण्याची पातळी त्या राजकारणाने गाठली आहे.

कॉंग्रेस प्रणित यूपीएच्या विरोधात अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण आडवाणी या भाजपच्या पुराण पुरुष दिग्गज नेत्यांनी १९९८ मध्ये एनडीएची म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. तब्बल २७ पक्षांची ती आघाडी होती. त्यात शिवसेना हा समविचारी हिंदुत्ववादी पक्ष भाजपसोबत अग्रस्थानी होता. पुढे १९९८ ते २०१९ दरम्यान १५ पक्षांनी एनडीएची साथ सोडली. पण शिवसेनेने मात्र भाजपला निष्ठेने, सर्वशक्तीनिशी आणि गाफील राहून भाबडेपणे साथ दिली. भाबडेपणे यासाठी म्हणायचे की, २०१४ मध्ये काँग्रेसला केंद्रातील सत्तेतून हद्दपार करण्याचे आपले लक्ष्य गाठण्यात सफल होताच भाजपने शिवसेनेशी युती तोडून टाकली होती. आता तर हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपला साथ देण्याचे राजकारण शिवसेनेच्या अस्तित्वाच्या मुळावर आले आहे, असेच म्हटले पाहिजे.

ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. गुन्हे, घोटाळे, भ्रष्टाचाराचा निःपक्षपाती तपास करून दोषींवर कारवाई त्यांच्याकडून अपेक्षित आहे. पण त्याच्या विपरीत सर्व घडत आल्यामुळे काँग्रेस राजवटीच्या काळात भाजप नेते हे सीबीआयला ‘पिंजऱ्यातला पोपट’ म्हणायचे. पण तो पोपट २०१४ सालात भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर तरी मुक्त झाला आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे काय? उलट मोदी सरकारने ईडीचा विरोधी पक्षांच्या विरोधात धारदार हत्यारासारखा मुक्त वापर चालवला आहे.

काँग्रेस आणि भाजप यांच्यात फरक सांगायचा झाला तर काँग्रेस विरोधकांचा काटा काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करायची. आणि भाजप विरोधकांना आपल्या चरणाशी लोळण घ्यायला भाग पाडण्यासाठी ईडीचे हत्यार चालवत आहे. ईडीच्या वापरामागचा मोदी- शहा यांचा हेतू शुद्ध नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा सफाया आणि घोटाळेबाजांना सजा मिळण्याची आशा, अपेक्षा आणि शक्यता आता लोप पावली आहे. परिस्थिती अशी असतांना खासदार संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या निवासस्थानानंतर ईडीचे पुढचे टार्गेट ‘मातोश्री’ आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे असतील काय?

मातोश्रीच्या या महतीला धक्का पोहोचवणारी काही कृती बेफान राज्यकर्त्यांच्या हातून घडली तर……? त्यातून एकपक्षीय हुकूमशाही, राजकीय जुलूमशाही या विरोधात उठावाची ठिणगी पडून लोकशाहीच्या संरक्षण- संवर्धनाचे देशव्यापी आंदोलन आकार घेईल यात शंका नाही. शिवसेना नेते प्रमोद नवलकर म्हणायचे, शिवसेनेचे आंदोलन हे वादळासारखे असते. पोकळी मिळेल तिकडे ते घुसते आणि सगळे काही व्यापुन टाकते!

दिवाकर शेजवळ ([email protected] )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आहेत.)

हे सुद्धा वाचा :

आयआयटी मुंबईतील शुल्कवाढी विरोधात अ‍ॅड. अमोल मातेले यांचा घेराव घालण्याचा इशारा

GST Collection 2022 : महाराष्ट्राच्या जीएसटीने केंद्र झाले मालामाल

संजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी