31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनिलेश राणे कुरघोडीच्या राजकारणाचे बळी?

निलेश राणे कुरघोडीच्या राजकारणाचे बळी?

माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेल्या निवृत्तीमुळे ‘ऑल इज नॉट वेल’चे संदेश जात आहेत. निलेश राणे यांनी ऐन विजयादशमीच्या दिवशी सकाळी ट्वीट करून सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, असे ट्विट करून कोकणातील राजकारण घुसळून टाकले आहे. त्यांनी अचानक एवढा मोठा निर्णय ट्वीट करून जाहीर करताना भाजप पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली होती का, याबाबत नक्की माहिती मिळत नाही. पण निलेश राणे यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे आमदार बंधू नितेश राणे भाजपमध्ये सक्रिय आहेत. असे असताना निलेश राणेंनी  राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत.

निलेश राणे कुणामुळे नाराज?

निलेश राणे २००९ मध्ये खासदार होते. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. आता २०२४ साठी त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. तर लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा यापूर्वीच सुरू झाली आहे. रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून ते भाजपचे आमदार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही लोकसभेचे वेध लागल्याची चर्चा आहे. यात भर पडली आहे ती रविंद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील जवळीकीची. या दोघांमधील जवळीक निलेश राणेंना पसंत नसल्याची चर्चा आहे. या सर्व कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांनी सक्रीय राजकारणातून काडीमोड घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तो त्यांचा निर्णय – विनायक राऊत

माजी खासदार निलेश राणे यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला माहीत नाही. कदाचित राजकीय कुरघोडीतून नैराश्य आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तरीही तो त्यांचा निर्णय आहे, मला त्यावर बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार आणि निलेश राणे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांनी दिली आहे.

हे ही वाचा

निलेश राणे यांनी घेतला राजकीय संन्यास !

गोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा

ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

दोन राजीनामे

निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करताच त्यांच्या दोन समर्थक नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. अभिजीत गावंडे आणि प्राजक्ता शिरवळकर अशी या नगरसेवकांची नावे असून ते कुडाळ नगरपरिषदेतील आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी